Banana Orchard Agrowon
यशोगाथा

Banana Export : निर्यातक्षम केळी शेतीने दाखवली बदलाची वाट

गणेश कोरे

Success Story of Banana Farming : पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा द्राक्षे, भाजीपाला आदींसाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे. येथील
खोडद- हिवरे गावातील विजय थोरात यांची पाच एकर शेती आहे. कांदा, बटाटा, ऊस ही त्यांची पिके होती. मात्र घर व शेतीतील खर्च पाहता या पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते समाधानी नव्हते.
त्यामुळे परिसरातील चार एकर शेती त्यांनी कराराने करण्यास घेतली. मात्र त्यात व्यावसायिक पीकबदल करणेही त्यांना आवश्‍यक वाटत होते. त्यातून केळीचा पर्याय त्यांच्यासमोर आला. इंदापूर भागातील केळी बागायतदार, व्यापारी, निर्यातदारांशी त्यासाठी चर्चा केली. केळीबागांची पाहणी केली.
रांजणी (ता. आंबेगाव) येथील केळी बागायतदारांचेही मार्गदर्शन मिळाले. अखेर खंडाने घेतलेल्या शेतीपैकी दोन एकरांत केळी घेण्याचा निर्णय घेतला.

केळी शेतीतील अनुभव

विजय यांचा आता केळी पिकात सुमारे चार वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. यंदाचे वर्ष त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरले आहे. कारण मागील सर्व वर्षे त्यांनी स्थानिक बाजारपेठेत मालाची विक्री केली होती. कोरोना काळात तर त्यांच्या केळीचे मोठे नुकसान झाले होते. यंदा त्यांना निर्यातीची बाजारपेठ मिळाली. एका आघाडीच्या सिंचन क्षेत्रातील कंपनीतील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून त्यांना लागवड तंत्रज्ञान मार्गदर्शन मिळाले.

दोन निर्यातदार कंपन्यांसोबत संपर्क झाला. यंदाच्या जानेवारीत लागवड केलेल्या निर्यातक्षम प्लॉटमधील ‘हार्वेस्टिंग’ सुरू झाले आहे. आतापर्यंत एकूण ४५ टन मालाच्या काढणीपैकी ४२ टन माला निर्यातक्षम असून, आखाती देशांना पाठवणी झाली आहे. अजून पाच ते सहा टन मालाची निर्यात होण्याची अपेक्षा आहे. निर्यातदार कंपनीचे लोक बांधावर येऊन ‘कटिंग’ तसेच निर्यातीसाठीची सारी प्रक्रिया, बॉक्स पॅकिंग करतात. ही कार्यपद्धती शेतकऱ्यांसाठी सोपी झाली आहे.

केळीने केले समाधानी

पूर्वी केळीला ‘लोकल मार्केट’ला किलोला १० ते १२ रुपयेच दर मिळायचा. आता तो १७ रुपये मिळत आहे. यंदा निर्यातीसाठी तो २४ ते २८ रुपयांपर्यंत मिळाल्याचे विजय यांनी सांगितले.
ऊस, कांदा, बटाटा या पिकांपेक्षाही उल्लेखनीय उत्पन्न केळीतून मिळत असल्याने विजय समाधानी व उत्साही झाले आहेत.

त्यामुळेच केळीची चार एकर लागवड त्यांनी नव्याने केली आहे.
लागवड सात बाय पाच फुटांवर आहे. ग्रॅंडनैन वाण आहे. जमिनीच्या सुपीकेतसाठी एकरी चार ट्रॉली शेणखत, दोन टन कोंबडीखत व कडुनिंब पेंड असा वापर ते करताहेत.

असा निवडला हंगाम

केळी लागवडीचा इंदापूर तालुक्यातील मुख्य हंगाम जून, जुलै दरम्यान असतो. त्याचे उत्पादन मार्च एप्रिलमध्ये उत्पादन सुरू होते. मोठी आवक बाजारपेठेत सुरू होते. केळीची टंचाई नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये जाणवते.

याच काळात निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठेत मोठी मागणी असते. ही स्थिती लक्षात घेता जानेवारीत लागवड केल्यास उच्च मागणीच्या काळात केळी बाजारात आणता येतील असा सल्ला विजय यांना तज्ज्ञांनी दिला. त्यानुसार जानेवारीचा लागवड हंगाम मागील वर्षापासून विजय यांनी निवडला आहे. त्याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे.

उसाला पर्याय ठरतेय केळी

उसाला लागणारे पाणी, दर, मिळणाऱ्या रकमेचा कालावधी यांचा विचार करता शेतकऱ्यांना केळी हे पीक अधिक फायदेशीर वाटत असल्याचे विजय सांगतात. निर्यातदारांचा ओढाही खोडद आणि हिवरे परिसरात वाढला आहे. दोन- तीन वर्षांपूर्वी एकच निर्यातदार आमच्या गावात यायचे. आता दोन निर्यातदारांकडून खरेदी होत असल्याने स्पर्धा वाढली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत
असल्याचे विजय यांनी सांगितले.

तीनही मुलांना केले उच्चशिक्षित

विजय आणि सीमा या थोरात दांपत्याला तीन मुले आहेत. तिघांनाही केवळ शेतीतील उत्पन्नातूनच
त्यांनी उच्च शिक्षित केले आहे. मोठा रामकृष्ण रशिया येथील वैद्यकीय विद्यापीठातून ‘एमबीबीएस’ पदवी घेऊन डॉक्टर झाला आहे.

पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे तो ‘प्रॅक्टीस’ करतो आहे. दुसरा मुलगा वैष्णव ‘एमएस्सी ॲग्री’ असून, राहुरी येथील कृषी विद्यापीठातून आनुवंशिक रोप पैदासशास्त्र विषयातून ‘पीएचडी’ करण्याचे त्याचे प्रयत्न आहेत. तिसरा मुलगा सिद्धेश बीएस्सी ॲग्री व एमबीए असून, तोही पुणे येथे नोकरी करीत आहे.

जुन्नर परिसर होतेय केळीचे क्लस्टर (इन्फो)

जुन्नर तालुक्यातील ओतूर, धोलवड, ओझर हा परिसर पारंपरिक केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र बदलते तंत्रज्ञान आणि नव्या प्रयोगशील पिढी यामुळे पीक बदल घडताना दिसत आहे.
त्यामुळेच जुन्नर, आंबेगाव तालुक्याच्या सीमेवरील नारायणगाव, खोडद, मांजरवाडी (ता. जुन्नर) तर रांजणी परिसरातील (आंबेगाव) तरुण शेतकरी सामूहिक केळी लागवडीकडे वळले आहेत.

त्यामुळे निर्यातदारांना एकाच ठिकाणी मुबलक माल निर्यातीसाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे हा परिसर भविष्यात केळीचे क्लस्टर म्हणून उदयास येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कृषी -पणन विभागाने जुन्नर- आंबेगाव बाजार समितीच्या माध्यमातून निर्यात सुविधा उपलब्ध करून द्यावी

अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. जुन्नर बाजार समितीच्या वतीने नारायणगांव येथे १३ एकरांवर एकात्मिक निर्यात सुविधा केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी ही माहिती दिली. 

विजय थोरात, ९९७०३८६३९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT