Spices Production Agrowon
यशोगाथा

Spices Production : अस्सल वऱ्हाडी मसाला उद्योगाने उंचावले अर्थकारण

अकोला येथील युवा उद्योजक अनिल इंगळे यांनी आजच्या ग्राहकांची गरज व संधी ओळखून अस्सल वऱ्हाडी स्वादातील मसालानिर्मिती व्यवसाय सुरू केला. त्यांच्या ‘ओला मसाला’ (Spices Production) या उत्पादनांना ग्राहकांकडून पसंती मिळवली. आता मसाल्यांची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर करीत त्यांनाही जिल्हा व त्याबाहेर बाजारपेठ मिळवण्यात अनिल यशस्वी झाले आहेत. कुटुंबाचे अर्थकारण उंचावण्यात हा उद्योग कारणीभूत ठरला आहे.

 गोपाल हागे

खरे तर उद्यमशीलता हा अविरत चालणारा प्रवास आहे. जो काळाची दूरदृष्टीने जाणीव करून घेतो, अनुभवातून शिकत बदलांना सामोरा जातो, ग्राहकांची मानसिकता ओळखू शकतो तो आव्हाने पचवू शकतो. त्यातून पुढे जाऊ शकतो. अकोला शहरातील ‘एमएसडब्ल्यू’पर्यंत शिक्षण झालेल्या युवा उद्योजक अनिल इंगळे यांनी थाटलेला वऱ्हाडी मसाला व्यवसाय हे त्याचेच रूप आहे. कुटुंबाच्या मदतीने या युवकाने त्यात भरारी घेतली आहे.

बाजारपेठ ओळखून उत्पादन निर्मिती

शहरातील लहान उमरी परिसरात २००७ च्या सुमारास अनिल यांचे आई-वडील छोट्या टेबलावर अर्धा किलो मसाला ठेवून विक्री करायचे. त्या वेळी त्यांचा चप्पल विक्रीचा देखील व्यवसाय होता. पुढे बदलती बाजारपेठ, ग्राहकांचा कल या गोष्टींचा अभ्यास करून मसाला उद्योगाची जबाबदारी अनिल यांनी स्वीकारली. मसाले उत्पादनात अनेक व्यावसायिक आहेत. मात्र आपले वेगळेपण असावे या दृष्टीने ओला मसाला तयार करण्यास सुरुवात केली. यात लसूण, कांदा, आले पेस्टसह अन्य घटकांचे मिश्रण असते. हा मसाला भाजी तयार करण्यासाठी थेट वापरता येतो. स्वाद व दर्जा टिकवून ठेवल्याने ग्राहकांचा विश्‍वास मिळवताना अनिल स्पर्धेलाही घाबरत नाहीत.

व्यवसायाचा विस्तार

ओला मसाल्याची अर्धा किलो विक्री यापासून सुरू झालेला व्यवसाय दिवसाला सरासरी १५ किलो विक्रीपर्यंत पोहोचला आहे. आठवड्यातील सुट्ट्या वा काही दिवशी ही विक्री २० किलोपर्यंत पोहोचते. या उत्पादनाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून विविध प्रकारचे अन्य मसाले तयार करण्यास सुरुवात केली आहे. अकोला भाग वऱ्हाड प्रांतात मोडतो. या भागाची वेगळी चव ठळकपणे पुढे यावी यासाठी जाणीवपूर्वक लहान भावाच्या नावावरून निखिल वऱ्हाडी मसाला नावाने ब्रॅण्डचे नोंदणीकरणही केले आहे. आवश्‍यक सर्व संमती व प्रमाणपत्रेही घेतली आहेत.

विपणन

आपली उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनिल प्रयत्नशील आहेत. अकोला जिल्ह्यात सर्वत्र त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. शिवाय शेजारील बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांपर्यंतही ते मसाले पोहोचले आहेत. मुंबई, पुणे आदी शहरांत विदर्भातील अनेक मंडळी राहतात. त्यांच्याकडून या वऱ्हाडी चवीच्या मसाल्यांना मागणी असते. अशा शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोरोना काळात मसाले उद्योगाला खूप चांगली संधी उपलब्ध झाली होती. बाहेरील मसाल्यांची आवक कमी झाल्याने स्थानिक उत्पादनांना मागणी वाढली. त्या वेळी ग्राहकांची संख्या वाढवणे शक्य झाल्याचे अनिल सांगतात.

