झाडाला लगडलेली करवंदे व फुले. 
यशोगाथा

रानमेवा करवंदाची बावीस एकरांत व्यावसायिक शेती

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चिंचखेडा बुद्रुक (जि. जळगाव) येथील मंगेश व मुकेश या पाटील बंधूंनी गुलाबी करवंद या रानमेवा पिकाची व्यावसायिक शेती फुलवली आहे. तब्बल २२ एकरांत ही लागवड असून गुजरात, मध्य प्रदेशात चांगले दर मिळवत त्यांनी या करवंदाला सक्षम बाजारपेठ मिळवली आहे.

Chandrakant Jadhav

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चिंचखेडा बुद्रुक (जि. जळगाव) येथील मंगेश व मुकेश या पाटील बंधूंनी गुलाबी करवंद या रानमेवा पिकाची व्यावसायिक शेती फुलवली आहे. तब्बल २२ एकरांत ही लागवड असून गुजरात, मध्य प्रदेशात चांगले दर मिळवत त्यांनी या करवंदाला सक्षम बाजारपेठ मिळवली आहे.   जळगाव जिल्ह्यातील चिंचखेडा बुद्रुक (ता. मुक्ताईनगर) सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. पूर्णा नदीच्या लाभक्षेत्राचा काहीसा लाभ या भागाला होतो. काळी कसदार, मध्यम प्रकारची जमीन भागात आहे. येथील मंगेश व मुकेश या पाटील बंधूंची २४ एकर शेती आहे. गुलाबी करवंद हे त्यांचे सध्याचे मुख्य पीक तब्बल २२ एकरांत आहे. करवंद लागवडीची प्रेरणा पाटील यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती चिंचखेडा शिवारात होती. वडील ‘लीज’वरही शेती करायचे. केळी, कापूस आदी पिके होती. मंगेश यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीकडे लक्ष देण्याबरोबरच आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी गुलाबी करवंदाचा व्यापार २०१२ मध्ये सुरू केला. नागपूर भागातील ही व्यापार व्यवस्था व साखळी त्यांनी अभ्यासली. त्यानंतर भागातील शेतकऱ्यांकडून करवंदांची खरेदी करून सुरत (गुजरात), इंदूर (मध्य प्रदेश) येथील बाजारांसह प्रकिया उद्योगांना विक्री सुरू केली. करवंदाला असलेली मागणी व मिळणारे दर, तसेच कमी देखभाल व खर्चात मिळणारे उत्पादन या बाबी पाहता त्याची व्यावसायिक शेती करण्याचे ठरविले. सुरू झाली करवंद शेती व्यापारातील प्रगती व वडिलांची भक्कम साथ यातून चिंचखेडालगत निमखेडी (ता. मुक्ताईनगर) शिवारात १२ एकरांत करवंद लागवडीस सुरुवात झाली. पाण्याचा मजबूत स्रोत घेण्यासाठी पूर्णा नदीवरून जलवाहिनी केली. विहिरीलाही मुबलक पाणी होते. सन २०१६ मध्ये तीन एकरांत आणखी लागवड वाढवली. असे करीच टप्प्याटप्प्याने आजच्या घडीला २२ एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र पोहोचवले आहे. गुलाबी आकर्षक रंग असल्याने हे फळ गुलाबी करवंद म्हणून ओळखले जाते. हे पीक विदर्भात पाहण्यास मिळते. खानदेशात तसे ते फार पाहण्यास मिळत नाही. व्यवस्थापनातील मुद्दे मध्यम जमिनीत प्रति एकरी सुमारे साडेसातशे ते आठशेपर्यंत झाडांची संख्या आहे. ठिबकने पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. नव्या बागेत पहिली तीन वर्षे कापूस, कांदा, गहू आदी आंतरपिके घेण्यात येतात. सुरुवातीला रोपे नागपुरातील रोपवाटिकेतून २० रुपये प्रति नग याप्रमाणे घेतली. पिकाला सुरुवातीला वर्षभर पाणी, शेणखत, कीडनाशके याबाबत काटेकोर नियोजन करावे लागते. मार्चमध्ये फुले लगडण्यास सुरुवात होते. ही प्रक्रिया उन्हाळाभर सुरू असते. जूनमध्ये फळे तयार होण्यास सुरुवात होते. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काढणी सुरू होते. ती महिनाभर सुरू असते. या पिकात सर्वाधिक खर्च काढणीचाच असतो. त्यासाठी प्रति किलो चार रुपये मजुरी द्यावी लागते. या पिकाचे फायदे

  • उन्हाळ्यात महिन्याला दोन ते तीन तर अन्य हंगामांतही एकवेळ किंवा गरजेनुसार पाणी देणे पुरेसे ठरते.
  • पीक संरक्षण, अन्नद्रव्ये यावर फारसा खर्च होत नाही. फुले व फळे अवस्थेत फवारणी, खते यांचे नियोजन होते.
  • वास्तविक सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी करवंदाचे पीक आहे. मात्र शेळ्या, मेंढ्या, हरिण, रानडुक्कर आदी त्याला भक्ष्य बनवित नसल्याने राखणदारीची गरज नाही.
  • झाडाला अणकुचीदार व मोठे काटे असल्याने अनेक शेतकरी शेताला नैसर्गिक कुंपण म्हणूनही करवंदाची बांधावर लागवड करू शकतात.
  • नव्या बागेत सुरुवातीची तीन वर्षे घेतलेली आंतरपिके बोनस उत्पन्न देऊ शकतात.
  • निविष्ठांचा खर्च कमी असतो. मजुरी व अन्य खर्च फारसा नसल्याने बैलजोडी, ट्रॅक्टर, सालगडी आदी यंत्रणा मोठ्या प्रमाणात सांभाळण्याची गरज नाही.
  • उत्पादन लागवडीनंतर सुमारे दोन ते तीन वर्षांनंतर फळे येण्यास सुरुवात होते. सुरुवातीला एकरी २० क्विंटल व त्यानंतर ४० ते ५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू लागले आहे. हे पीक किमान ३० वर्षे फळे देत राहील असे मंगेश सांगतात. सुरुवातीचा खर्च, तोडणीसह अन्य मजुरी, कीडनाशके, खते आदी मिळून एकरी किमान ४० हजार रुपये खर्च येतो. नव्या लागवडीवेळेस रोपे व ठिबक यंत्रणा यावर एकरी सुमारे ३५ हजार रुपये स्वतंत्र खर्च आला. बाजारपेठ व दर पाटील बंधू स्वतःबरोबर विदर्भ, मराठवाडा आदी भागातील शेतकऱ्यांकडूनही करवंदे खरेदी करतात. गुजरात, मध्य प्रदेश, कोलकता आदी व्यापाऱ्यांना विक्री होते. या पिकाचे क्षेत्र कमी आहे. तुलनेने मागणी मात्र जास्त असल्याचे मंगेश सांगतात. काही प्रक्रिया कारखानदारांशी थेट संपर्क असल्याने त्यांनाही पुरवठा होतो. दर ऑगस्टच्या सुरुवातीस तेजीत असतात. गेल्या हंगामात ६५, ७० ते कमाल ८० रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळाला. सरासरी दर ३०, ३५ ते ४० रुपयांपर्यंत असतात. लॉकडाउन काळातही २४ रुपये दर जागेवर मिळाला. फळाचा उपयोग हे फळ झाडावर तसे आंबट असते. रानमेवा म्हणून त्याला मुंबई, पुण्यासह मध्य प्रदेश, गुजरातमधील महानगरांत ग्राहकांची मागणी असते. प्रक्रिया करून त्यापासून अवीट गोडीची कॅप्सूलच्या आकाराची चेरी तयार केली जाते. खाऊच्या मसाला पानांतही त्याचा वापर केला जात असल्याचे मंगेश सांगतात. रोपनिर्मिती करवंद पिकाद्वारे पाटील यांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. वाहतुकीसाठी तीन टन क्षमतेचे मालवाहू वाहन घेतले आहे. करवंदाची शेडनेटमध्ये रोपवाटिकाही तयार केली आहे. शेतात पक्व झालेल्या फळातील बियांपासून रोपे तयार केली जातात. २० रुपये प्रति रोप असा दर आहे. संपर्क-  मंगेश पाटील, ८४५९८९२२६६, ९६८९३४६१९०

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

    Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

    Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

    Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

    Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

    SCROLL FOR NEXT