Dairy Agrowon
यशोगाथा

Dairy, Poultry : दूध, पोल्ट्री हे शेतीपूरक व्यवसायच झाले सुबत्तेचे कारण

जातेगाव बु., (ता. शिरूर) येथील रोहित आणि प्रशांत या इंगवले बंधूंनी पारंपरिक शेतीला सुरुवातीला डेअरी व्यवसायाची जोड दिली. त्यात सात वर्षांपासून यश मिळवल्यानंतर दोन वर्षांपूर्वीच पोल्ट्री व्यवसायातही पाय रोवले आहेत. या दोन्ही पूरक मानले जाणारे व्यवसायच मुख्य शेती व्यवसायापेक्षाही अधिक उत्पन्न मिळवून देत आहे. त्यातून कुटुंबाला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे.

गणेश कोरे

पुणे जिल्ह्यातील जातेगाव बु. (ता. शिरूर) येथील मोहन इंगवले यांच्याकडे पाच एकर शेती. पारंपरिक पद्धतीने विविध भाजीपाल्याचे उत्पादन (Vegetable Production) घेत. मात्र भाजीपाल्याच्या दरात (Vegetable Rate) सातत्याने होणारी चढ-उतार, अवकाळी पावसाचा (Untimely Rain) सततच्या धोका यामुळे नुकसानच पदरी येई. त्यांची दोन मुले रोहित आणि प्रशांत यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी शेतीला दूध व्यवसायाची जोड (Dairy Business) देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, दूध संकलन केंद्र गावात सुरू झाले होते. त्यामुळे दुधाला शाश्‍वत दर आणि पशुवैद्यकीय सल्ला उपचार गोठ्यावरच मिळू लागला होता. थोडेसे धाडस करत इंगवले बंधूंनी काष्टी (जि. नगर) येथून ७२ हजार रुपयांच्या दोन कालवडी खरेदी केल्या. त्यांच्या उत्तम संगोपनातून आता १३ गायी झाल्या आहेत. दैनंदिन दूध संकलनही १२० लिटर इतके वाढले आहे.

चाऱ्यासाठी दोन एकर घास लागवड

दूध उत्पादनामध्ये गायींचा आहार हा महत्त्वाचा घटक आहे. सुका चारा व ओला चारा यांचे योग्य प्रमाण ठेवावे लागते. वर्षभर हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी दोन एकर क्षेत्रामध्ये लसूण घास, हत्ती गवत, मका यांची चक्राकार पद्धतीने लागवड केली जाते. त्यामुळे चाऱ्याची शाश्‍वत उपलब्धता होते. हा चारा कुट्टीद्वारे बारीक करून रोज गाईंना दिली जातो. सोबतच पशुखाद्य, सुका चारा आणि खनिज मिश्रण अशा प्रकारे योग्य नियोजन केले जात असल्याने गायींचे आरोग्य चांगले राहते.

७ वर्षांत १० कालवडींची विक्री, तर ८ कालवडी भेट

दोन कालवडींच्या संगोपनातून गोठ्यातच कालवडी वाढवत नेल्या. आज त्यांच्या जनावरांची संख्या १३ झाली आहे. तसेच गेल्या सात वर्षांत १० कालवडींची विक्री केली, तर ८ कालवडी नातेवाइकांना भेट म्हणून दिल्या आहेत. प्रत्येक गाय गोठ्यातच तयार केलेली असल्यामुळे त्यांना चांगलाच लळा लागला आहे. त्यांच्यासोबत एक भावनिक नातेही निर्माण झाले असल्याचे इंगवले यांनी सांगितले.

गोठा व्यवस्थापनात रोहित आणि प्रशांत यांच्या पत्नी अनुक्रमे सारिका आणि अश्‍विनी यांचेही मोठे योगदान आहे. पहाटेपासून त्या दोघी गोठा आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये मदत करत असतात. पहाटे पाच वाजल्यापासून सर्व कुटुंब कामाला लागते. रोज सकाळी सहा आणि संध्याकाळी सहा वाजता मिल्किंग मशिनद्वारे दूध काढून, त्वरित संकलन केंद्रामध्ये दूध पोहोचवले जाते.

