औरंगाबाद जिल्ह्यातील चौका गाव व परिसरातील गावांमध्ये तुरीच्या हिरव्या शेंगांचे खास उत्पादन घेतले जाते. त्यासाठी विशेष बाजारपेठ तयार झाली आहे. त्यातून हिरव्या शेंगांचा गोडवा गुजरातेत पोहोचून शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन करणे शक्य झाले आहे. हिवाळ्याच्या थंडीत मीठ घालून शिजवलेल्या तुरीच्या हिरव्या शेंगा, तसेच सोल्यांपासून तयार केलेली गरमागरम आमटी ओरपण्याची मजाच और असते. त्यामुळेच ग्राहकांकडून अशा शेंगांना मोठी मागणी असते. चौका (ता. जि. औरंगाबाद) गाव परिसरात याच शेंगांना मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. त्या दृष्टीने तुरीचे व्यवस्थापन करून शेतकरी चांगल्या प्रकारे अर्थार्जन करू लागले आहेत. अशी आहे चौकाची बाजारपेठ चौका परिसरातील साताळा, हातमाळी, डोणवाडा, नांद्रा, लिंगदरी, सांगवी, नामगाव, पळशी ही काही प्रातिनिधिक गावे हिरव्या शेंगासाठी प्रसिद्ध आहेत. आता फुलंब्री, कन्नड, सिल्लोड आदी तालुक्यांतही या कारणासाठी तूर घेतली जाऊ लागली आहे. चौका गावातील शेतकरी गणेश वाघ काही वर्षांपासून तुरीच्या हिरव्या शेंगांची विक्री करतात. त्यामुळे त्यांचा अनुभव नक्कीच अभ्यासण्याजोगा आहे. ते म्हणाले, की चौकाच्या आजूबाजूला सुमारे नऊ गावे आहेत. या सर्व गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात हिरव्या शेंगांसाठी तुरीचे नियोजन केले जाते. सुमारे २० वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरानजीकच्या जाधववाडी बाजारपेठेत या हिरव्या शेंगांची विक्री व्हायची. साधारण सहा वर्षांपूर्वीपासून चौका येथे सक्षम बाजारपेठ त्यासाठी तयार झाली आहे. अशी प्रसिद्ध झाली तूर औरंगाबाद जिल्ह्यात हिरव्या तुरीच्या शेंगांचे उत्पादन चांगले आहे हे समजल्यानंतर अहमदाबाद, सुरत येथील व्यापारी जागेवर येऊ लागले आहेत. पाहुण्यारावळ्यांकडून बियाणे घेऊन लागवड वाढत आहे. पावसाळा सुरू झाला, की कापूस ज्याप्रमाणे फुल्या पाडून लावला जातो, तशाच प्रकारे तुरीची लागवड येथे होते. दोन ओळींत चार फूट व दोन झाडांत दीड किंवा दोन फूट अंतर ठेवले जाते. एकरी सुमारे एक किलो बियाणे लागते. टपोऱ्या व गोड वाणाला प्राधान्य : काही वर्षांपूर्वी जापनीज तूर या नावाने तुरीचे वाण प्रसिद्ध झाले. चार दाण्यांची पसरट शेंग, टपोरे दाणे व अन्य वाणापेक्षा जास्त गोडी अशी त्याची वैशिष्ट्ये होती. आजही तेच वाण वापरले जाते. दरवर्षी बियाणे धरून ते पुढील वर्षासाठी वापरले जाते. काही खासगी कंपन्यांचे वाणही आता घेण्यात येते. साधारणतः एक ऑक्टोबरपासून हिरव्या शेंगाची आवक सुरू होते. यंदा १५ ऑक्टोबरपासून शेंगा बाजारात येऊ लागल्या. सततच्या पावसामुळे १५ दिवस हंगाम लांबला. सुरुवातीला हलक्या जमिनीतील व त्यानंतर भारी जमिनीतील शेंगा बाजारात येतात. हिरवा वाटाणा बाजारात आला की दर कमी होऊ लागतात. वाघ म्हणाले, की हिरव्या शेंगांचा हंगाम तसा नोव्हेंबर १५ पर्यंत आटोपतो. पुढे येणारे उत्पादन मग बाजार समितीत विकले जाते. तोडणी व पॅकिंग हिरव्या शेंगांचा बाजार दुपारी तीन वाजता सुरू होतो. त्यामुळे सकाळी शेंगा तोडून तीन वाजेपर्यंत शेतकऱ्यांना मार्केट गाठावे लागते. एक महिला मजूर चार ते पाच तासांत सुमारे ८० किलोपर्यंत शेंगा तोडते. एक एकरामधून एक ते दीड क्विंटल हिरव्या शेंगा दररोज निघतात. जाळीदार नायलॉनच्या पोत्यात चांगल्या दाबून भरल्या, तर ३५ ते ४० किलो वजन होते. गुजरात मुख्य मार्केट औरंगाबाद जिल्ह्यातील हिरव्या शेंगांना सुरत व अहमदाबाद या मुख्य बाजारपेठा आहेत. वाटाण्याच्या शेंगा येण्याआधी तुरीच्या शेंगांना मागणी अधिक असते. हिरव्या वाटाण्याची उपलब्धता नसते त्या वेळी तुरीचे हिरवे सोले खाण्यासाठी, तसेच कचोरीतही उपयोगात आणले जातात. गुजरात बाजारपेठेत मोठ्या ट्रकमधून, तर राज्यातील अन्य शहरांत पीकअप व्हॅनमधून शेंगा पाठवल्या जातात. वाघ सांगतात की पूर्वी व्यापारी मोजके असताना क्विंटलला २००० रुपयांपर्यंतच दर मिळायचे. अलीकडे व्यापारी वाढल्याने दरांत स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचा फायदा आम्हाला मिळू लागला आहे. वाघ यांचा अनुभव गणेश वाघ सांगतात, की माझे किमान एक एकर तुरीचे क्षेत्र असते. एकरी २५ क्विंटलपर्यंत हिरव्या शेंगांचे उत्पादन मिळते. आमच्या भागात सूरत, नागपूर, आदी भागातून व्यापारी येतात. चौका येथे सुमारे १० ते १२ व्यापारी या व्यापारात सक्रिय आहेत. एक व्यापारी दररोज सुमारे पाच किंवा त्याहून अधिक टन माल संकलित करतो. शेंगांना सुरुवातीच्या काळात क्विंटलला सहा हजार रुपये दर मिळतो. त्यानंतर आवक जशी वाढेल तसा तो खाली येऊन अगदी १००० ते ११०० रुपयांपर्यंत स्थिरावतो. सरासरी दर तीन हजार रुपयांपर्यंत मिळतो. खर्च वजा जाता एकरी सुमारे ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. बियाणे घरचेच असते. तो खर्च कमी होतो. वजन करताना प्रत्येक पोत्यामागे एक किलोची कटौती घेतली जाते. अल्पभूधारकांचे पीक चौका व त्याच्या आजूबाजूची गावे डोंगराळ आहेत. त्यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. जवळपास ९० टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत. यातही एक एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेले जास्त शेतकरी आहेत. येथे चार एकर क्षेत्रधारकही मोठा शेतकरी समजला जातो. कमी क्षेत्र असल्याने त्यातून अधिकाधिक पैसा कसा होईल या दृष्टीने तुरीच्या हिरव्या शेंगांचे उत्पादन फायदेशीर ठरते. आर्थिक फायदा दिसला गेवराई सेमी (ता. सिल्लोड) येथील सोमीनाथ कडूबा ताठे म्हणाले, की या वर्षी आमच्या गावातील सुमारे २५ शेतकऱ्यांनी हिरव्या शेंगाचे उत्पादन घेतले आहेत. सर्व विक्री आम्ही चौका येथे करतो. गेल्या वर्षी फक्त तीन शेतकऱ्यांनी हिरव्या शेंगा विकल्या होत्या. त्यांना झालेला आर्थिक फायदा पाहून या वर्षी जास्त शेतकरी पुढे आले. आम्हाला किलोमागे सरासरी २५ ते ३० रुपये दर मिळाला. काही जणांना एकरी ५० ते ५५ हजारांपर्यंत उत्पन्न मिळाले. संपर्क गणेश वाघ - ८८८८२२६२७० -सोमीनाथ ताठे -९७६५४४३१३७ (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.