Beekeeping Agrowon
यशोगाथा

Beekeeping : मधमाशांसोबत दोस्ती करायला शिकवणारी ‘सीबीआरटीआय’

Bee Research : पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (सीबीआरटीआय) मधमाशीपालन विषयात अखंड कार्यरत राहून ६० वर्षांचा पल्ला पार केला आहे.

मंदार मुंडले 

Beekeeping Update : परागीभवनाद्वारे पीक उत्पादन वृद्धी, मध, पूरक उत्पादने या अनुषंगाने मधमाशांचे महत्त्व व जाणीव जागृती वाढली आहे. हवामान बदल, रसायनांचा असंतुलित वापर, शत्रूंचे आक्रमण आदी कारणांमुळे मधमाशांची संख्या घटते आहे.

दुसरीकडे मधपेट्यांद्वारे शास्त्रीय मधमाशीपालनाकडे ओढाही वाढला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे (शिवाजीनगर) येथील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (सेंट्रल बी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट- सीबीआरटीआय) मधमाशीपालन विषयातील कार्याचा वसा ६० वर्षांपासून अखंड चालवत आहे.

एक नोव्हेंबर, १९६२ रोजी स्थापन झालेली ही संस्था खादी आणि ग्रामोद्योग आयोगांतर्गत देशपातळीवर कार्यरत आहे. संस्थेचे उपसंचालक- प्राचार्य ((प्रभारी) श्री. बसवराज म्हणाले की देशात मधमाशीपालन उद्योगाचे क्लस्टर्स तयार करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

चार ‘क्लस्टर्स’ साठी सरकारला दिलेल्या प्रस्तावांपैकी दोन मंजूर झाले आहेत. महाराष्ट्रात महाबळेश्‍वर येथे क्लस्टर कार्यान्वित आहे. संस्थेचे विविध विभाग आहेत. त्यांचा थोडक्यात परामर्श घेऊया.

सुसज्ज ग्रंथालय

-सुसज्ज ग्रंथालय (रिसर्च लायब्ररी) हे या संस्थेचे वैशिष्ट्य.‘इंटरनॅशनल बी रिसर्च असोसिएशन’ या इंग्लंड स्थित संस्थेकडून त्यास मान्यता.

-तब्बल तीनहजार पुस्तके, दोनहजार जर्नल्स, परदेशी १७ ते १८ (ताजी), भारतीय जर्नल्स १० ते १५ (ताजी), संशोधन पत्रिका (रिसर्च पेपर्स), ‘टेक्निकल बुलेटिन्स’, विविध देशांतील मासिके, पाक्षिके अशी सुसज्ज ज्ञानसंपदा.

-पुस्तकाचे लेखक, प्रकाशक, प्रसिध्दी तारीख, पुस्तकाचा गोषवारा, उपलब्धता आदी माहिती देणारी तब्बल दोन लाख ‘रेफरन्स कार्ड्स. त्यांचे क्रमांक व ग्रंथालयातील ‘सॉप्टवेअर’ च्या मदतीने संबंधित पुस्तक शोधणे सोपे जाते.

पुस्तकांचे विषयानुरूप विभाग

-मधमाशीला आनुषंगिक विषयांचे स्वतंत्र शेल्फ. यात रसायनशास्त्र, जेनेटिक्स, वनस्पतिशास्त्र, कीटकशास्त्र, प्राणिशास्त्र, जीवशास्त्र, अन्य देशांतील मधमाशीपालन, विविध भागातील उपयुक्त फुलोरा,

पोलन, नेक्टर देणाऱ्या वनस्पती, पॅलिनोलॉजी, पॉलीनेशन, मधमाशीपासून मिळणारे उपयुक्त घटक, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डस (बीआयएस), एपिमोंडिया (जगभरातील परिषदांचे प्रोसिडिंग, मिनटस) असे हे विभाग.

संग्रहालय

-संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावर छोटेखानी संग्रहालय. येथील प्राचीन, आधुनिक सामग्री, वस्तू, पाहण्याबरोबर संस्थेचे सह संचालक सुनील पोखरे यांच्या माहितीतून ज्ञानाचा खजिनाच समोर येतो.

-प्रत्येक राज्यात मधमाशांना लागणारा फुलोरा (खाद्य) हंगामानुसार वेगवेगळा. त्यानुसार पराग, मकरंद केव्हा, किती प्रमाणात मिळतात याचे पंजाब, आसाम आदी राज्यनिहाय फुलोरा कॅलेंडर्स चार्टच्या रूपाने येथे पाहण्यास मिळतात.

-मधमाशी वनस्पतिशास्त्र- संशोधन कार्य, माशांच्या प्रकारानुसार तसेच एकाच वनस्पतीचा फुलोरा (सिंगल), विविध वनस्पतींचा फुलोरा (मल्टीफ्लोरल) यानुसार मधाचे प्रकार. त्यातील परागांचे सूक्ष्मदर्शकाखाली वितरण. परागीभवनासाठी उपयुक्त विविध पिकांची यादी, वर्षभर मधमाशीपालकांना करावी लागणारी कामे.

उदा. मध काढणी, पेट्यांचे स्थलांतर, मधमाशांचा प्रजनन काळ, वसाहत विभागणी, आदी बाबी पोस्टर व ग्राफीक्सच्या रूपाने मांडल्या आहेत.

-संस्थेने पोलन संकलन ट्रॅप विकसित केला आहे. या परागांपासून कॅप्सूल्स वा टॅब्लेटस तयार करता येतात. त्या शक्तिवर्धक असून त्यांची किंमत किलोला दीड ते दोनहजारांहून अधिक आहे.

-तमिळनाडू, केरळ आदी राज्यात महिला मधमाशीपालनात आघाडीवर आहेत. आपल्या राज्यातही त्यांची संख्या वाढत असल्याची समाधानाची बाब आहे.

संग्रहालयातील मधपेट्यांचे प्रकार

-१८ व्या शतकातील टोपल्याची मधपेटी. बांबू, झाडांच्या ओंडक्यात मधमाशीपालन व्हायचे.

-पुस्तकाची पाने उलगडावीत तशी पुस्तकाप्रमाणे रचना असलेली प्राचीन मधपेटी. अर्थात त्यातून मध काढता येत नाही.

-सन १८५४ मध्ये लॅंगस्ट्रोथ यांनी आधुनिक मधपेटीचा शोध लावला. तेथून सुधारित मधपेट्या निर्मितीला चालना मिळाली.

-ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डसनुसार ए टाईप पेटी- भारतीय (सातेरी) मधमाशांसाठी. सपाटी प्रदेशात उपयोगी.

-बी टाइप पेटी- डोंगराळ भागासाठी.

-भौगोलिक स्थानानुसार मधमाशांच्या शरीराचा आकार लक्षात घेऊन दोन फ्रेममधील अंतर ठरवून या पेट्यांची निर्मिती.

-एलटी पेटी- एपीस मेलिफेरा या युरोपिय मधमाशीपालनासाठी. तिच्यापासून वर्षाला प्रति पेटी ४० ते ५० किलो मध मिळतो. त्यामुळे जगभरात तिचे पालन होते.

-वास्प कंट्रोल पिंजरा- गांधीलमाशीसारखे शत्रू मधमाशा व पेट्यांवर आक्रमण करतात. मध खातात. त्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्याच्या आत साखरपाणी किंवा गुळाचा पाक ठेवला जातो. गांधीलमाशी पिंजऱ्यात शिरली की तिला बाहेर पडता येत नाही. ती ‘ट्रॅप’ होते.

-काचपेटीत मधमाशांचे प्रकार, कामकरी माशा, नर, राणी तर ग्लासजारमध्ये मधमाशांचे शत्रू उदा. पाल, सरडे आदी ‘प्रिझर्व्ह’ अवस्थेत ठेवले आहेत.

-स्टिंग प्रूफ ड्रेस- आग्या मधमाशीचे पोळे काढण्यासाठी संरक्षक पोशाख.

-स्मोक- आग्या मधमाशा आक्रमक असतात. त्यांना पोळ्यांपासून योग्य पद्धतीने दूर करण्यासाठी छोटे यंत्र पुरेसे होत नाही. त्यासाठी अशा स्मोकरची गरज भासते.

मध काढणी यंत्र

'फूड ग्रेड किंवा ‘बीएसआय’ स्टॅंडर्डप्रमाणे स्टेनलेस स्टीलच्या मध काढणी यंत्राचे चार व आठ फ्रेमचे असे प्रकार आहेत. सातेरी, इटालियन माशांची मध देण्याची क्षमता व संख्येनुसार यंत्रांचा आकार छोटा-मोठा असतो.

सौरऊर्जेवर मेणनिर्मिती

खराब वा तुटलेली पोळी फेकून देता एकत्र करून सौरऊर्जेवरील यंत्राद्वारे शुध्द मेण तयार करता येतो.

मध प्रक्रिया प्रकल्प मॉडेल

मध प्रक्रिया प्रकल्पाचे छोटे मॉडेल संग्रहालयात पाहण्यास मिळते. भारतात असे १० ते १२ व्यावसायिक प्रकल्प खासगी वा सहकारी तत्त्वावर कार्यरत. महाराष्ट्रात महाबळेश्‍वर, वर्धा आदी भागात ते आढळतात.

प्रयोगशाळा

संस्थेच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत मधाचे विविध नमुने परिक्षणासाठी येतात. ‘ॲगमार्क’ प्रमाणपत्रातील गुणवत्तेचे निकषांनुसार (पॅरामीटर्स) त्यांचे पृथ्थकरण होते. संस्थेने मध परिक्षण संच (हनी टेस्टिंग कीट) विकसित केला आहे.

त्याद्वारे ‘ॲगमार्क’च्या चार गुणवत्तेचे निकष तपासता येतात. यातील महत्त्वाचे म्हणजे मधात भेसळ आहे का? असल्यास कशाची त्याचे परिक्षण करता येते. या कीटमध्ये आवश्‍यक रासायनिक उपकरणे व रसायने असतात.

परागांवरून मधाची ओळख

-वनस्पतिशास्त्र प्रयोगशाळेत होते मधातील परागांचे पृथ्थकरण (पोलन ॲनॅलिसिस).

-त्यावरून मध कोणत्या वनस्पतीचा, सिंगल फ्लोरल की अनेक फुलांचा (मल्टीफ्लोरल) याची होते ओळख.

-प्रति ग्रॅम मधामागे परागांची संख्या (पोलन काऊंट) तपासता येते. ‘ॲगमार्क’ वा फूड सेफ्टी संस्थेच्या निकषांनुसार ती पाचहजार ते ५० हजारांपर्यंत असावी लागते.

-भारतात निलगिरी, जांभूळ, लिची, बाभूळ, मोहरी यांचे मध तुलनेने अधिक उपलब्ध होतात. ‘मल्टी फ्लोरल’ मध्ये प्रामुख्याने जंगली झाडांचा मध असतो.

-मधमाशांना वर्षभर कोणत्या ठिकाणी, कोणत्या वनस्पतींचा फुलोरा उपलब्ध असतो त्याचे कॅलेंडर वनस्पतिशास्त्र विभागाने तयार केले आहे. भारतात ऑक्टोबर- ते डिसेंबर व मार्च ते मे या दोन हंगामांत मधमाशा स्थलांतर करतात. तसा मायग्रेशन चार्टही बनविला आहे. या आधारे मधमाशीपालक आपल्या मधपेट्या त्या त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात.