पोल्ट्री उद्योगही केला सुरू

२०१५ पासून सुरू केलेल्या दूध व्यवसायात यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. तसेच भांडवलही जमा झाले. २०२० मध्ये एका मित्राच्या ५० टक्के भागीदारीमध्ये पाच हजार पक्षी क्षमतेची पोल्ट्री सुरू केली. यासाठी ३० बाय १९० फूट लांबीची दोन शेड उभारली असून, त्यासाठी २४ लाख रु. खर्च आला.

नवीन गोठ्यासह बांधला बंगला

पारंपरिक गोठ्यात गोपालन सुरू केले होते. आता दोन वर्षांपूर्वी त्यांनी ३३ बाय ७० फूट आकाराचा ‘हेड टू हेड’ पद्धतीचा नवीन गोठा बांधला. या गोठ्यात शास्त्रोक्त गव्हाण, पिण्याच्या पाण्याची सोय, शेण आणि गोमूत्र वाहून नेण्याची व्यवस्था केली आहे. सोबतच मोठा बंगला बांधला असून, जुन्या कौलारू घरातून तिथे राहण्यास गेले आहे. चारचाकी घेतली आहे. या प्रगतीचे सर्व श्रेय आपल्या रोहित आणि प्रशांत या मुलांनाच असल्याचे वडील मोहनराव सांगतात.

२५ गायींपर्यंत संख्या वाढविणार

२ कालवडींपासून सुरू केलेला दूध व्यवसाय आता १३ गायींपर्यंत येऊन ठेपला आहे. आता मुक्त गोठा पद्धतीचा प्रयोग करणार आहे. येत्या दोन, तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने गायींची संख्या २५ पर्यंत वाढवून मर्यादित ठेवण्याचे नियोजन केले आहे. २५ गायींचा गोठा हा संगोपन आणि अर्थकारण या दृष्टीने संतुलित ठरू शकतो, असा विश्‍वास रोहित यांना आहे.

...असा आहे एकूण ताळेबंद

एकूण शेती ः पाच एकर

दोन एकर - चारा पिके

तीन एकर - ऊस - एकरी सरासरी उत्पादन ६० टन, दर २६०० रु. प्रति टन, एकूण उत्पन्न ः ४.५ लाख रु. खर्च ः एक लाख रु.

गोपालन-

सध्या अमूल डेअरीद्वारे प्रति लिटर ३५ रुपये दर मिळतो.

रोज १२५ लिटर दूध, दररोज ४ हजार ३७५ रुपये उत्पन्न, सुमारे पन्नास टक्के इतका पशुखाद्य, हिरवा चारा याचा खर्च वजा जाता दरमहा ६० हजार रुपये उत्पन्न येते.

अमूल डेअरीकडूनच प्रति गाय ३०० रुपयांमध्ये पशुवैद्यकीय सेवा आणि उपचार उपलब्ध होतात. नियमित तपासणीमुळे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे दूध संकलनही नियमित राहत असल्याचे रोहित इंगवले सांगतात.

पोल्ट्री -

प्रति बॅच खर्च ः साधारण १५ ते १६ लाख रुपये.

(पिले- तीन लाख रुपये; औषधे, दवाखाना- अंदाजे पन्नास हजार रु.; खाद्य सरासरी सहाशे बॅग, प्रति बॅग दोन हजार रुपये प्रमाणे १२ लाख रु.; तूस, मजुरी व अन्य किरकोळ खर्च हे कोंबड खताच्या सुमारे चार लाख रु. उत्पन्नातून वसूल होतात.

प्रति पक्षी प्रति किलो दर ८० रु. ते १४० रु.

आजवर आठ बॅच गेल्या असून, प्रति बॅच सरासरी दोन लाख रुपयांपर्यंत नफा शिल्लक राहत असल्याचे इंगवले बंधूंनी सांगितले.

एकूण खर्च ः

कौटुंबिक खर्च - २.४ लाख रु.

पुढील पिकांचे नियोजन व शेतीसाठीचा खर्च - २.५ लाख रु.

वैद्यकीय खर्च किंवा विमा हप्ते इ. - ५० हजार रु.

खर्च वजा जाता शिल्लक उत्पन्न हे चालू व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवायचे धोरण ठेवले आहे.

संपर्क -

रोहित इंगवले, ९०२२६१०५१८,

प्रशांत इंगवले, ९०९६३२७७७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT