यशवंत गावंडे यांची मिश्र फळबाग पद्धत
यशवंत गावंडे यांची मिश्र फळबाग पद्धत  
यशोगाथा

धरणात जमीन गेली तरी शेतीत नव्याने भरारी घेतलेले गावंडे 

ज्ञानेश उगले

नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (ता. पेठ) येथील यशवंत गावंडे यांचा प्रवास ‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ असाच आहे. विविध पिके व पूरक व्यवसायांचे प्रयोग राबवून इतरांनाही प्रयोगशील व आधुनिक शेतीची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांना एकत्र ‘कंपनी’ स्थापन करून त्या माध्यमातून स्वतःच्या शेतमालाचे ब्रॅंड बाजारात आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.  सगळं उद्‍ध्वस्त झालं तरी राखेतून उठून पुन्हा नव्यानं उभारी घेणाऱ्या फिनिक्‍स पक्ष्याचं रुपक यशवंत महादू गावंडे यांना लागू होतं. नाशिक जिल्ह्यातील पेठ या आदिवासी तालुक्‍यातील गावंदपाडा- करंजाळी हे त्यांचं गाव. करंजाळी भागात धरण होण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. त्यात गावंडेदेखील होते. त्यातूनच शिवारात ‘श्रीमंत’ नावाचं धरण झालं. मात्र, त्यात स्वतःची १० एकर वडिलोपार्जित जमीन गावंडे यांना गमवावी लागली. पण त्यांचा शेतीप्रगतीतील संघर्ष प्रेरणादायी आहे.  टिकवलेली प्रयोगशीलता  गावंडे यांनी पूर्वीपासून प्रयोगांचा ध्यास घेतला. सन १९९० मध्ये परिसरात प्रथम दोन एकरांत तुतीची लागवड केली. काही कारणांमुळे रेशीम कोष उत्पादन घेता आले नाही. मग १९८१ मध्ये त्यावेळच्या लगतच्या धरणात रोहा, कटला, मृगल आदी मत्स्योत्पादन घेतले. धरणाच्या कामांमुळे शेतीत तांत्रिक अडथळे आल्याने १० वर्षे केलेला व्यवसाय थांबवावा लागला.  पूरक व्यवसायांना चालना  दरम्यान, १९९५ मध्ये १५ म्हशी व १० गायींसह दुग्धव्यवसाय सुरू केला. अडीच लाख रुपये बॅंकेचे कर्ज घेतले. व्यवसाय सात वर्षे टिकवला. दररोज ५० लिटर दूध पेठच्या बाजारात पाठवत, याच काळात लेअर कोंबड्यांचा व्यवसायही तीन वर्षे केला. खाद्याचे दर वाढत गेले. आर्थिक अडचणींमुळे तोही थांबवावा लागला. त्या काळात सुरू केलेली गांडूळ खतनिर्मिती मात्र अजूनही सुरू आहे. चाळीस बाय पंचवीस फूट शेडमध्ये दर तीन महिन्यांनी सरासरी अडीच टन खत मिळते. गोबरगॅसच्या माध्यमातून स्लरीही खत म्हणून वापरात येते.  धरणग्रस्त म्हणून अव्याहत संघर्ष  सन २००३ च्या दरम्यान जमीन धरणासाठी संपादित झाली. यात उत्पादनक्षम आंब्याची २४० झाडे, पेरूची ४०, सागाची ५०० झाडे, दोन घरं, गोठा, पोल्ट्री, असा सारा पसाराही गेला. जमिनीचा दर प्रतिहेक्‍टरला अवघा ४२ हजार रुपये देण्यात आला. यात १२० शेतकरी बाधित झाले. त्यांचीही घरंदारं उद्‍ध्वस्त झाली. शासनाने आश्‍वासनं दिली; पण अद्याप कोणाचंही पुनर्वसन झालेलं नाही. गावंडे यांचा त्यासाठी २५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.   

पुन्हा शेतीत भरारी  या साऱ्या लढाईत शेतीतील प्रयोगांकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. एस.टी. महामंडळात ते लिपिक होते. सन २०१३ मध्ये लेखापाल म्हणून निवृत्त झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधी व मित्रांच्या मदतीतून त्यांनी आठ एकर जमीन विकत घेत शेतीत नवी उभारी घेतली.  फुलवलेली समृद्ध शेती 

  • तीन एकरांत आंबा, पेरू, लिंबू, शेवगा या फळपिकांसह मोगऱ्याची शेती, 
  • उडीद, कुळीद, तीळ अशी हंगामी पिके 
  • तीन एकर क्षेत्र पूर्णपणे सेंद्रिय 
  • आंब्याची १५०० झाडं. यंदा उत्पादन मिळेल. पूर्वीची १५० झाडं - प्रति झाड- १५० ते २०० किलो उत्पादन. (हापूस, केसर) 
  • पेरू व लिंबू - प्रत्येकी ६०० झाडं. 
  • मोगरा (६०० झाडं) व खुरासणी ही फळबागेत आंतरपिके. खुरासणीला ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो दर. स्थानिक घाण्यातून तेल काढून त्याचा वापर. 
  • चिकू, रामफळ, हनुमान फळ, सीताफळ, जांभूळ व नारळही 
  • नागली उत्पादन कुटुंबाच्या गरजेपुरते. 
  • इंद्रायणी, रत्नागिरी २४ या भातवाणांची लागवड. एकरी २० क्विंटल उत्पादन. 
  • गावंडे यांच्या प्रयत्नांबाबत ठळक 

  • सेंद्रिय शेतीच्या प्रचार व प्रसारासाठी वाहून घेतले 
  • अनेक शेतकऱ्यांना स्वखर्चाने मार्गदर्शन, त्यातून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले. 
  • करंजाळी येथे विक्री केंद्र, तेथे थेट विक्री. 
  • वृक्षराजी वनराईच्या संवर्धनासाठी नातेवाइकांचा समावेश असलेली ‘स्नेहबंध सेवा मंडळ’ ही ३० सभासदांची संस्था. 
  • झाडं लावणारा माणूस  करंजाळी परिसर औषधी वनराईने बहरला आहे. या परिसरात जंगल वाढण्यास आणि अबाधित राहण्यास गावंडे यांचे मोठे योगदान आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी झाडे लावण्याचा छंद जोपासला. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साग, सादडा, नीलगिरी, हिरडा, बेहडा आदींची पाचशे, हजार झाडं ते लावत आले आहेत. चाळीस वर्षांपासून उपक्रम सुरू आहे. गावंडे यांच्या पुढाकारातून कुऱ्हाडबंदी झाली. त्यानंतर परिसरातील एकही व्यक्ती जंगलात सरपण आणायला गेली नाही. शेतीत गावंडे यांना पत्नी सौ. हिराबाई, मुले राजू व मनोज, सुना, आई-वडीव व भाऊ यांचे मोलाचे योगदान मिळाले आहे. मोगराशेतीतून सापडला मार्ग  सन २०१४ नंतर गावंडे यांना मोगरा हा या भागातील नव्या पिकाचा पर्याय सापडला. ठाणे जिल्ह्यातील जव्हार भागात ‘बायफ’ संस्थेच्या मदतीने शेतकऱ्यांनी मोगऱ्याची यशस्वी शेती केली. गावंडे यांना याच प्रयोगांची प्रेरणा मिळाली. शेतमालांना पुरेसे दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या स्थितीत मोगरा त्यांना आश्‍वासक वाटत आहे. भागातील सुमारे ३० शेतकरी त्याची गटशेती करताहेत.  ‘स्वीटकॉर्न’ची करार शेती 

  • गावंडे यांच्या पुढाकाराने करंजाळी परिसरातील सुमारे १०० एकरांवर ‘स्वीटकॉर्न’ची करार शेती सुरू झाली आहे. सुमारे १३० शेतकरी तसेच कृषी विभागाची ‘आत्मा’ यंत्रणा व 
  • स्थानिक कंपनी यांचा यात सहभाग. शेतकऱ्यांना कंपनीकडून प्रतिकिलो ८ रुपये हमीदर. 
  • शेतकरी कंपनी  या परिसरात श्रीमंत आदिवासी सेंद्रिय शेतकरी गट, गावंदपाडा, कृषिरत्न सेंद्रिय असे गट स्थापन झाले.  यातील शेतकऱ्यांची मिळून ‘वनराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ स्थापन झाली आहे. त्यामार्फत रासायनिक अंशमुक्त तांदळाचे ग्रेडिंग, पॅकिंग अशी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. परिसरात विविध वाणांच्या आंब्याचे उत्पादन होते. त्यापासून रसनिर्मिती, बर्फी, पोळ्या आदींचीही निर्मिती करण्यात येणार आहे.    संपर्क-  यशवंत महादू गावंडे - ९४२३०७०९११

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

    Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

    Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

    Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

    Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

    SCROLL FOR NEXT