"माझ्या बागेत हापूस आंबा (Hapus Mango) आहेच, त्याचबरोबरीने गोडांबा, लिटी, साखरांबा सारख्या पंधरा रायवळ आंबा जाती (Mango Verity) माझ्या वडिलांनी लावल्यात, त्या मी सांभाळतेय, हापूसपेक्षा रायवळला मागणी आहे, गावातच संपतो. सुपारीची स्थानिक जात माझ्या आजोबांपासून बागेत आहे, रोठ्याला जागेवर मागणी आहे, चढा दर आम्ही घेतोय. शेती बांधावर जामचे चार प्रकार तसेच गावठी कोकम, फणस (Jack Fruit) लगडलेले असतात. माझ्या बागेत रोज ५० पक्षी दिसतात, ब्लू मॉरमन फुलपाखरू देखील दिसेल पहा..."
देरदे (ता.दापोली,जि.रत्नागिरी) गावातील युवा कृषी पदवीधर वीणा खोत कुटुंबाच्या पंचवीस एकरातील वनस्पती आणि पक्षांची जैवविविधता सांगत होती. देरदे शिवारातील फणशी नदी काठाच्या डोंगर उतारावर वीणाची फळबाग आहे. या निसर्गरम्य परिसरातील शेतीबाबत वीणा म्हणाली की, कृषी शिक्षण पूर्ण झाल्यावर पीक, पाणी व्यवस्थापन, दर्जेदार फळ उत्पादन आणि यांत्रिकीकरणावर भर दिला.
याचबरोबरीने शेत शिवारातील वनस्पती, पशू- पक्षांची जैवविविधताही मी जपली आहे. शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी विहीर आहे. वडिलांच्या बरोबरीने मी दैनंदिन शेती व्यवस्थापन पाहते. फळबागेमध्ये दोन कायमस्वरूपी मजूर आहेत. मशागतीसाठी छोटा पॉवर विडर आणि फवारणीसाठी आधुनिक फवारणी पंप आहे.पीक व्यवस्थापनात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करते.
आंबा, काजू व्यवस्थापन
फळबागेबाबत वीणा म्हणाली की, आमची ५० वर्षांपासून वडिलोपार्जित शंभर हापूस आंबा कलमांची बाग आहे. यात काही जुनी तसेच नवीन कलमे आहेत. बागेत पंधरा रायवळ आंबा जातींचे संवर्धन केले आहे. लिटी जातीचे फळ लहान अाहे. गोडांबा हा गोडसर तर साखरांबा अति गोड आणि केसाळ गराचा आंबा आहे. गावामध्येच रायवळला ग्राहक आहे. रायवळमुळे परपरागीकरणासाठी फायदा होतो.
मधमाशा टिकून आहेत. डोंगर उतारावर ४० वर्षांपूर्वी वडिलांनी गावठी काजूची लागवड केली होती. आता काही नवीन कलमे लावली आहेत. फळबागांना ८० टक्के सेंद्रिय आणि २० टक्के रासायनिक खतांचा वापर करतो. सेंद्रिय कीडकनाशके, रक्षक सापळा वापरावर भर आहे. पालापाचोळ्याचे आच्छादन आणि जल,मृद संधारणाच्या उपाययोजनांमुळे डोंगर उतारावरील माती टिकून आहे. आम्हाला दरवर्षी चार टन आंबा उत्पादन मिळते.
मनुष्यबळाची कमतरता असल्याने व्यापाऱ्यांना आंबा विकतो. सगळा खर्च वजा जाता एक लाखांचे उत्पन्न मिळते. जुन्या आंबा कलमांचे पुढील वर्षी पुनरुज्जीवन करणार आहे. जेणेकरून ही कलमे पुढे १५ वर्षे चांगले उत्पादन देतील. डोंगर उतारावर काजू लागवड असल्याने फारसे व्यवस्थापन करणे शक्य होत नाही, तरी दरवर्षी ३०० किलो काजू बी मिळते.त्यातून पंचवीस हजारांचे उत्पन्न मिळते.
बांधावर फळझाडे, मसाला पिके
आंबा, सुपारी, काजू बागायतीबरोबरीने खोत यांनी बांधावर विविध फळझाडांची लागवड केली आहे. याबाबत वीणा म्हणाली की, बांधावर कोकमाच्या स्थानिक जातीची १५ झाडे आहेत. याची फळे मोठी, रसदार आहेत. दरवर्षी आम्ही आगळ आणि आमसूल तयार करतो. काही झाडावरील फळांची लोकांना विक्री करतो. त्यातून दहा हजारांचे उत्पन्न होते. बांधावर पंधरा रामफळाची झाडे आहेत. फळ विक्रीतून चार हजारांचे उत्पन्न मिळते. सुपारीबागेत काळ्या मिरीचे वेल आहेत.
दरवर्षी २५ किलो मिरी मिळते. यातून सात हजारांचे उत्पन्न होते. याचबरोबरीने लवंग, दालचिनी लागवड आहे. काही झाडांवर पानवेल सोडलेले आहेत. सुपारी बागेत गावठी अननसाची लागवड आहे. दरवर्षी २०० फळांचे उत्पादन होते. गावामध्ये प्रति फळ २० ते ४० रुपये दर मिळतो. यातून सहा हजारांची मिळकत होते. वीणाने काळ्या रंगाची साल असलेल्या गावठी काफा फणस जातीचे संवर्धन केले आहे. याचे गरे पिवळसर आहेत. बागेत गावठी फणसाची दहा झाडे आहेत. फळांची विक्री गावामध्ये होते. बागेत चार प्रकारचे जाम पाहायला मिळतात. यामध्ये गुलाब पाण्यासारखी चव असणारा रोझ वॉटर ॲपल जाम, गुलाबी रंग, पांढऱ्या रंगाच्या जाम जातीचे संवर्धन तीने केले आहे.
वेलची,लाल केळीचे संवर्धन
वीणाच्या बागेत वेलची आणि लाल साल असलेली देशी केळीची जात पाहायला मिळते. वेलची केळीची साल पातळ आहे, याची चव चांगली आहे. साठ रुपये डझन दराने विक्री होते. सत्तर वर्षांपासून लाल सालीची केळी जात बागेत आहे. उंच वाढणारी जात असून पाने मोठी आहेत. गोडसर चवीची ही केळी ८० रुपये डझन या दराने स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. या दोन्ही जातींची लागवड वाढविण्यावर भर आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कोकणात भटकी जनावरे, वन्यप्राणी, माकडांचा त्रास फळबागांच्यामध्ये वाढला आहे.त्यावरही उपाय शोधावा लागत आहे.
देशी वृक्ष, वनौषधींची विविधता
खोत कुटुंबाने फळबागेत विविध वनौषधी, वनवृक्षांचे संवर्धन केले आहे. याचा परागीकरण तसेच उपयुक्त कीटक, पक्षी संवर्धनासाठी चांगला फायदा होत आहे. बागेमध्ये साग, एेन, किंजळ,उंडी, सीता अशोक, काळा कुडा, कुंभा, खैर, गेळा,धामण, नाणा,बिब्बा, निरगुडी, भेंडा, पिंपळ, पळस,फणशी,पांगारा, बेहडा, तिरफळ, वावडिंग, आवळा, करवंद, तोरण, टेटू, पायर, हेदू, मेंदी, राय आवळा, लकुट, वारस, रतन गुंज, सातवीण,अळू, आष्टा, नागचाफा, पायर, पेरू, जांभूळ अशी वृक्ष संपदा तसेच काही ऑर्कीड्स फुललेले दिसतात.
याचबरोबरीने तुळस, बेल, अश्वगंधा, अडुळसा, सब्जा,सर्पगंधा, कढीपत्ता तसेच विविध हंगामी फुलझाडांची लागवड आहे. राज्याचे फुलपाखरू ब्लू मॉरमन तसेच धनेश, घार, सनबर्ड, भारद्वाज, बुलबुल,दयाळ,तांबट, मोर यासारख्या पन्नास प्रकारच्या पक्षांचा बागेत वावर असतो. पावसाळ्यात फळबागेत २५ प्रकारच्या अळिंबी फुललेल्या दिसतात. त्यांच्या शास्त्रीय नोंदी आणि छायाचित्रे देखील वीणाच्या संग्रहात आहेत. यावर तिचे अधिक संशोधन सुरू झाले आहे.
