सूरज माळी यांची द्राक्षशेती व मनुक्यांचे ब्रॅंडसह पॅकींग
सूरज माळी यांची द्राक्षशेती व मनुक्यांचे ब्रॅंडसह पॅकींग  
यशोगाथा

दर्जेदार मनुक्यांचा तयार केला एसएम ब्रॅंड, माळी यांची निर्यातक्षम द्राक्षशेती

Abhijeet Dake

सांगली जिल्ह्यात सोनी येथील सुभाष माळी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत द्राक्षशेतीतून कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली. आज वडिलांकडून उत्तम व्यवस्थापनाचे धडे गिरवीत सूरज व स्वप्नील ही त्यांची दोन्ही मुले निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत. या द्राक्षविक्रीसह एसएम नावाने मनुक्यांचाही ब्रॅंड त्यांनी तयार केला आहे. राज्यासह परराज्यातही त्यास बाजारपेठ मिळवून देत विक्रीचा आलेख वाढवण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर भोसे फाट्यापासून पाच किलोमीटर अंतरावर सोनी गाव वसले आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक गावांप्रमाणेच शेतीच्या सिंचनासाठी पाण्याची कमतरता इथेही आहेच. त्यामुळे पूर्वी अगदी हातावर मोजता येतील इतकेच शेतकरी द्राक्षशेती करीत. येथील शेतकरी अभ्यासू, संशोधक व प्रयोगशील वृत्तीचा आहे. त्यामुळे नवे वाण, तसेच कमी पाण्यात पीक व्यवस्थापनाचे प्रयोग त्यांनी सुरू केले. सन १९८० पासून खऱ्या अर्थाने थॉमसन सीडलेस द्राक्षलागवडही गावशिवारात दिसू लागली. माळी यांची द्राक्षशेती गावातील सुभाष माळी यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती. पूर्ण शेती जिरायती. त्यातील एक एकर बागायती होती. त्यामध्ये ऊस घेतला जायचा. उर्वरित क्षेत्रात हंगामी पिके होती. त्यातून कुटुंबाची गुजराण समाधानकारक होत नव्हती. मग सुभाष यांनी १९८७ ते १९९९ पर्यंत खासगी नोकरी केली. त्या वेळी बंधू जयवंत शेती करायचे. त्यातून कुटुंबाचे आर्थिक नियोजन चालायचे. पुढे सुभाष यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीच करायचे ठरवले. गावात वाढणारी द्राक्षशेती पाहून माळी यांनीदेखील याच पिकाचा पर्याय निवडला. सन १९९९ पासून ते या शेतीत आहेत. वास्तविक पाहाता सोनी गाव द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. व्यापारी गावात येऊन खरेदी करतात. द्राक्षातून प्रगती द्राक्षातून चार पैसे मिळू लागल्याने दोन एकर शेती विकत घेतली. हळूहळू सोनाका, ज्योती सीडलेस, आर. के., सुपर सोनाक्का या वाणांची विविधता बागेत दिसू लागली. स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांची विक्री केली जायची. याच पिकातून सुभाष यांनी आपल्या मुलांना शिक्षित केलं. सूरज इंजिनिअर झाले तर स्वप्निल यांनी कृषी क्षेत्रात ‘बिझनेस मॅनेजमेंट’चे शिक्षण पूर्ण केले. दोघेही आता शेतीतच करियर घडवीत आहेत. एकत्र कुटूंब असल्याने आता द्राक्षशेती कसायला सर्वांचीच मदत होत आहे. प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून दिली आहे. या पिकामुळे आर्थिक प्रगती झाली खरी. पण अनेकवेळा प्रतिकूल वातावरणाचा पिकाला फटका बसायचा. कधी उत्पादन तर कधी दर कमी मिळायचे. पण हे पीक या कुटुंबाने टिकवून धरले. कष्टाला पर्याय नाही सुभाष सांगतात, की आम्ही कष्टातून दिवस काढले. नोकरीही केली. तुम्ही कोणतेही काम करा, कष्ट करायलाच हवेत. त्याशिवाय ध्येयपूर्ती साधता येत नाही. आम्हाला पूर्ण शिक्षण घेता आले नाही, त्यामुळे मुलांच्या शिक्षणात हयगय ठेवली नाही. नोकरीच्या मागे न लागता शेतीतच काहीतरी घडवा असे माझे मुलांना सांगणे आहे. त्यानुसार मुलांनी पुढली वाट धरली आहे. संकटातून शोधली संधी सूरज यांनाही शेतीची पहिल्यापासून आवड होती. द्राक्ष शेतीतील बारकावे ते वडील, काका यांच्याकडून घेत होते. अनेकवेळा अपयशही आले. पुढे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. मात्र संकटातून मार्ग मिळतो ही आशा कायम होती. सन २०१५ मध्ये म्हणजे शिक्षण सुरू असताना बाग काढणीला आली होती. अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि बागेचे प्रचंड नुकसान झाले. मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार होता. पावसात कमी नुकसान झालेल्या व मध्यम प्रतिच्या द्राक्षांपासून मनुके तयार करण्याची कल्पना अचानक सूरज यांच्या डोक्यात आली. मोकळ्या जागेत ही द्राक्षे उन्हात सुकण्यासाठी ठेवली. मनुके तयारही झाले पण विक्री कुठे करायची, असा प्रश्न उभा ठाकला. पण प्रयत्न केल्याने पुण्यातील ग्राहकांकडून पसंती मिळाली व विक्रीही चांगली झाली. मग मनुका निर्मितीची ऊर्जा मिळाली. द्राक्षांसोबत मनुकानिर्मितीही सोनी गाव परिसरात निर्यातक्षम द्राक्षबागायतदार आहेत. अशावेळी निर्यातक्षम द्राक्षांच्या विक्रीनंतर निर्यातीला जाऊ न शकणाऱ्या प्रतिची द्राक्षे सूरज यांनी या शेतकऱ्यांकडून घेण्यास सुरुवात केली. ही द्राक्षे रासायनिक अवशेषमुक्त असतात. स्वतःकडील द्राक्षांबरोबर त्याचेही मनुके तयार करण्यास सुरुवात झाली. त्यांच्या उन्हात सुकवण्याच्या क्रियेला १० ते १२ दिवस लागतात. पाच किलो द्राक्षांपासून एक किलो मनुके तयार होतात. एसएम नावाने ब्रॅंडिंग व मार्केटिंग मनुक्याला असलेली मागणी सूरज यांच्या लक्षात आली होतीच. त्यांनी अधिक अभ्यास केला. ग्राहक वर्ग वाढला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मग त्यांनी व्यापारी, बेकरी व्यावसायिकांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यांना मनुक्याचा नमुना (सँपल) मोफत देण्यास सुरुवात केली. दरम्यान, स्वतःच्या व्यवसायाचे ‘वेबपेज’ तयार केले. ‘इंडिया मार्ट’च्या आधारे व्यवसायाचे ब्रँडिंग केले. या माध्यमातून मागणी वाढत गेली. परराज्यातील काही व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद लाभला. सूरज म्हणाले की पॅकिंग व ब्रॅंडिंग चांगले केले तरच बाजारपेठ मिळवता येते. मागणी, कल लक्षात घेऊन दर्जेदार आणि टिकावू पॅकिंगची माहिती इंटरनेटवरून घेतली. त्यानुसार, पाऊचची निवड केली. सर्व प्रयत्नांमधून आता सूरज यांनी आपल्या एसएम ब्रॅंड मनुक्यांसाठी बाजारपेठ तयार करण्यास यश मिळवले आहे. सूरज यांची द्राक्ष शेती दृष्टिक्षेपात

  • द्राक्षांचे उत्पादन - एकरी १० ते १२ टन
  • खासगी कंपन्यांना द्राक्षांची विक्री. त्यास किलोला ६० रुपये व त्याहून अधिक दर (वाण व प्रतिनुसार)
  • उर्वरित द्राक्षांपासून मनुके निर्मिती. पॅकिंग करून ते शीतगृहातही ठेवण्यात येतात.
  • दहा खासगी कंपन्यांशी करार करून त्यांना विक्री.
  • एका औषध कंपनीलाही मनुके देण्यात येतात.
  • २५० ग्रॅम व ५०० ग्रॅम या पॅकिंगमध्ये उपलब्ध
  • झालेली मनुके विक्री (स्वतःकडील द्राक्षे व शेतकऱ्यांकडून घेतलेल्या द्राक्षांसह)

  • वर्ष विक्री दर (प्रति किलो)
  • २०१६.... ८ टन..... १५० ते १६० रु.
  • २०१७... १२ टन..... १५० ते १६० रु.
  • २०१८.... २० टन दर वरीलप्रमाणेच
  • संपर्क - सूरज माळी - ९९७०५९६२६६, ७६२०६१९९६६  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

    Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

    Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

    Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

    Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

    SCROLL FOR NEXT