निर्यातक्षम केळी बागेत पठाण कुटुंब.  
यशोगाथा

एकरी ४० टन सातत्यपूर्ण दर्जेदार केळी उत्पादन

नेवासे (जि. नगर) येथील पठाण कुटुंबाने ऊस पट्ट्यात चोवीस वर्षांपासून केळी शेतीत सातत्य ठेवतत्यात नाव कमाविले आहे. अभ्यासपूर्ण, शास्त्रीय व तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून केळीची एकरी ४० टनांपर्यंत गुणवत्तापूर्ण उत्पादकता टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. गहू बीजोत्पादनासोबत कांदा, कापूस, ऊस तसेच गायी, शेळीपालन करूनही त्यांनी शेतीत प्रयोगशीलता टिकवली आहे.

Suryakant Netke

नेवासे (जि. नगर) येथील पठाण कुटुंबाने ऊस पट्ट्यात चोवीस वर्षांपासून केळी शेतीत सातत्य ठेवत त्यात नाव कमाविले आहे. अभ्यासपूर्ण, शास्त्रीय व तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून केळीची एकरी ४० टनांपर्यंत गुणवत्तापूर्ण उत्पादकता टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. गहू बीजोत्पादनासोबत कांदा, कापूस, ऊस तसेच गायी, शेळीपालन करूनही त्यांनी शेतीत प्रयोगशीलता टिकवली आहे.   संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांनी नेवासे (जि. नगर) येथे ज्ञानेश्‍वरी लिहिली. त्या पावनभूमीतील पैसैखांब स्थळापासून जवळच पठाण परिवाराची वडिलोपार्जित १२० एकर शेती आहे. नेवासे येथील कै.. जमशीदखान समशेरखान पठाण व रशीदखान समशेरखान पठाण या दोघा भावांच्या कुटुंबात मोअज्जमखान रशीदखान पठाण, आजमखान रशीदखान पठाण, मजहरखान जमशेद खान व कै.. रियाज जमशेदखान पठाण असे चौघे चुलत भाऊ. कुटुंबाचे सध्या १६ सदस्य आहेत. चौथ्या पिढीपर्यंत एकत्र राहून आदर्श निर्माण करणाऱ्या या कुटुंबाने शेतीतही आदर्श निर्माण केला आहे. घरातील काहींनी कायद्याची पदवी घेतली आहे. केळीबागेची मुख्य जबाबदारी सांभाळणारे मोअज्जमखान १९८५ सालचे कृषी पदवीधर असून ते वकीलदेखील आहेत. कुटुंबाची शेती केळी हे पठाण यांचे मुख्य पीक असून, १९९७ पासून म्हणजे २४ वर्षांपासून हे पीक त्यांच्या शेतात आहे. सध्या नवी-जुनी मिळून २६ एकर केळीबाग आहे. ४० एकर ऊस, २० ते २२ एकर कापूस व हंगामनिहाय कांदा व गहू असे क्षेत्र असते. नेवासा परिसरातून प्रवरा नदी वाहत असल्याने पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. त्यामुळे भागातील बहुतांश लोक ऊस घेतात. पठाण परिवाराने मात्र उसापेक्षा केळीला अधिक प्राधान्य दिले. अभ्यासपूर्ण, तंत्रशुद्ध व शास्त्रीय व्यवस्थापनातून त्यांनी एकरी ४० टनांपर्यंतच उत्पादकता सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी केलेले व्यवस्थापन अभ्यासण्याजोगे आहे. व्यवस्थापनातील बाबी

  • निचरा होणाऱ्या मातीत ६ बाय पाच फूट अंतरावर लागवड. सूर्यप्रकाश चांगला मिळण्यासाठी उत्तर-दक्षिण लागवड. उतिसंवर्धित रोपांचा वापर.
  • आषाढ-श्रावणात केळी यावी या उद्देशाने १५ जुलैच्या दरम्यान लागवडीचे नियोजन.
  • लागवडीनंतर चौदा दिवसांपासून सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी. प्रत्येक चौथ्या दिवशी संध्याकाळी. -मोठी पाने निघेपर्यंत साधारण दीड ते दोन महिने फवारणी.
  • लागवडीनंतर पहिले तीन महिने बाग स्वच्छ ठेवण्यात येते. शेत तणविरहित ठेवण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागत.
  • -एक महिन्याने प्रति झाड युरिया पन्नास ग्रॅम, पोटॅश व सुपर फॉस्फेट शंभर ग्रॅम. सहा महिन्यांपर्यंत दर महिन्याला हेच डोस (जमिनीतून). सुपर फॉस्फेट पहिले केवळ तीन महिने. त्यानंतर पोटॅश व युरिया.
  • कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाची लागवडीनंतर महिनाभरात लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे रस शोषक
  • किडीचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकाची प्रत्येक आठ दिवसाला गरजेएवढीच फवारणी.
  • दुसऱ्या महिन्यात प्रति झाड युरिया, सुपर फॉस्फेट व पोटॅश शंभर ग्रॅम. निंबोळी पेंड शंभर ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्य एकरी वीस किलो.
  • दरवर्षी नव्या पिकाला तिसऱ्या महिन्यात लेंडीखत अथवा शेणखत एकरी १० टन व साखर कारखान्याचे कंपोस्ट खत पाच टन. त्यानंतर मातीची भर लावण्यात येते.
  • तीन ते सहा महिन्यांपर्यंत गर्भधारणा होते. दिलेल्या अन्नद्रव्यांच्या मात्रेवर फण्या व केळीचा
  • आकार अवलंबून असतो.
  • लागवडीनंतर पुढील पिकासाठी दहाव्या महिन्यात पील ठेवले जाते. केळफूल तोडल्यानंतर वरून ११ पर्यंत फण्या ठेवण्यात येतात. फण्यांवर दर आठ दिवसांनी कीटकनाशकांच्या दोन
  • फवारण्या. त्यानंतर रस शोषक किडी, ऊन-थंडीपासून शेवटचे दोन महिने संरक्षण करण्यासाठी तसेच डाग पडू नये म्हणून स्कर्टिंग बॅगेचा वापर.
  • -थंडीत तापमान १० अंशांच्या आत गेल्यास केळी पिवळी पडण्यास सुरुवात होते. ते टाळण्यासाठी एकरी पाच किलो १३-०-४५ दर आठ दिवसांनी दिले जाते.
  • आठ ते नऊ महिन्यांनंतर केळफूल बाहेर येते. ११ ते बारा महिन्यांत तोडणी होते.
  • खंडातून शेजारच्या पिलाला अन्नद्रव्य मिळते.
  • सुरुवातीच्या काळात चार खोडवे घेतले. आता एकच खोडवा घेण्यात येतो.
  • यंदापासून निर्यातक्षम कंपनीच्या ‘फ्रूटकेअर’ तंत्रज्ञानाचा वापर.
  • उत्पादकता टिकवली मोअज्जमखान सांगतात की एकरी सुमारे १४५२ झाडे बसतात. काही वेळा प्रतिकूल हवामानामुळे काहींचे नुकसानही होते. प्रति झाड ३० किलोची रास मिळते. एकरी १३०० ते १४०० झाडे धरली तरी ३९ ते ४२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. काही परिस्थितीत एकरी ४५ टनांपर्यंतही उत्पादन घेतले आहे. बाजारपेठा व दर पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघरचे व्यापारी जागेवर येऊन माल घेऊन जातात. किलोला ८ ते १० रुपये दर मिळतो. गेल्या दोन वर्षांत लॉकडाउन काळात दरांमध्ये नुकसान झाले. यंदा गुजरातमधील कंपनीच्या माध्यमातून ७६ टन केळीची सौदी अरेबिया, इराणला निर्यात केली. १३ रुपये प्रति किलो दर मिळाला.   अन्य प्रयोग  गहू बीजोत्पादन खासगी कंपनीसाठी गव्हाचे बीजोत्पादनही केले जाते. एकरी १८ते २० क्विंटल उत्पादन मिळते. त्यातून बाजारभावापेक्षा वीस टक्के रक्कम अधिक मिळते. बाजारात क्विंटलला १८०० रुपये दर सुरू असल्यास पठाण यांना २००० ते २२०० रुपये दर मिळतो. शिवाय शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होते. पठाण यांच्या प्रेरणेतून अनेक शेतकऱ्यांनी बीजोत्पादन सुरू केले आहे. कांदा उत्पादन सहा वर्षांपासून सुमारे पाच एकरांवर वाफा पद्धतीने उन्हाळी गावरान कांदा घेतात. गेल्या काही वर्षांपासून शेणखत, हिरवळीच्या खतांचा वापर वाढवला आहे. दरवर्षी सुमारे १५ एकरांत हिरवळीचे खत म्हणून तागाची पेरणी करतात. बेसल डोस म्हणून सुपर फॉस्फेट एकरी २०० किलो देतात. त्यात १० किलो गंधक मिसळण्यात येते. मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड एकरी २ किलो याप्रमाणे वापर होतो. एकरी १५ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. मोअज्जमखान सांगतात की लागवड १५ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत केल्यास चांगले उत्पादन मिळते. रोपे घरीच तयार करतो. दर १०, १२ रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत मिळतो. मागील वर्षी संकटकालीन परिस्थितीत किलोला १६५ रुपये दर घोडेगाव येथे मिळाल्याचे ते सांगतात. अन्य पिके उसाला एकरी तीन ट्रॉली शेणखत व हिरवळीच्या खतांचा वापर होतो. वीस वर्षांपासून कापूस उत्पादनात सातत्य आहे. पाच बाय एक फुटावर लागवड तर यंदा १४ एकर त्याचे क्षेत्र आहे. एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते. शेळी, गायपालन शेणखत, लेंडीखत पुरेसे उपलब्ध होण्यासाठी शेळी व देशी गोपालन करतात. सिरोही जातीच्या १८ शेळ्या तर १५ गायी आहेत. त्यात अल्प संकरितही आहेत. दोनशे टन शेणखत वर्षाला उपलब्ध होते. गरजेनुसार शंभर ट्रॉली खत विकतही घेतले जाते. दरवर्षी दोन एकरांत मक्याची लागवड करून त्यापासून मूरघास तयार केला जातो. दोन एकरांत लसूणघासही घेतात. शेतकरी कंपनीची स्थापना  मोअज्जमखान, एकनाथ भगत व कृषी पदवीचे शिक्षण घेतलेल्या दहा मित्रांनी एकत्र येऊन नेवासा तालुका ॲग्रीकॉस शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. बाळासाहेब कोरडे त्याचे अध्यक्ष आहेत. यंदा झालेली निर्यात कंपनीमार्फतच आहे. मोअज्जमखान यांचा विविध पुरस्कारांनी गौरवही झाला आहे. संपर्क- मोअज्जमखान रशीदखान पठाण, ९८२२११५८८६, ९८३४२५८९४६   तज्ज्ञांची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचे केळीतज्ज्ञ के. बी. पाटील म्हणाले, की मोअज्जमखान हे नगर जिल्ह्यातील सर्वांत आघाडीचे केळी उत्पादक आहेत. त्यांना मी नेहमीच मार्गदर्शन करीत असतो. अनेक वर्षांपासून त्यांनी या पिकात सातत्य ठेवून एकरी ४० टनांच्या व त्यापुढे उत्पादन घेऊन सातत्य ठेवले आहेही प्रशंसनीय बाब आहे. त्यांची जमीन पोयटयाची असून निचरा लवकर होतो. त्यामुळे दिलेल्या अन्नद्रव्यांचा लवकर ऱ्हास होत असतो. अशावेळी दर चार दिवसांनी ते अन्नद्रव्ये व्यवस्थापन करतात. त्यातून कायिक वाढ होण्याबरोबर घडाचा निसवा चांगला होतो. घडाची लांबी, रुंदी व वजनही चांगले मिळते. त्यांची शेती ही ‘प्रिसिजन फार्मिंग’चा नमुना आहे. जागतिक बाजारपेठेत सध्या केळीचा तुटवडा जाणवत आहे. यंदा केळीची दोन लाख पाचहजार टन निर्यात झाली. पठाण यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची केळी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिकविल्यास निर्यातीची मोठी संधी आहे. त्यातून येत्या काळात १० लाख टन निर्यातीचा आकडा गाठता येईल.

    केळी निर्यातीला राज्याला मोठी संधी महाराष्ट्रातील शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादन घेत आहेत. सन २०२०-२१ मध्ये राज्यातून दोन लाख टन केळीची परदेशात निर्यात झाली. सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यंदाही किमान अडीच लाख टन निर्यात होण्याचे संकेत आहेत. देशातील बाजारातही राज्यातील केळीचा दबदबा वाढला आहे. उत्तर भारतातील बाजारपेठेत राज्यातील, किंबहुना खानदेशी केळीला बारमाही उठाव आहे. परदेशात निर्यातीसाठी मोठी संधी आहे. मात्र तेवढी पूर्ण होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन व्हायला हवे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आखातात वर्षभर मागणी आखातात केळीला वर्षभर मागणी आहे. इराण, बहारीन, दुबई, अफगाणिस्तान, इराक येथे राज्यातून अधिक निर्यात दोन वर्षे होत आहे. निर्यातदार कंपन्यांच्या मदतीने युरोपातही निर्यातीचा प्रयत्न होत आहे. खानदेशातून सह्याद्री फार्म्सने इंग्लंडमध्ये तर एका कंपनीने इटलीत निर्यात केली. तुर्की येथूनही मागणी आहे. मागणीचे चित्र

  • राज्यात एप्रिल ते ऑगस्ट या काळात आवक अधिक. याच काळात निर्यातही अधिक.
  • -उत्तर भारतातही मागणी. किमान ११०० ट्रक प्रतिदिन (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक या काळात.
  • दिल्ली, पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेशात उठाव.
  • नोव्हेंबर ते जानेवारी सुरुवातीपर्यंत आवक कमी. या काळात राज्यात ५०० ट्रक प्रतिदिन आवकेचे नोंद.
  • -अलीकडे खानदेश व सोलापूर भागांत बारमाही आवक सुरू.
  • राज्यातून २०२०-२१ मध्ये परदेशातील निर्यातीत खानदेशातून सुमारे ७० हजार टन निर्यात. यापाठोपाठ सोलापूर, कोल्हापूर व अन्य भागांचा हिस्सा.
  • निर्यातवाढीसाठी क्लस्टरची घोषणा शासनाने केली. त्यात कोल्हापूर, सोलापूरचा समावेश आहे. त्याद्वारे निर्यात वाढू शकण्याचा अंदाज.
  • राज्यातील केळीला मोठा उठाव आहे. दिल्ली, पंजाब येथील मॉलमध्ये केळीची खानदेशातून बारमाही पाठवणूक केली जात आहे. यासाठी निर्यातक्षम केळीची आवश्यकता असते. खानदेशातून तेथे एप्रिल ते ऑगस्टदरम्यान प्रतिदिन २०० ते २२५ ट्रक केळीची पाठवणूक केली जाते. केळीचे थेट शेतात स्वच्छता, प्रतवारी व बॉक्समध्ये पॅकिंगची कार्यवाही केली जाते. तर काही खरेदीदार, एजंट पॅक हाउसमध्ये प्रतवारी, स्वच्छता व पॅकिंगची कार्यवाही करतात.
  • बाजारातील स्थिती दोन वर्षांतील कोरोना काळात परदेशात कंपन्या, शेतकरी गट, प्रशासनाच्या मदतीने निर्यात सुरू होती. वाहतुकीसंबंधी अडथळे होते. पण मागणी कायम राहीली. या काळात ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्याहूनही दर घसरले होते. देशातही काही भागात वाहतूक सुरू असल्याने अन्य शेतीमालासारखे नुकसान केळी उत्पादकांना सहन करावे लागले नाही. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत आंध्र प्रदेश, गुजरातमधून आवक अपवादानेच होते. या काळात खानदेश, सोलापुरात आवक सुरू असते. हा काळ सणासुदीचा असल्याने केळीला उठाव असतो. दरही टिकून असतात. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सणासुदीमुळे तसेच रमझान ईद, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, पितृपक्ष यामुळे मागणी कायम राहिली. केळीला राजस्थान, नागपूर, कल्याण, ठाणे, छत्तीसगड आदी भागांत उठाव असतो. या भागातील केळी पिकवणी केंद्रचालकांकडून खरेदी मोठ्या प्रमाणात होते. नामांकित कंपन्यांकडून निर्यात खासगी कंपन्यांकडून निर्यातीसाठी चार आधुनिक किंवा फिलिपिन्सच्या धर्तीवर पॅकहाउस उभारण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचेही त्यात योगदान आहे. एक पॅकहाउस जळगाव जिल्ह्यात तांदलवाडी व एक सोलापुरात आहे. जळगाव जिल्ह्यात मध्यंतरी अमेरिकेतील डोल, चिकिता या नामांकित कंपन्यांनी निर्यातीसाठी काम केले. कोविडनंतर संधी कोविडकाळ बऱ्यापैकी संपत आल्यानंतर बाजार बऱ्यापैकी खुला झाला. दिल्ली येथील आशिया खंडातील सर्वांत मोठे आझादपूर मार्केट २४ तास कार्यरत झाले आहे. यामुळे दरांवरील दबाव देशात फारसा असणार नाही. फिलिपिन्समध्ये केळी पिकात रोगराई वाढली आहे. तेथून २०२० मध्ये पावणेतीन लाख टनांनी परदेशातील निर्यात घटली आहे. याचा लाभ भारतीय केळीला पुढे होईल. येत्या काळात राज्यात लागवड वाढून ८५ हजार हेक्टरवर जाईल असे संकेत आहेत. थेट खरेदीचा लाभ केळीची खरेदी खरेदीदार थेट शिवारात करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूक व अन्य अडचणींचा सामना करावा लागत नाही. थेट खरेदीसाठी पाणंद रस्ते विकास कार्यक्रमाचा लाभही होत आहे. अनेक भागांत शेतरस्ते मजबूत खडी टाकून तयार केले जात आहेत. शेतकऱ्यांनी स्वनिधी, लोकवर्गणीतून रस्त्यांची कामे केली आहेत. काढणीनंतर पुढील जबाबदारी खरेदीदाराची असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत नाही. राज्यातील लागवड (हजार हेक्टरमध्ये) २०१९- ८३ २०२० - ८० २०२१ - ८५ (अपेक्षित) (शब्दांकन ः  चंद्रकांत जाधव)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

    Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

    Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

    Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

    Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

    SCROLL FOR NEXT