विठ्ठल वाघमारे यांचे रेशीम कीटक संगोपन शेड
विठ्ठल वाघमारे यांचे रेशीम कीटक संगोपन शेड  
यशोगाथा

अकोली गावाने रेशीम व्यवसायातून गुुंफले उन्नतीचे धागे

Vinod Ingole

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्‍यातील अकोली हे जेमतेम साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. आडळवणावर असलेल्या या गावाने रेशीम शेतीच्या माध्यमातून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कधीकाळी सोयाबीन, कपाशी, ज्वारी या सारख्या पिकावर या भागातील शेतकऱ्यांची भिस्त होती.  आता गावातील सुमारे १० ते १२ शेतकरी रेशीम कीटक संगोपनात व्यस्त झाले आहेत. हाच व्यवसाय त्यांचा मुख्य झाला असून त्यातून महिन्याला ताजे उत्पन्न घेत अर्थकारण उंचावणे शक्य झाले आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्‍यांचा समावेश पूर्वीच रेशीम शेती अनुदान योजनेत होता. परंतु, उमरखेड तालुका त्यात वगळण्यात आला. त्यानंतर २०१३ मध्ये शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत या तालुक्‍याचाही योजनेत समावेश झाला. रेशीम विभागाचे तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक मुकुंद नरवाडे यांचे त्यामागील प्रयत्नही नाकारून चालणार नाहीत. त्यांच्या पुढाकारानेच रेशीम अनुदान योजनेत या तालुक्‍याचा समावेश झाला. शेतकऱ्यांनीही योजनांना प्रतिसाद देत रेशीम शेतीला सुरवात केली. त्यातून तुती लागवडीखालील क्षेत्र वाढविले. आज आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्‍याने रेशीम व्यवसायाच्या बळावर आपले वेगळे अस्तित्व आणि ओळख निर्माण केली आहे.  वाघमारे यांचे प्रयत्न आले फळाला  जिल्ह्यातील अकोली येथील विठ्ठल राजाराम वाघमारे यांनी रेशीम शेतीत गावाला चालना दिली. सन २०१३ मध्ये संयुक्‍त कुटुंबापासून विभक्‍त झालेल्या वाघमारे यांच्या वाट्याला केवळ दोन एकर शेती आली. या अत्यल्प शेतीतून कुटूंबाचा गाडा चालविण्याचे आव्हान होते. पारंपरिक पिकांतून हे शक्‍य नसल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिक पर्यायी पिकांचा शोध सुरू केला. ढाणकी येथील आत्मा यंत्रणेच्या संपर्कातून रेशीम शेतीविषयी कळाले. अधिक विचारांती व्यवसाय करायचे नक्की केले. रेशीम शेतीसाठी नोंदणी केली. तांत्रिक माहिती घेतल्यानंतर एक एकरात तुतीची लागवड केली. सुरवातीचे अनुभव उत्साहवर्धक वाटल्यानंतर दोन एकरांत तुती लागवड वाढवली. पन्नास बाय २० फूट आकाराचे शेड बांधले. रेशीम विभागाकडून साडे ८६ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. तुती लागवडीसाठी स्वतंत्र अनुदान मिळाले. त्या वेळी भागात रेशीम शेती नवी असल्याने परिसरातील शेतकरी अनेक शंका व्यक्त करायचे. पण वाघमारे मागे हटले नाहीत. त्यांनी जिद्दीने व धाडसाने व्यवसाय सुरू ठेवला. एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत पाच बॅचेसमध्ये त्यांनी कोष उत्पादन घेत चांगले उत्पन्नही घेतले.  वाघमारे यांच्याकडून मिळाली प्रेरणा  रेशीम शेतीतून वाघमारे यांचा हुरूप वाढलाच. शिवाय परिसरातील शेतकरी देखील या व्यवसायाचा विचार करू लागले. दररोज ५० ते ६० शेतकरी शेताला भेट देऊ लागले. वाघमारे देखील या शेतकऱ्यांना कोणतेही आढेवेढे न घेता मार्गदर्शन करू लागले. हळूहळू अकोलीसोबतच उमरेखड तालुक्‍यात या शेतीचा प्रसार झाला. आज अकोली गावात सुमारे २२ ते २५ एकरांवर तुती लागवड असावी. तर १२ ते १३ रेशीम शेडस कार्यरत असावेत, अशी शक्यता वाघमारे यांनी बोलून दाखवली.  व्यवसायाला मिळाली चालना  आज अकोली गावातील सुभाष भालचंद्र चिन्नावार यांचे सहा एकरांत तुतीचे पीक आहे. संदीप मारोतराव धात्रक यांची दोन एकरांवर तुती लागवड तर २२ बाय ६० फूट आकाराचे शेड आहे. तीनशे अंडीपूंजांचे संगोपन ते करतात. विलास गंगाराम भोयर, आनंद भोयर, आनंदराव पवार, मारोती मोटाळे, साहेबराव गणेश राठोड, गणेश तारू राठोड, स्वप्नील राठोड, तुकाराम गोपा आडे, रामा मिरासे, रमेश पवार अशी रेशीम उत्पादकांची अनेक नावे देता येतील. या सर्वांसाठी हा पर्याय आर्थिक सक्षमतेकडे नेण्यास पूरक ठरला.  विक्रीसाठी सामूहिक पर्याय  सुमारे १२ क्‍विंटलपर्यंत रेशीम कोष उत्पादन झाल्यानंतर सामूहिक विक्रीसाठी सर्वजण एकत्र येतात.  त्यामुळे वाहतुकीवरील खर्च विभागाला जातो. रामनगर (कर्नाटक) येथील बाजारपेठेत कोषांची विक्री होते. बाजारपेठेतील स्थितीनुसार ३०० पासून ते ४५० रुपये प्रति किलोपर्यंतचे दर मिळतात. सन २०१७ मध्ये कोषांना विक्रमी कमाल ६५० ते ७०० रुपये दर मिळाले होते असे येथील शेतकरी सांगतात. एखाद्यावेळी सामूहिक विक्रीसाठी नेलेल्या कोषांपैकी एखाद्या शेतकऱ्याचा माल कमी दरात घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्या व्यापाऱ्याला माल न देण्याचे सामूहिकरित्या ठरवण्यात येते.  अन्यथा शेतकरी आपला माल दुसऱ्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात.  व्यवस्थापनातील बाबी  यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास कपाशीच्या तुलनेत रेशीम शेती किफायतशीर वाटते. प्रति वर्षात रेशीम कोषाच्या चार-पाच पासून ते काही वेळा ९ पर्यंत बॅचेस घेणे शक्‍य होते. अर्थात त्यासाठी व्यवस्थापनामध्ये सुसूत्रता असणे गरजेचे आहे असे वाघमारे सांगतात. तुती पाल्याची लागवड, पर्यायाने पाल्याची उपलब्धता यावर बॅचेस अवलंबून असतात. योग्य व्यवस्थापन आणि जमिनीचा पोत चांगला असल्यास सुमारे १२ ते १५ वर्षे तुतीचा खोडवा ठेवता येतो. मार्च, एप्रिलमध्ये पाण्याची अडचण राहते. या काळात जास्त काळजी घ्यावी लागते. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाच्या सोयी आहेत त्यांच्याव्दारे या कालावधीत कोष उत्पादन घेतले जाते, असे साहेबराव राठोड यांनी सांगीतले.  चॉकीचा थेट पुरवठा  रेशीम अळ्यांचे संगोपन तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असल्यास प्रति १०० अंडीपूंजांपासून ८० ते ८५ किलो कोष उत्पादन होऊ शकते. पूर्वी चॉकी अवस्था म्हणजे अळ्यांची बाल्यावस्था वाढवण्याचे काम गावातच शेतकरी करायचे. मात्र ही प्रक्रिया अत्यंत क्‍लिष्ट आणि तांत्रिक असल्याने त्यासाठी परिपूर्ण व्यक्‍तीची गरज राहते. अलीकडील काळात विडूळ येथील सिध्देश्‍वर बिचेवार चॉकी संगोपन करतात. त्यामुळे त्यांच्याकडून अळ्यांचा पुरवठा होतो. साहजिकच रेशीम उत्पादकांचा वेळ वाचण्यास मदत झाली आहे. बॅच काढणीनंतर सुमारे १० ते १२ दिवसांचा कालावधी आता शेडची स्वच्छता व निजंर्तुकीकरण यासाठी देणे त्यांना शक्य झाले आहे.  अर्थकारण उंचावले  वाघमारे सांगतात की मला २०० अंडीपुंजांपासून दीड क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. शंभर अंडीपुजांमागे ८० किलो उत्पादन तर कोषांना ३०० रुपये प्रति किलो दर मिळाला तरी प्रति बॅच ४५ हजार रुपये उत्पन्न मिळते. यात वाहतुकीचा खर्च अधिक असतो. एकूण खर्च वजा करता महिन्याला २५ हजार रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळू शकते. सन २०१६-१७ मध्ये वर्षाला सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाल्याचे वाघमारे सांगतात. माझा एक मुलगा एमएस्सी ॲग्रीला प्रवेश घेणार आहे. मुलगी गणित विषयात बीएस्सी करते आहे. मुलाचे पहिलीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. दोघांची शिक्षणे याच रेशीम शेतीतून झाली व कुटूंबाचे अर्थकारणही याच शेतीतून उंचावल्याचे वाघमारे म्हणाले.  संपर्क- विठ्ठल वाघमारे - ९९२२०५९४४२  साहेबराव राठोड - ९१५८४२९१६२   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT