Medicinal Plant Processing
Medicinal Plant Processing Agrowon
यशोगाथा

Medicinal Plant Processing : औषधी वनस्पती प्रक्रियेतून शेतीला मिळाली दिशा

माणिक रासवे

Success Story : वनिता दंडे यांचे शिक्षण आठव्या इयत्तेपर्यंत झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शिक्षण घेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बी.ए. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. १९८६ मध्ये त्यांचा विवाह भिंगी (ता. हिंगोली) येथील अशोकराव दंडे यांच्याशी झाला.

अशोकराव हे सामाजिक वनीकरण विभागात सेवेत असल्यामुळे दंडे कुटुंबीय वसमत येथे वास्तव्यास आले. वनिताताईंनी १९८८ मध्ये वसमत येथे ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू केले.

यामध्ये सुरुवातीला त्या तयार सौंदर्य प्रसाधने वापरीत असत. १९९२ मध्ये त्यांनी पनवेल येथे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये त्यांना औषधी वनस्पतींपासून विविध सौंदर्य प्रसाधने निर्मितीचे प्रशिक्षण मिळाले. यातूनच त्यांना प्रक्रिया उद्योगाची संकल्पना सुचली. पुढील काळात कुटुंबाने वसमत परिसरात अडीच एकर शेती खरेदी केली.

प्रक्रिया उद्योगास सुरुवात

सुरुवातील वनिताताईंनी प्रायोगिक तत्त्वावर कुंड्यांमध्ये लागवड केलेल्या कोरफडीपासून फेस पॅक, क्रीम, पावडर तयार केली. त्याचा वापर ब्युटी पार्लर व्यवसायात सुरू केला. त्याचे चांगले परिणाम मिळाले. त्यामुळे मागणी आणि आत्मविश्‍वास वाढला.

प्रक्रिया उद्योगाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी दहा महिलांना सोबत घेऊन त्यांनी पूजा महिला बचत गट स्थापन केला. बचत गटातील सदस्यांची कोरफडीपासून क्रीम, फेस पॅक तयार करणे, पॅकिंग, विक्रीसाठी मदत होऊ लागली.

जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांपुढे उत्पादनांचे प्रात्यक्षिक सादर केल्यानंतर २००५ मध्ये वनिताताईंनी सर्वज्ञ हर्बल कॉस्मेटिक्स या नावाने उद्योगाची नोंदणी केली.

प्रक्रिया उद्योगासाठी बचत गटाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत चार लाख रुपयांचे कर्ज मिळाले. उद्योगवाढीच्या दृष्टीने वनिताताई कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ, कामगार कल्याण मंडळ, म्हैसूर येथील केंद्रीय अन्न संशोधन संस्था यांच्यामार्फत आयोजित प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्या. त्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये चांगली वाढ झाली.

वनिताताईंनी औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागांतर्गत नोंदणी केली. कण्हेरगाव परिसरात तीन हजार चौरस फूट जागेत त्यांनी प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली.

या ठिकाणी ग्राइंडर, पल्व्हरायजर, आटोमॅटिक वेइंग मशिन, पाऊच पॅकिंग मशिनची उपलब्धता आहे. आधुनिक यंत्रणेमुळे वेळ आणि श्रमाची बचत होते. याचबरोबरीने गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार होते. उत्पादनांच्या विक्रीसाठी त्यांनी अद्ययावत विक्री दालन सुरू केले आहे.

विविध उत्पादनांची निर्मिती आणि विक्री

सध्या वनिताताई कोरफड आणि इतर औषधी वनस्पतींपासून कुमारी अर्क, हायड्रो ऑल पर्पज फेस ॲण्ड बॉडी पॅक, हर्बल पॅक, हल्दी चंदन वांग क्रीम, हर्बल हेअर ऑइल, हेअर क्लीन शाम्पू, आवळा पावडर अशी पंधरा विविध उत्पादने तयार करतात. गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे ग्राहकांकडून ग्राहकांपर्यंत प्रचार होत असल्याने मागणी वाढत आहे.

राज्यभरातील कृषी प्रदर्शने, महिला स्वयंसाह्यता गटांच्या प्रदर्शनामध्ये वनिताताई सहभागी होतात. उत्पादनांच्या वाहतुकीसाठी वाहन खरेदी केले आहे.

कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ योजनेअंतर्गत स्टॉलवरून उत्पादनांची विक्री होते. त्यांनी ग्राहकांचे व्हॉट्‍सअप ग्रुप आहेत. त्याद्वारे मागणीनुसार उत्पादने पोचवली जातात. कुरिअर सेवेसोबत करार केला आहे. आंध्र प्रदेश, गोवा,

गुजरात आदी राज्यांतही उत्पादनांना मागणी आहे. दरमहा या उद्योगामध्ये पाच लाखांची उलाढाल होत असल्याचे वनिताताई सांगतात.

विदेशात अभ्यास दौरा, पुरस्काराने गौरव

वनिता दंडे यांनी दुबई, श्रीलंकेचा अभ्यास दौरा केला आहे. त्याठिकाणी उत्पादनांचे सादरीकरणही करण्याची संधी मिळाली. मराठावाडा उद्योगिनीसह अनेक जिल्हा, राज्यपातळीवरील पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

औषधी वनस्पतींची लागवड

सुरुवातीच्या काळात वनिता दंडे या प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी कोरफड तसेच अन्य औषधी वनस्पती जालना जिल्ह्यातून मागवीत असत. त्यासाठी वाहतूक खर्च होत असे. २०१६ त्यांनी माळवटा (ता. वसमत) शिवारात अडीच एकर शेती घेतली.

त्यातील एक एकरामध्ये विविध औषधी वनस्पती, फळझाडांची लागवड केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्वतःच्या शेतातील कच्चा माल प्रक्रियेसाठी उपलब्ध होत असल्याने खर्चात बचत झाली आहे. याचबरोबरीने वनिताताईंनी हिंगोली तालुक्यातही अडीच एकर शेती घेऊन औषधी वनस्पतींची लागवड केली आहे.

एक एकरामध्ये प्रत्येकी दोन गुंठे क्षेत्रावर विविध औषधी वनस्पतींची लागवड आहे.औषधी वनस्पतींचे वार्षिक तसेच बहुवार्षिक असे प्रकार आहेत. प्रक्रिया उद्योगासाठी कोरफड ही महत्त्वाची वनस्पती आहे.

कोरफडीची वीस गुंठ्यांवर लागवड असून, त्यामध्ये अश्‍वगंधाचे आंतरपीक आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये शतावरी, जिरॅनियम, सिट्रोनिला, गुळवेल, वावडींग, रान जास्वंद, आंबे हळद, बेडकीचा पाला, पुदिना, रान तुळस, थाई लिंबू, मिरी, जायफळ, लवंग, तमाल पत्र, महापुरुष, समुद्रवेल, रानचाफा, काळी गुंज, पांढरी गुंज,कडुनिंब, बहाळा, बेहडा यासह अंजीर, चिकू, ड्रॅगन फ्रूट, अननस, केळी, सुई लिंबू या फळझाडांची लागवड आहे.

कृषी विभागाच्या अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत शेडनेटगृहामध्ये रोपवाटिका सुरू केली आहे. या ठिकाणी आंबा तसेच विविध भाजीपाला रोपांची निर्मिती करून विक्री केली जाते.

महिला गटातून रोजगार निर्मिती

परिसरातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी वनिताताईंनी पूजा महिला शेतकरी बचत गट, सर्वज्ञ महिला सहकारी औद्योगिक संस्था, भाग्यलक्ष्मी सेवा संस्था स्थापन केली आहे. जिल्हा उद्योग केंद्राने त्यांना २५ लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत शिवणकाम, हस्तकला, बांबूपासून विविध वस्तू निर्मिती, जॅम, जेली, सरबत, आइस्क्रीम निर्मिती आणि विक्रीबाबत प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. महिला बचत गटाद्वारे हळद पावडर, विविध प्रकारची लोणची, आवळा सरबत,पपई कॅण्डी आदी उत्पादने तयार केली जातात.

कुटुंबाची मिळाली साथ...

औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून १५ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. वनिता यांना पती अशोकराव यांची खंबीर साथ आहे. निवृत्तीनंतर अशोकराव पीक लागवड ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन सांभाळतात.

मुलगा कृष्णा हा अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर आहे. त्याची उत्पादन निर्मिती तसेच विपणन प्रक्रियेत मदत होते. कृषी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, खादी ग्राम उद्योग आदी विभागांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते.

संपर्क - वनिता दंडे - ९८६०२८७५१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT