Success Story
Success Story Agrowon
यशोगाथा

Success Story : कौशल्यबुध्दीतून विकसित केली अवजारे

Suryakant Netke

Nagar Story : नगर जिल्ह्यातील कर्जत हा कायम दुष्काळी असलेला तालुका आहे. येथील कोपर्डी गावात सर्वसाधारण प्रकारची जमीन आहे. कुकडी प्रकल्पाचे पाणी (Kukdi Project Water) उपलब्ध होत असल्याने ऊस, गहू, कांदा, मका, हरभरा, चारा, तूर, फळपिके घेण्याला येथील शेतकरी प्राधान्य देतात.

गावातील सचिन बबन सुद्रीक यांची आठ एकर शेती आहे. घरगुती कारणाने पुरेसे शिक्षण घेता न आल्याने अकरावीपर्यंत शिकून शेती आणि स्थानिक पातळीवर ऊसतोडणीचे काम त्यांनी केले. दहा वर्षांपूर्वी ते मित्रासोबत ट्रॅक्टर खरेदीसाठी गेले.

मात्र मित्राने खरेदीचा निर्णय रद्द केल्याने सचिन यांनीच तीन लाख ८० हजार रुपये खर्च करून तो खरेदी केला. हाच ट्रॅक्टर सचिन यांच्या शेतीतील अर्थार्जनाचा व यांत्रिकीकरणाचा मुख्य कणा झाला.

शेतीतील यांत्रिकीकरण

गहू, कांदा., ऊस, मका आदींची शेती पाहण्याबरोबर सचिन स्वतः ट्रॅक्टर चालवून अन्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलित अवजारांच्या मदतीने शेतीतील सर्व कामे भाडेतत्वावर करून देतात. आपल्या शेतीत तसेच अन्य शेतकऱ्यांच्या शेतीत रोज येणाऱ्या समस्यांचा त्यांनी अभ्यास केला.

त्यांच्याकडे कल्पनाशक्ती, कल्पक बुध्दी व निरीक्षणवृत्ती चांगली आहे. त्याआधारे विविध अवजारांमध्ये सुधारणा करण्यास सुरवात केली. चार किलोमीटवर असलेल्या मित्राच्या वर्कशॉपचा त्यासाठी मोठा फायदा झाला. मित्राच्याही काही कल्पनांचा उपयोग झाला. त्यातून चांगली अवजारे तयार करता आली.

त्यांची माहिती थोडक्यात पुढीलप्रमाणे.

१) वापरातील नांगराचा आकार लहान असल्याने जमिनीची पूर्ण पलटी आणि खोलवर नांगरट होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर मग अनुभवातून फाळाचा आकार चार इंचाने वाढवला. फाळाचे टोक पूर्वी ५० एकर काम केल्यानंतर खोल जाताना वाकायचे.

झिजायचे. त्याला पर्याय म्हणून ट्रकच्या पाटाचा भाग टोकदार करून त्याचे वेल्डिंग केले. आता एकेरी फाळासह १०० एकरांवर काम करता येते. फाळाचे टोक मजबूत झाले आहे. नांगरणीच्या कष्टात, वेळेत बचत झाली आहे.

२) कल्टीव्हेटरला मागे पाच व पुढे चार फण्या ठेवल्या आहेत. सऱ्या पाडणे व रान भुसभुशीत होणे ही कामे त्यामुळे सुकर झाली आहेत. मागील पाच फण्यांपैकी मध्यवर्ती फण्याला आडवा पत्रा जोडला आहे.

त्यामुळे काकऱ्या पाडण्याचे काम सोपे झाले आहे. अशा सुधारणांमुळे दोन-दोन कामांचे दुहेरी खर्च होणारे पैसे, मजुरी व वेळ यात बचत झाली आहे.

३)तूर, कपशीची खोडे काढण्याचे यंत्र तयार केले आहे. त्याला पुढे दोन तर मागे एक फण आहे. त्याला तिरकी पास बसविली आहे. यामुळे बांध फोडण्यासह कपाशी, तुरीची खोडे एका बाजूला काढणे सोपे होते.

