श्रद्धा चमके
रोजच्या रोज फिल्ड व्हिजिट, एक महिला म्हणून घरच्या जबाबदाऱ्या, घरच्यांचा किती पाठिंबा मिळेल, असे अनेक प्रश्न मनात असतानाही, इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी या जोरावर पुणे जिल्ह्यातील गुरुंजवाडी (ता. शिरूर) या गावातील नूतन टेमगिरे-नळकांडे ही २४ वर्षांची तरुणी ड्रोन पायलट बनली आहे. एका वर्षामध्ये तिने ८०० ते ९०० एकरांवर ड्रोनद्वारे फवारणी केली आहे.
नूतन यांचा लहानपणापासून शेतीमध्येच काहीतरी करण्याकडे ओढा होता. नूतन यांचे वडील बाळासाहेब टेमगिरे यांचा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय होता. नूतन यांच्या वडिलांना आपल्या मुलीने कृषी क्षेत्रात शिक्षण घेऊन शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करावेत असे वाटत होते. नूतन यांनी कृषीमध्ये पदवी घेण्याकरिता बीड येथील सौ. के. एस. के (काकू) कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला.
शिक्षण सुरू असतानाच दरम्यानच्या काळात कोरोना आला. याच काळात नूतन यांचा विवाह शिरूर तालुक्यातील गुरुंजवाडी येथील प्रवीण बापूसाहेब नळकांडे यांच्याशी झाला. लग्नानंतर नूतन यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पती प्रवीण हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असल्यामुळे त्यांनी नूतन यांना सारथी संस्थेतील ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर नूतन यांची निवड झाली. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात २०२४ मध्ये सातदिवसीय ड्रोन पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले.
या प्रशिक्षणानंतर राहुरी येथे कृषी विद्यापीठात त्यांना नोकरीची संधी मिळाली होती. मात्र घरापासून दूर राहून नोकरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे घरी राहून ड्रोन व्यवसाय करायचे त्यांनी ठरवले. परंतु हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ड्रोन विकत घेण्याचा सर्वांत मोठा प्रश्न होता. कारण ड्रोनची किंमत ८ ते १० लाखांपर्यंत होती. त्यामुळे त्यांनी ड्रोनचे सुटे भाग हैदराबाद येथून विकत घेण्याचे ठरवले.
ड्रोनचे सुट्टे भाग खरेदी करण्यासाठी पीडीसीसी बॅंक, शिक्रापूर येथून सोने तारण कर्ज घेतले. नूतन यांचे पती प्रवीण यांनी सुट्या पार्टसंदर्भात इंटरनेटवर माहिती घेतली आणि ड्रोनचे सर्व पार्ट मागविले. घरच्या घरी ड्रोन कसे जोडायचे यासाठी पूर्ण अभ्यास करून ड्रोन असेंबल केला.
यामुळे मार्केटमधील किमतींपेक्षा खूप कमी खर्चात ड्रोन तयार झाला. त्यानंतर नूतन यांनी १ जून २०२४ पासून ड्रोन व्यवसायाला सुरुवात केली. नूतन यांना एक अडीच वर्षांची मुलगी असून सासूबाई मीना तिच्यावर लक्ष ठेवतात. सासरे बापूराव नळकांडे हे फवारणीसाठी ड्रोनची ने-आण करण्याच्या कामांत मदत करतात.
पाण्यासह वेळ, फवारणी खर्चात बचत
शिरूर भागातील गणेगाव खालसा, करंदी, तळेगाव ढमढेरे, राहू, कोंढापुरी, कासारी व इतर गावांमध्ये ऊस, मका, सोयाबीन, कांदे, भाजीपाला व फळपिके यांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे काम नूतन करतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे ८०० ते ९०० एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी केली आहे. हंगामामध्ये अनेक ठिकाणांहून फवारणीसाठी त्यांना बोलावले जाते.
हंगामामध्ये खर्च वजा जाता चांगले आर्थिक उत्पन्न या व्यवसायातून मिळत असल्याने आर्थिक प्रगती झाली आहे. ड्रोनद्वारे फवारणी करताना केवळ १० लिटर पाण्यामध्ये सहा मिनिटांत एक एकर क्षेत्रावर फवारणी केली जाते. तर पंपाने फवारणी केल्यास एक एकर क्षेत्रासाठी सुमारे २०० लिटर पाणी लागते. ड्रोनमुळे पाण्यासह वेळेची, कीटकनाशकाची बचत होते, असे नूतन सांगतात.
कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे झाले यशस्वी
आजपर्यंतच्या माझ्या प्रवासात बीडच्या सौ. के. एस. के (काकू) कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि सारथी संस्थेचे श्री. काकडे, श्री. वाखुरे, सौ. सुनंदा कुऱ्हाडे तसेच डॉ.गोविंद साळुंके, प्राचार्य डॉ. मोरे आणि प्रा.दीपाली मुटकुळे यांचे मार्गदर्शन लाभले. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मी आज स्वावलंबी होऊ शकले. कष्टाच्या बळावर प्रत्येक गोष्ट सहज शक्य होते, असे नूतन अभिमानाने सांगतात.
नूतन टेमगिरे - नळकांडे ९३२२०५६११७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.