Rural Development : रझडी (ता.घाटंजी, जि.यवतमाळ) हे श्वेताचे मूळ गाव. वडिलांनी चार एकरावर कुटुंबाच्या गरजा भागविण्याचे प्रयत्न केले. परंतु उत्पन्नाचा ताळेबंद जुळला नाही, यातूनच कर्जाचा डोंगर वाढला. परिणामी, त्यांनी पुलगाव (जि. वर्धा) येथे किराणा दुकानात काम सुरू केले.
लहानपणी शेतीमुळे घडलेल्या स्थलांतराची श्वेता साक्षीदार होती. पुढे श्वेताने अमरावती येथून इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन पदवी घेतली. शिक्षण सुरू असताना ‘निर्माण फेलोशिप’ मिळाली होती. पदवीनंतर काही वर्षे पुण्यात नोकरी केली. त्यानंतर कास्तकार संघटनेत श्वेताने तीन वर्षे काम केले.
‘ग्रामहित’ची स्थापना
कास्तकार अभियानात सहभागी युवकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून भाडेतत्त्वावर शेती सुरू केली. यामुळे या अभियानात सहभागी युवकाचे कुटुंबीय नाराज होते. घरची शेती सोडून हा भलता उपद्व्याप, असा त्यांचा सूर होता. त्यांच्या नाराजीमुळेच सर्वांनी कास्तकार अभियान सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे श्वेताने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी पत्करली. दरम्यान, २०१५ मध्ये कास्तकार अभियानात सहभागी असलेल्या पंकज महल्ले सोबत श्वेताने लग्न केले. पंकज हा सामाजिक उद्योजकता विषयातील पदवीधर.
लग्नानंतर जमशेदपूर (झारखंड) येथे टाटा स्टील कंपनीत नोकरीच्या निमित्ताने हे दांपत्य स्थलांतरित झाले. मात्र त्या ठिकाणी मन रमत नसल्याने पंकजने नोकरी सोडली आणि श्वेताने आयआयटी (हैदराबाद)मध्ये मास्टर करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्यांचा मुलगा रियांश हा दोन वर्षांचा होता. या प्रवासादरम्यान ‘ग्रामहित’चे बीज रोवले गेले.
विदर्भातील शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीची अडचण लक्षात घेऊन श्वेता आणि पंकज यांनी ऑगस्ट २०२० मध्ये ‘ग्रामहित’ची स्थापना केली. शेतकऱ्याने तारण ठेवायचे किंवा विकायचे सोयाबीन संबंधित केंद्रापर्यंत घेऊन आल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने नमुने काढून पृथक्करण केले जाते.
डिजिटल ॲपवर नोंद होते. ॲपवरून शेतकऱ्याला दर्जानुसार किती दर मिळणार हे कळते. सोयाबीनसाठी १० टक्के आर्द्रता, २ टक्के काडीकचरा, २ टक्के डॅमेज मटेरिअल इतके प्रमाण ठरलेले आहे. ॲपमधील नोंदणीनंतर दर कमी किंवा जास्त का मिळाला, याचे सविस्तर विवेचन तत्काळ कळते.
घरबसल्या मोबाइलमधील ॲपच्या माध्यमातून तारण शेतीमालाची विक्री करता येते. शेतीमाल विकायचा असेल त्या वेळी शेतकऱ्याने ॲपमधील ‘सेल’ ऑप्शनवर क्लिक केले, की मोबाईलवर ओटीपी मिळतो. तो भरताच काही सेकंदात विक्री प्रक्रिया होते.
शेतीमाल विक्रीसाठी व्यापाऱ्यांऐवजी थेट प्रक्रिया उद्योजकांशी करार झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारदराच्या तुलनेत अधिक दर मिळतो. शेतीमाल तारण असल्यास १० रुपये प्रति क्विंटल प्रति महिना असे भाडे आणि १२ टक्के व्याजाची आकारणी होती.
तारण घेतलेल्या रककमेचे व्याज आणि भाड्याची वसुली शेतकऱ्याने ज्या दिवशी शेतीमालाची विक्री केली त्या दिवशी बॅंकेला परतावा मिळून उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते.
‘ग्रामहित’चे फायदे
- आठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ३० ते ४० टक्के वाढ.
- सोयाबीन, तूर, हरभरा, भुईमूग तारण, विक्री सुविधा.
- वार्षिक सुमारे ६० टनांची उलाढाल.
फेलोशिप आणि गौरव
- एमआयटी, युनूस सोशल बिझनेस, उपाया यांच्या संयुक्त सहकार्याने उपाया फेलोशिप.
- लिड ट्राइब फेलोशिप, वेस्टर्न वेले (जर्मनी) फेलोशिप.
- भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे फेलोशिप.
- सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सॉल्व्हर चॅलेजद्वारे गौरव.
- टाय नागपूर चॅप्टरच्या वतीने दुबई येथे प्रकल्प सादरीकरण.
- फोर्ब्ज मुख्यपृष्ठावर श्वेताचे छायाचित्र.पहिल्या १०० कंपन्यांच्या यादीत ‘ग्रामहित’चा समावेश.
...असा आहे प्रकल्प
- प्रकल्पातील गावे : ७०
- जोडलेल्या शेतकरी कंपन्या : २७
- आंध्र प्रदेशातील शेतकरी कंपन्या : चार
- गाव तेथे गुणवत्ता केंद्र.
- गावामध्ये शेतीमाल दर्जा तपासणी.
- वजन काट्यावर मोजणीची सुविधा.
श्वेता ठाकरे-महल्ले ९३२५०३०९५३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.