शंभर वर्षांपासूनची पाणी पुरवठा पद्धती
खोत कुटुंबीयांनी सुपारी बागेसाठी १०० वर्षांपासूनच्या परंपरागत पाणी पुरवठा पद्धतीचे चांगल्या पद्धतीने जतन केले आहे. याबाबत वीणा म्हणाली की, सुपारी बागेत आजोबांच्या काळापासून २४ तास पाणी पुरवठा असणारी सायफन तंत्रावर चालणारी पाणी पुरवठा पद्धती आहे. डोंगर माथ्यावर फणशी नदीचा उगम आहे. तेथे बारा महिने वाहणारे झरे आहेत. तेथे पाणी आडवण्यासाठी लहान बंधारा घातला आहे. पूर्वी सुरमाडाच्या खोडाचे पाट करून सायफन तंत्राने पाणी सुपारी बागेत आणले जायचे, आता तेथे पाइपलाइन केली आहे. डोंगरातील बंधाऱ्यापासून ते बागेतील टाकीपर्यंत पाइप लाईनने पाणी येते.
टाकीतून पुन्हा पाइप लाईनने तीन एकरातील सुपारी बागेत पाणी पुरवठा होतो. एका बागेत पाइप लाईनवर छोट्या लॅटरल जोडून सूक्ष्म तुषार सिंचनाची सोय केली आहे. पाण्याचा वेगावरच हे तुषार संच फिरतात. आम्हाला पाणी पुरवठ्यासाठी मोटार पंपाची गरज नाही. सायफन पद्धतीने पाणी पुरवठा पद्धतीचे पूर्वीपासून चार वाटेकरी आहेत. लागवड क्षेत्र आणि उपलब्ध पाण्यानुसार प्रत्येकाला दर चार दिवसांनी पाणी पुरवठ्याचा फेरा मिळतो. या वेळापत्रकानुसार प्रत्येकाच्या बागेत पाणी वळवून घेतले जाते. दरवर्षी आम्ही बंधाऱ्याची स्वच्छता आणि दुरुस्ती करतो. ही परंपरा आम्ही जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.
‘देरदे लोकल' सुपारीची लागवड
वीणाच्या बागेत शंभर वर्षांपासून जपलेली स्थानिक सुपारीची जात आहे. या जातीला खोत कुटुंबीयांनी ‘देरदे लोकल' हे नाव दिले आहे. याबाबत वीणा म्हणाली की, डोंगर उतारावर जल,मृद संधारणाच्यादृष्टीने टप्पे करून दीड एकर आणि नदी किनारी दीड एकरावर सुपारी लागवड आहे. एकूण १५०० झाडे आहेत. गरजेनुसार दरवर्षी नवीन रोपे तयार करून बागेत लावतो. आमच्याकडील सुपारीचे वैशिष्ट म्हणजे रोठ्याचा आकार इतर जातींपेक्षा मोठा आहे. चव थोडी तुरट, गोड आहे. सफेद गर आहे. या जातीवर कीड, रोग दिसत नाही, उत्पादनही चांगले मिळते.
ऑक्टोबर ते एप्रिल कालावधीमध्ये काढणी होते. निम्या बागेला पाटपाणी आणि निम्या बागेस सूक्ष्म तुषार सिंचनाने पाणी दिले जाते. गेली चाळीस वर्षे या बागेत पालापाचोळा,गिरीपुष्प, सोललेल्या सुपारी सालांचे आच्छादन करत आहोत. त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढला आहे. सुपीकता टिकून आहे. उन्हाळ्यातही ओलावा टिकून रहातो.दरवर्षी वाळविलेल्या सुपारीचे १,८०० किलो उत्पादन मिळते.
ओली सुपारी २५० ते ३०० रुपये शेकडा, सुकविलेली सुपारी २४० ते २६० रुपये किलो आणि रोठा ६०० रुपये किलो दराने जागेवर विकतो. गुणवत्तापूर्ण सुपारीला व्यापारी, गावातील ग्राहकांची पहिली पसंती आहे. खर्च वजा जाता तीन लाखांचे उत्पन्न मिळते. काही प्रमाणात रोपे तयार करतो. येत्या वर्षात दापोली कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने राष्ट्रीय पातळीवर ‘वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणा'कडे आम्ही संवर्धन केलेल्या ‘देरदे लोकल' या सुपारी जातीची नोंद करण्याचा प्रयत्न करणार आहे.
वीणा खोत ७७९८८४०७१२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.