-या विषयातील तीनहजारांहून अधिक ‘स्लाईडस’चीही निर्मिती.

-नारळाचा किंवा बहुविध फुलोरा असलेला पराग विक्रीस उपलब्ध केला जातो.

-रसायनशास्त्र विभागात श्रुती कुंभार, मलव्वा माळी तर वनस्पतिशास्त्र विभागात गौरी चव्हाण, साक्षी शिंदे या युवा संशोधक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. त्यांनी उपयुक्त माहिती उपलब्ध केली. त्यांच्या सहकारी शिवांगी मौर्य प्रशिक्षणाची जबाबदारी पाहतात.

मध शुद्धीकरण प्रकल्प

मधप्रक्रिया उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी संस्थेचा मध शुद्धीकरण प्लांट अनुभवता येईल. दिवसाला पाचशे किलो मधावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. येथे विविध टॅंक, मायक्रो फिल्टर, मॉयश्‍चर युनिट आदी यंत्रणा आहे.

प्रक्रियेतून मधातील मधमाशीचे पंख वा अनावश्‍यक घटक वेगळे होऊन शुध्द मध ‘सेटलिंग टॅंक’मध्ये येतो. दोन- तीन दिवस थंड झाल्यानंतर तो बाटलीबंद करता येतो. राजेंद्र आडपाटीकर येथील प्रकल्पाची जबाबदारी पाहतात.

मेणपत्रा तयार करणारे स्वयंचलित यंत्र

पोळे तयार करण्यापूर्वी त्याच्या लाकडी फ्रेमला मेणपत्रा (फाउंडेशन वॅक्स शीट) लावणे गरजेचे असते. त्याआधारे मधमाशांना लगेच पोळे बांधणी सुरू करणे सोपे होते. संस्थेकडे स्वयंचलित यंत्राद्वारे असे मेणपत्रे तयार करण्याची सुविधा आहे. महाराष्ट्रात आजमितीला असे हे एकमेव यंत्र असावे. सन २००६ मध्ये घेतलेल्या या यंत्राची किंमत सुमारे २२ लाख रुपये होती.

यात मेणपत्र्याची मोठी शीट तयार होऊन त्यापासून हव्या त्या आकाराच्या छोट्या शीटस तयार होतात. मोठे मधमाशीपालक, मध व्यापारी यांना पुरवठा होतो. प्रति शीट किंमत किलोला ५६० रुपये असते. प्रति किलोत १३ ते १४ शीटस असतात. मधमाशांच्या वसाहतींच्या आकारानुसार त्या घ्याव्या लागतात.

हनी पार्लर

-हनी पार्लरमध्ये विविध संस्थांकडील मधाचे ब्रॅण्डस विक्रीस ठेवले जातात.

-खादी आयोगाद्वारे तसेच ‘ॲगमार्क’ प्रमाणित हा मध.

-संस्थेतील प्रयोगशाळेत गुणवत्तेचे परिक्षण झाल्यानंतरच तो विक्रीस उपलब्ध.

-दर दिवशी हजारो रुपयांची विक्री होते. पार्लरचे नुकतेच नूतनीकरण झाले आहे.

संस्थेचे मधमाशीपालन प्रशिक्षण अभ्यासक्रम १)सहा महिने, एक महिना, पाच दिवसीय असे अभ्यासक्रम आहेत. प्रकारानुसार शैक्षणिक पात्रता व वयाची अट आहे. (काही ठिकाणी वयाची अट शिथिल). अभ्यासक्रम सशुल्क तसेच विद्यार्थ्यांना ‘स्टायपॅंडची सोय आहे.

प्रशिक्षण विषय

मधमाशांचे प्रकार- उदा. आग्या मधमाशा, सातेरी- एपिस सिराना इंडिका,

फुलोरी- एपिस फ्लोरिया, युरोपीय (इटालियन) मधमाशी- ॲपिस मेलिफेरा, पोळ्याची- ट्रायगोना (स्टिंगलेस)

-मधमाशांचा जीवनक्रम, वसाहती हाताळणे, सर्व ऋतूंमधील व्यवस्थापन, प्रजनन, मध काढणी आदी.

२) एक दिवसीय मध परिक्षण अभ्यासक्रम- मधाची गुणवत्ता, भेसळ, परिक्षण करणे.

३) मध प्रक्रिया- पाच दिवसीय- सशुल्क.

४)शाळा, महाविद्यालयांच्या ठिकाणीही पाच दिवसीय प्रशिक्षण सोय. पुणे, लातूर, सोलापूर, नगर- लोणी, पांढरकवडा- यवतमाळ, वरोरा-चंद्रपूर आदी ठिकाणी असे वर्ग घेतले. संस्थेकडून प्रशिक्षित व दहा वर्षांचे अनुभवी मास्टर ट्रेनर बी कीपर्सचा त्यासाठी उपयोग.

५)पूर्वी आग्या मधमाशांचे पोळे तोडून रानटी पद्धतीने मध काढला जायचा. या पद्धतीला आळा घालताना पोळे न तोडता मध काढण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण प्रत्यक्ष जंगलात दिले जाते. तानसा अभयारण्यातील ७५ आदिवासी महिलांना हे प्रशिक्षण दिले. त्यांना मधउत्पादनाद्वारे रोजगार मिळाला आहे. भामरागड- गडचिरोली, कोल्हापूर, पांढरकवडा, नागपूर, अमरावती भागातही असे प्रशिक्षण दिले.

तयार केले मास्टर ट्रेनर

-वर्षभरात हजार ते बाराशे उमेदवार संस्थेकडून होतात प्रशिक्षित. यात युवा वर्गाची संख्या अधिक हे विशेष.

-महाराष्ट्रासह आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश

येथून शेतकरी, शासकीय, कृषी, ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. त्याआधारे काहींना आपल्या राज्यात मधमाशीपालन कार्यक्रम राबवायचा आहे.

-काही वर्षांपूर्वी श्रीलंका, बांगला देश, टांझानिया आदी देशांतूनही उमेदवार प्रशिक्षणासाठी आले.

-सुक्षिशित बेरोजगारांना उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रशिक्षणातून प्रयत्न.

-साठ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल चार ते पाच लाख जणांना प्रशिक्षित करण्याचे कार्य संस्थेने पार पाडले.

-संस्थेचे सह संचालक सुनील पोखरे १९८४ पासून संस्थेत कार्यरत. मधमाशीपालनातील ज्ञानी व गाढे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख. प्रशिक्षण प्रमुख असाही त्यांच्याकडे पदभार. ते सांगतात की महाराष्ट्रात मधमाशीपालकांची संख्या चार ते पाचहजारांपर्यंत असावी. ३० हजार ते ४० हजारांपर्यंत मधमाशांच्या वसाहती असाव्यात.

मधमाशी दिनाचे औचित्य

स्लोव्हेनिया देशातील ॲटॉन जांसा यांचा जन्म २० मे, १७३४ मध्ये तर १७७३ मध्ये निधन झाले. या थोड्या आयुष्य काळात त्यांनी मधमाशीपालन विषयात खूप कार्य केले. या विषयावरील जगातील पहिली शाळा सुरू केली. पुस्तक लिहिले.

या कार्याची दखल म्हणून त्यांच्याच जन्मदिनावरून २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. मधमाशीला राष्ट्रीय कीटक म्हणून घोषित करा असा प्रस्ताव शासनाला देणारे ‘सीबीआरटीआय’ चे माजी संचालक डॉ. आर.पी. फडके यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचीही आठवण संस्थेत अनेक महान शास्त्रज्ञांच्या बरोबरीने जतन केली जाईल.

संपर्क- सुनील पोखरे- ७३८५२८९७०९, (साहायक संचालक, ‘सीबीआरटीआय’)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT