Rojagar Hami Yojana : औरंगाबाद जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३५ किलोमीटरवर देवगाव (ता. पैठण) आहे. सन २०१४ या पाणीटंचाईच्या वर्षात गावात रोजगार हमी योजनेच्या कामास सुरुवात झाली. त्यापूर्वी हे क्षेत्र कोरडवाहू होते. अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत होत्या.
लोकसहभाग, कृषी विभाग, शासकीय व प्रशासन विभाग यांच्या एकत्रित सहभागातून गावांत विकासाची विविध कामे झाली. त्यातून गावचे चित्र पालटण्यास मदत झाली.
शेती पद्धती व पूरक व्यवसाय
वैयक्तिक लाभात ३५ सिंचन विहिरी घेण्यापूर्वी गावचे शेतीक्षेत्र कोरडवाहू होते. विहिरींची काम पूर्ण झाल्यानंतर आज ही शेती बागायती झाली आहे. पूर्वी बाजरी, सोयाबीन कापूस ही पिके घेतली जायची.
आता मोसंबी, डाळिंब आदी नगदी पिकांची विविधता दिसू लागली आहे. शेतकऱ्यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे. त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावला आहे. जोड व्यवसाय म्हणून दुग्ध, रेशीम, कुक्कुटपालन सुरू झाले आहे. परिणामी, गावातील युवकांना रोजगार मिळाला आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभात रेशीम उद्योगाचा समावेश करण्यात आला. गावात एका शेतकऱ्याने २०१८ मध्ये या उद्योगाला सुरुवात झाली. आज सुमारे ३० शेतकरी या उद्योगात आहेत. तुती रोपे तयार करण्यापासून ते कोष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक घटकाला आर्थिक लाभ मिळत आहे. या उद्योगामुळे प्रति बॅच ताजा पैसा शेतकऱ्यांना मिळू लागला आहे.
सिंचनाच्या सोयी झाल्यामुळे गावात दुभत्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गावात सुमारे ६० पक्के गोठे बांधण्यात आले आहेत. व्यवस्थापन चांगले होत असल्याने दूध उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे.
शेतरस्त्यांची निर्मिती
देवगाव शिवारातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. पावसाळ्यात रस्ता खराब असल्याचे कारण सांगून मजूरदेखील येण्यास नकार देत असत. मशागतीसाठी ट्रॅक्टर वा मळणी यंत्रही नेता येत नसे. त्यामुळे धान्य शेतातच खराब होण्याच्या समस्या तयार होत.
पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या पुढाकारातून पैठण तालुक्यात शेतरस्त्यांची चळवळ सुरू झाली. देवगावातही त्यांच्या प्रयत्नांतून २०१९ मध्ये मनरेगा अंतर्गत मातोश्री पाणंद रस्ते व एकूणच योजनेला मान्यता व अधिक चालना मिळाली.
सन २०२० मध्ये शिवारात शासनाच्या मनरेगा योजनेच्या अंतर्गत सुमारे सहा किलोमीटर शेतरस्ते पूर्ण झाले. आज भर पावसाळ्यात गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीत ये जा करणे सुकर झाले आहे.
गावच्या सौंदर्यीकरणात भर
गावातील प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर सिमेंट ब्लॉक बसविल्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरासमोरील रस्ता स्वच्छ ठेवतो आहे. त्यामुळे गावच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. धूळ आणि साचलेल्या पाण्यामुळे होणारे साथीचे आजार आटोक्यात आले असून, त्यावरील खर्चाला आळा बसला आहे.
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी २०२१ मध्ये शासनाने मनरेगा अंतर्गत महोगनी वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यातून पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. यात आंतरपीक घेण्यास मुभा दिली आहे. गावात अंदाजे १५० एकर क्षेत्रावर हे लागवड क्षेत्र आहे. आरोग्य केंद्राची इमारत गावात दिमाखात उभी आहे.
ग्रामरोजगार सेवक मदन बोंद्रे म्हणाले, की गावात २०११ पासून मी रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे. त्यावेळी विकासकामे सुरू होतीच. पण सन २०१९ नंतर काही जाचक अटी रद्द करून रोजगार हमी योजना सुटसुटीत झाली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वरूपाची कामेही मोठ्या प्रमाणात झाली.
मदन बोंद्रे, ग्रामरोजगार सेवक ८८०५६१४२३२
(लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय औरंगाबाद येथे सहायक संचालक आहेत.)
पाच वर्षांपासून रोजगार हमी योजनेच्या विविध कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. सिंचन विहिरीमुळे पाण्याची उपलब्धता तयार होऊन खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांना घेणे शक्य झाले. गावातील स्थलांतरित मजुरांची संख्या शून्यावर आली आहे. गावातील युवकांना आपल्या शेतातच काम मिळाले आहे. आपला गाव समृद्ध करणे शक्य झाले आहे.योगेश कोहुळे, सरपंच, ९४०३५३७०८०
गावात मागील पाच वर्षांत माथा ते पायथा या पद्धतीने जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. सलग समताल चर, बांधबंदिस्ती, जीप सीसीटी, सिमेंट व माती नाला बांध आदी कामांचा त्यात समावेश राहिला. त्यातून गावाचा जलस्तर मोठ्या प्रमाणात उंचावला. गावातील आर्थिक व्यवहार पूर्वी सावकाराच्या माध्यमातून व्हायचे. आता शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावल्याने ते बंद झाले. बॅंकांमध्येही शेतकऱ्यांची पत वाढली आहे.भास्कर गिते, उपसरपंच, ७०३०५९८६३२
मी अनेक वर्षांपासून कोरडवाहू शेती करत होतो. सन २०१९ मध्ये वैयक्तिक लाभात मला सिंचन विहीर मला मिळाली. त्यापूर्वी केवळ खरीप हंगामी पिके घेत होतो. आता मोसंबी व अन्य बागायती पिकांसह जनावरासाठी चाराही घेऊ लागलो आहे. महोगनी लागवड केली आहे. कौटुंबिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला आहे.सुधाकर धोंडीबा बोंद्रे, ९८५०५०९६९५, ९१५८६५८०९०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.