तयार केले जाणारे मसाले

-ओला मसाला, मटण, चिकन, फिश, गरम मसाला, रोस्टेट, कांदा-लसूण, पनीर, बिर्याणी, अंडाकरी, पावभाजी, चाट, मठ्ठा, दूध मसाला, लसूण चटणी, कसूरी मेथी, ग्रेव्ही मिक्स.

-त्याचबरोबर जिरा पावडर, हळद, मिरची, धने पावडर यांचेही उत्पादन.

-सर्व उत्पादनांना अस्सल वऱ्हाडी चव देण्यात आली आहे.

कुटुंबाचे योगदान

सुरुवातीपासूनच या उद्योगात संपूर्ण कुटुंबाचे योगदान आहे. अनिल यांच्यासह वडील पुंडलीकराव, आई नर्मदाबाई, पत्नी रोशनी असे कुटुंबातील सर्व जण व दोन कामगार व्यवसायात राबतात. अनिल यांचा भाऊ निखिल बीएएमएस व एमडी’ असून तो वैद्यकीय ‘प्रॅक्टीस’ करतो. कुटुंबाच्या उद्योगाला त्याचाही हातभार आहे. मसाले विविध भागांत पोहोचवण्यासाठी १५ ते २० व्यक्तींची नेमणूक ‘कमिशन’ तत्त्वावर केली आहे.

अनिल यांना मामा हरिदास वानेरे (चांदूर) यांचेही प्रोत्साहन व सहकार्य उपयोगी ठरले आहे. सांगळूद गाव शिवारात इंगळे यांची दोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यात ते पारंपरिक पिके घ्यायचे. मात्र त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्याइतपत उत्पन्न मिळत नव्हते. मात्र छोटेखानी उद्योगातून अनिल यांना आर्थिक भरभराटीचा, प्रगतीचा मार्ग मिळाला. आज राहत असलेल्या घरासमोर मोठी जागा विकत घेऊन प्रशस्त बांधकाम केले आहे. तेथेच मसाला उद्योग आता मोठ्या स्वरूपात आकाराला येणार आहे.

शासनाचे पाठबळ

उद्योगाला शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचीही मदत झाली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून मसाला पॅकिंग यंत्रासाठी साडेतीन लाखांचे अनुदान मिळाले. यापूर्वी ‘आत्मा’अंतर्गत महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम कार्यक्रमातून मसाला कांडण यंत्रासाठी ३५ हजारांचे पाठबळ मिळाले. आता जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दिला असून, तो लवकरच मार्गी लागेल असे अनिल यांनी सांगितले. हा उद्योग वाढविण्यापूर्वी अनिल यांनी एका प्रशिक्षण संस्थेतून ३० दिवसांचे तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रशिक्षण घेतले. त्यातून उद्योगाला योग्य दिशा देता आली.

गटाद्वारे संघटित होता आले तर विक्री व्यवस्था अजून बळकट होते. शेतकरी कंपनी हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. हीच बाब हेरून अनिल यांनी शेतकरी गटाची स्थापना केली. सोबतच नर्मदा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीची (चांदूर) स्थापन केली. त्याचे २५० शेतकरी सभासद झाले आहेत. कंपनीच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

मसाला उद्योगाविषयी ठळक

-ग्राहकांची गरज ओळखून ओला मसाल्याच्या अर्धा किलोपासून विक्रीला सुरुवात.

-४०० रुपये प्रति किलोने आता थेट विक्री होते.

- उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर केली.

- दिवसाला सुमारे दोन ते अडीच क्विंटल मालनिर्मितीचे उद्दिष्ट.

- स्थानिक पातळीवरून कच्चा माल खरेदीला पसंती

- आकर्षक दर्जाचे व्यावसायिक मूल्य असलेले पॅकिंग.

- चव, दर्जा यात तडजोड नाही.

- वर्षाला ३० लाख रुपयांहून अधिक उलाढाल

अनिल इंगळे, ८९८३५७६३७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IMD Rain Predication : चिंता वाढणार: राज्यात ऑगस्टमध्ये कमी पाऊस; मराठवाडा, विदर्भात खंड पडणार ?

Agrowon Podcast : सोयाबीनचे दर टिकून; आजचे ज्वारी बाजार, ज्वारी दर, बेदाणा भाव, ढोबळी मिरची रेट

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानातील ९५ कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित

Automation In Farming: खते, पाणी बचतीसाठी ऑटोमेशनवर भर 

Nagpur Heavy Rain: नागपुरात अतिवृष्टीमुळे ७,४३० हेक्टरवर नुकसान

SCROLL FOR NEXT