उसाला एकूण सहा फण असून त्यातील पाठीमागे दोन तर पुढे चार फण आहेत. मागील फणाला पत्रा बसविला आहे. या सुधारणेमुळे उसाच्या बुडाला माती लावणे, सरी तयार करणे ही कामे होतात. पुढील चार फणांमुळे सरी मोकळी करण्याचे काम होते.

४) कलिंगड, खरबूज व अन्य पिकांसाठी गादीवाफा (बेड) तयार करण्यासाठी अवजार तयार केले. कलिंगडासाठी ‘बेड’ तयार करताना माती आत ओढली जाते. तर डाळिंबात मशागत करताना ती बाहेर काढली जाते अशी ‘ॲडजेस्टमेंट’ केली आहे.

पुढे एक फण दिला आहे. त्यामुळे शेताला दिलेले खत चांगल्या प्रकारे ‘मिक्स’ करता येते. बेडला गोलाई (रिंगण) देता येते. दोन्ही कामे एकाचवेळी होत असल्याने खर्चात एकरी एक ते दीड हजार रुपये बचत होते.

५)बहुउद्देशीय पेरणी यंत्रात काही बदल केले. यात मूळ यंत्रात बियाणे टाकण्याची मागील बाजूस असलेल्या पेटीची दिशा बदलली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर चालवताना बियाणे व्यवस्थित पडते आहे हे पाहणे शक्य होते. यंत्राला खालील बाजूला वाट्या बसविल्या.

त्यामुळे कांदा पेरणी करताना बी पांगून पडते. फार खोल जात नाही. अतिरिक्त मजुराची गरज भासत नाही. पाणी देण्यासाठी दंड तयार करायचे बैलचलित यंत्रही ट्रॅक्टरला जोडले. त्यामुळे एकाचवेळी अनेक कामे या यंत्राद्वारे करता येतात. रात्रीच्या वेळीसही पेरणी शक्य होते.

६) मका पेरणी यंत्रही स्वकल्पकेतून तयार केले आहे. हे नऊ फणांचे आहे. मका पेरणीसाठी त्यातील दोन फण काढून ठेवता येतात. मूळ यंत्राची मागील चाके यात पुढे घेतली आहेत.

बियाणे योग्य खोलीवर पडेल अशी व्यवस्था आहे. वाफे तयार करणे, पेरणी करणे व पाळी घालणे तसेच दंड काढणी अशी कामेही हे यंत्र करते.

७)रोटाव्हेटरलाही दंड पाडण्याचे, सारा काढण्याचे यंत्र जोडता येते. कांदा पेरणीसारखी कामेही अशा यंत्राद्वारे एकावेळी करता येतात.

८)कर्जत तालुक्यात कापूस घेणारे शेतकरी कमी आहेत. सचिन यांच्या मदतीने गावातील लहु सुद्रीक यांच्या शेतात तीन बाय दीड फूट अंतरावर कापूस घेण्याचा प्रयोग करण्यात आला. तर उद्धव सुद्रीक यांच्या शेतातही तूर पेरणीचा प्रयोग केला आहे.

अवजारांमुळे झाले पुढील फायदे

१)मजुरी, वेळ, कष्ट, ट्रॅक्टरचे इंधन या खर्चात बचत झाली.

२)प्रत्येक कामनिहाय एकरी एकहजारांपासून ते दोनहजार रुपयांपर्यंत बचत झाली.

३)कामे वेळेवर होऊ लागली. कमी वेळेत अधिक क्षेत्रावर काम होऊ लागले.

आली आर्थिक सक्षमता

आज सचिन वर्षभरात १०० ते दीडशे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलित अवजारांची सेवा देतात. ट्रॅक्टर ते स्वतः चालवितात. शेतीत आई लीलाबाई, वडील बबन, पत्नी राजश्री यांची मोलाची मदत त्यांना होते. व्यवसायातून सचिन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत.

आपली शेती त्यांना अधिक काटेकोर करणे शक्य झाले. पीक उत्पादनात वाढ करता आली. घराचे बांधकाम करता आले. अडीच एकर शेती खरेदी केली. फोर व्हीलर घेता आली. मुलांना चांगले शिक्षण देता येत आहे.

संपर्क- सचिन सुद्रीक- ९०९६४३३४०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT