Khoya Production
Khoya Production  Agrowon
यशोगाथा

Khoya Production : खवा, पेढे निर्मितीत कमावले नाव

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील चितळी हे शेवगाव रस्त्यावरील गाव. रस्त्यावरच एका विक्री केंद्रावरील जगदंबा खवा सेंटर (Jagadamba Khoya Center) दृष्टीस पडतो. मदन व मंगल हे म्हस्के दांपत्य हा व्यवसाय चालवतात. बीड जिल्ह्यातील डोंगराळ, दुष्काळी भागातील शेडाळा (ता. आष्टी) हे मदन यांचे मूळ गाव.

काही कारणाने वडिलांनी शेती विकली. इयत्ता चौथीत असतानाच मदन आईच्या मायेला पारखे झाले. जगण्याचा संघर्ष करत ते दोन धाकट्या बहिणींसह मामा विठ्ठल कदम यांच्या घरी चितळी (ता. पाथर्डी) येथे आले. मामानेच भाच्यांना वाढविले. पुढे उदरनिर्वाहासाठी मग मदन यांचा संघर्ष सुरू झाला.

पारंपरिक व्यवसायाने दाखविला मार्ग

पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध वृद्धेश्‍वर, कानिफनाथ आणि आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ समाधी परिसरातील डोंगराळ भागातील अनेक गावे दुष्काळी आहेत. त्यामुळे शेतीला पूरक म्हणून दूध आणि त्यापासून खवा हे पन्नास वर्षांच्या आधीपासूनचे या भागातील गावांचे सूत्र आहे.

ही गावे पारंपरिक पद्धतीने खवानिर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. शेडाळा याच भागातील गाव आहे. त्यामुळे मदन यांच्याही घरी पिढ्यान् पिढ्या खवानिर्मिती व्हायची. मदन यांनी मग गावाहून खवा आणून चितळी भागात विकायला सुरुवात केली. सोबतीला १९९० पासून छायाचित्रण व्यवसाय सुरू केला.

तो २०१४ पर्यंत सुरू ठेवला. विविध वर्तमानपत्र संस्थांसाठीही त्यांनी सेवा दिली. मात्र ‘स्मार्ट मोबाईल’च्या युगात व्यवसायाचा प्रभाव कमी झाला. अशावेळी पर्यायी व्यवसायाचा शोध सुरू असताना मदन यांना पारंपारिक खवा व्यवसायानेच मार्ग दाखवला.

खवा निर्मितीस प्रारंभ

चितळी भागात दुग्धोत्पादकांची संख्या अधिक आहे. दूध संकलन केंद्रेही आहेत. शिवारातच खात्रीशीर दूध उपलब्ध होत असल्याने येथेच खवा व पेढेनिर्मिती करण्याचे मदन यांनी निश्‍चित केले. चितळीत सुरेश ताटे यांचे दूध संकलन केंद्र आहे. त्यांची मोठी मदत मदन यांना झाली. येथूनच दूध उपलब्ध होऊ लागले.

सुरुवातीला पन्नास लिटरपासून खवा तयार करणे सुरू केले. मागणी वाढू लागली तशी दूध खरेदीत वाढ झाली. व्यवसायासाठी माजी सरपंच सुभाष ताठे, दादा महाराज नगरकर, आदिनाथ महाराज यांनीही पाठबळ दिले. मदन यांच्या पत्नी मंगल यांचे माहेर चितळीच. त्यांची मोलाची मदत

व्यवसायात होते. भाजणीचा खवा, पेढे दोघे मिळून तयार करतात. सकाळी सात वाजता दूध खरेदी, त्यातील घटक तपासणे या बाबी होतात. दुपारी तीनपर्यंत खवानिर्मितीची प्रक्रिया चालते. त्यानंतर पेढा बनवायचे काम सुरू राहते. गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याने पंचक्रोशीत मदन यांनी आपली उत्पादने लोकप्रिय केली आहेत. मागणी भरपूर मात्र तेवढा माल उपलब्ध करणे अशक्य अशी वेळ आल्याचे ते सांगतात. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील राजळे परिवार राजकारणात सक्रिय आहे. या परिवाराने वेळोवेळी आधार दिल्याने प्रगतिपथावर राहता आल्याचे मदन सांगतात.

व्यवसाय दृष्टिक्षेपात...

-दररोज सुमारे २०० लिटर दुधाची गरज. डिसेंबर ते मे कालावधीत सण, उत्सव, सोहळे, लग्नसराई यामुळे खवा, पेढ्याला अधिक मागणी. या काळात तीनशे ते चारशे लिटरपर्यंत दूध खरेदी.

-दररोज ४५ किलोपर्यंत खवानिर्मिती. बाकी पेढे तयार करतात. गायीच्या पाच लिटर दुधापासून एक किलो, तर म्हशीच्या साडेतीन लिटर दुधापासून एक किलो खवा तयार होतो.

-परिसरातील हॉटेल व्यावसायिक, स्वीट मार्ट व काही आचारी यांच्याकडून खव्याला चांगली मागणी असते. मागणीनुसार खवा पोहोचही केला जातो.

-गायीच्या दुधाच्या खव्याचा ठोक दर किलोला २३० रुपये, तर म्हशीच्या दुधाच्या खव्याला

२४० रुपये दर. दिवाळी काळात मागणी दुपटीने अधिक. मागणीनुसार बर्फी वा गोल पेढे तयार केले जातात. पाव किलोला ७० ते ९० रुपयांपर्यंत त्याचे दर असतात.

-शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत आठवड्यातील चार दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आठवडे बाजारात मदन स्टॉल उभारून थेट विक्री करतात. त्यातून ग्राहक संपर्क करून घरच्या ऑर्डर्सही देतात. यातून जिल्ह्याबाहेरील ग्राहकांची संख्याही दुपटीने वाढल्याचा अनुभव आहे.

प्रक्रिया उद्योग योजनेतून हातभार

खवानिर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. कृषी विभागाच्या पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेतून सव्वा लाख रुपयांचे अर्थसाह्य मिळाले आहे.

म्हस्के दांपत्याने सुरवातीचे आठ महिने पारंपरिक पद्धतीने चुलीवर खवा तयार केला. अडीच वर्षांपूर्वी ८० हजार रुपये किमतीचे १२० लिटर क्षमतेचे, तर सहा महिन्यांपूर्वी सव्वा लाख रुपये किमतीचे २२० लिटर क्षमतेचे खवा निर्मितीचे यंत्र घेतले आहे. साडेचारशे लिटर क्षमतेचा फ्रिज आहे.

कुटुंबाचा हातभार

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मदन यांनी मुलगा अनिकेतला पदवीपर्यंत शिक्षण दिले. आज तो बॅंकेत नोकरीत आहे. मुलगी अंजली पदवीचे शिक्षण घेत आईवडिलांना व्यवसायात हातभार लावते. एकेकाळी भूमिहीन असलेल्या मदन यांनी चितळी येथे घर बांधले आहे. पूर्वी केलेल्या कष्टांमधून बहिणींची लग्ने करू शकलो. आज व्यवसायातून मिळत असलेल्या यशातून महिन्याला चांगली अर्थप्राप्ती होत असून, कुटुंबाला स्थिरस्थावर करू शकलो, समाधान देऊ शकलो याचे समाधान असल्याचे मदन सांगतात.

संपर्क ः मदन म्हस्के, ९६०४७४५०६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT