अप्पासो एडके यांनी आले पिकाचे दर्जेदार उत्पादन घेण्यात कुशलता मिळवली आहे.
अप्पासो एडके यांनी आले पिकाचे दर्जेदार उत्पादन घेण्यात कुशलता मिळवली आहे.  
यशोगाथा

प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात झाले मास्टर

Abhijeet Dake

वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेळीपालन केले. त्यातील उत्पन्नातून ते शेती विकत घेत गेले. मुलांना उच्चशिक्षित केलं. वडिलांच्या कष्टांची जाण मुलांनी ठेवली. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आप्पासो यांनी सहा एकर शेती खरदी केली. गेल्या आठ ते वर्षांपासून आले पिकात सातत्य ठेवून त्यात मास्टरी मिळवताना आपलं कुटुंबही आर्थिक सक्षम केले आहे.  सांगली जिल्ह्यातील कडेगावची दुष्काळी तालुका म्हणून ओळख होती. तालुक्यातील वांगी गावातील अनेकांना पोटापाण्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली. सन २००३ मध्ये ताकारी उपसा सिंचन योजनेचे पाणी आले. तालुका सुजलाफ- सुफलाम झाला. उसाचे क्षेत्र वाढले. वांगी गावात साखर कारखाना उभारला.  संघर्षातून शोधली वाट  याच वांगी गावात एडके कुटुंब राहते. दत्तात्रेय हे कटुंबप्रमुख. मुलगा अप्पासो सध्या शेतीची सारी जबाबदारी सांभाळतो. आले पिकात या कुटुंबाने मास्टरी मिळवली आहे. या पिकाला अलीकडील काळात उसाची भक्कम जोड देत कुटुंबाने आर्थिक सक्षमता मिळवली आहे. या कुटुंबाची शेतीतील वाटचाल जाणून घेण्याइतकी महत्त्वाची आहे.  कुटुंबप्रमुख दत्तात्रेय सांगू लागले. पूर्वी आमचा भाग कायम दुष्काळी होता. कायम मोकळं शिवार. दहा वीस वर्षं रोजगार करून पोटाची खळगी भरली. पण तेवढ्या पैशांत भागत नव्हतं. चाळीस वरिषांमागं १५ हजार रुपयाचं कर्ज काढलं. शेळ्या घेतल्या. प्यायला पाणी नव्हत, मग शेरडास्नी कुठनं आणायचं? चारा नव्हता. पैदास करायची, इकायच्या. असं करत सहा एकर रान घेतलं. चाऱ्यासाठी वणवण फिरायाचो. रातीला ११, १२ ला घरला याचयो. आल्यावर शेरडांचं पाय चोळायचो. मग झोपायचो. शेरडांचा खंडवा करायचा. (खंडवा म्हणजे १० ते २० शेळ्‍यांचा समूह). तो इकून शेती घ्यायचा छंद लागला. आम्ही शिकलो न्हाय. पण पोरास्नी शिकवायचं ठरविलं. न्हायी गेली तर तर मारून शाळंला धाडत हुतो. आज थोरला पोरगा दिलीप मुंबईत पोलिस खात्यात हाये. मधला अप्पासो बी. कॉम करून शेती सांभाळतुया. धाकला पोरगा दादासो ठाण्यात फौजदार हाय. आमची वडिलोपार्जित शेती नव्हती. साधारण १९९५ ला सहा एकर शेती विकत घेतली.  वडिलांनी कष्ट उपसले  अप्पासो म्हणाले, की वडिलांनी खूप कष्ट केले. म्हणून शिक्षण घेता आले. दुष्काळ होताच. शाळा शिकत असल्यापासून आम्हीदेखील मोलमजुरी केली. वडिलांनी पैसे साठवून शेती खरेदी केली. नदीकाठी अर्धा एकर शेती होती. त्यात ऊस लागवड केली. त्यातून पैसे मिळू लागले. वडिलांचा आदर्श घेत शेती खरेदी करीत गेलो. आज १२ एकर शेती झाली आहे.  ताकारी योजनेचे पाणी शिवारात आलं  दरम्यान ताकारी उपसा सिंचन योजनेचं पाणी तालुक्यात आणलं. शिवार हिरवं होऊ लागलं. ऊस पिकासह द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई, मिरची यासारखी पिकं घेतली जाऊ लागली. एडके कुटुंबालाही मग आपल्या शेतीची प्रगती करणं शक्य झालं.  गैरहजेरी पण तरीही चांगले मार्क्स?  शेती सुरू होती. अकरावीपासूनच शिक्षण घेण्यासाठी अप्पासो यांनी कडेगाव गाठलं. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी, विहिरीत आडवे बोअर मारणं अशी कामेही सुरू होती. त्यामुळे वर्गात कमी आणि रानात जास्त वेळ जायचा. त्या वेळी अर्थशास्त्र शिकवण्यासाठी एम. डी. डाके सर होते. ते अप्पासो यांना म्हणायचे, की तू वर्गात अनेकवेळा गैरहजर असतोस. पण अभ्यासात हुशार आहेस. मार्क्स चांगले मिळवतोस ही चांगली बाब आहे. आज हीच हुशारी आले पिकातही उपयोगात येत आहे.  आले पिकात मास्टरी  ऊस शेतीचे अर्थकारण अलीकडील काळात फारसे फायदेशीर ठरत नाही. म्हणून पर्यायी पिकाचा अभ्यास सुरू केला. कडेगावचे कृष्णत मांडवे, तांदूळवाडीचे संभाजी जाधव या अनुभवी शेतकऱ्यांकडून शिकण्यास सुरवात केली. हळूहळू या पिकातील गमक, बारकावे समजत गेले. आज या पिकात मास्टरी संपादन केल्याचे आप्पासो सांगतात.  आले शेती दृष्टिक्षेपात 

  • आले क्षेत्र - दरवर्षी चार ते साडेपाच एकर (या पिकात आठ ते नऊ वर्षे अनुभव) 
  • अप्पासो सांगतात की फेरपालट महत्त्वाची. एकाच शेतात पुन्हा पुन्हा लागवड केली, तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आल्यानंतर ऊस असतो. आल्याचा बेवडही चांगला असतो. 
  • खंडाने १० एकर शेती घेतल्याने पीक फेरपालट होऊन जाते. 
  • गट असल्याने एकमेकांशी सल्ला-मसलत करून व्यवस्थापनात सुधारणा 
  • क्षेत्र जास्त असल्याने सालगडी ठेवले आहेत. 
  • दोन वेळा नांगरट, शेणखत सहा ते सात ट्रॉली, जमीन चांगली तापू देतात. 
  • मेमध्ये लागवड. त्या वेळी बेसल डोस 
  • रासायनिक बरोबरच जैविक खते, जीवामृत यांचा वापर 
  • दोन महिन्यानंतर बाळ भरणी, दुसरी भरणी चार महिन्यानंतर 
  • वाफसा व ठिबक पद्धतीने पाण्याचे नियोजन. दोन दिवसांतून दोन तास 
  • एकरी उत्पादन - २० ते २५ टन 
  • सरासरी दर - ३० ते ३५ रुपये प्रति किलो, यंदाचा दर - ६० रुपये. 
  • सन २०१३ मध्ये १२० रुपये दर मिळाला होता. 
  • एकरी खर्च - दीड ते दोन लाख रु. 
  • अन्य पिके 

  • ऊस- को ८६०३२, फुले २६५- उत्पादन- एकरी ६० ते ८० टन 
  • कलिंगड (उत्पादन एकरी २० टन), हरभरा, शाळू 
  • संपर्क- अप्पासो एडके - ९९७०५४२३०७ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT