शेती हेच व्रत घेऊन अखंड कष्टाने आपली शेती फुलवणारे विनायक मुळूक
शेती हेच व्रत घेऊन अखंड कष्टाने आपली शेती फुलवणारे विनायक मुळूक 
यशोगाथा

आपत्तींशी लढून यशाचा झेंडा फडकवलेला 'सैनिक'

मनोज कापडे

मुंबईत हमाली केल्यानंतर पांडुरंग मुळूक (चासकमान, जि. पुणे) गावी परतले. गहाण पडलेली जमीन कष्टाने सोडवली. त्यांचेच संस्कार घेत मुलगा विनायकनेही प्रामाणिक, श्रद्धापूर्वक शेती कसली. एक एकराच्या शेतीचे रूपांतर चार एकरांत केले. दिवसरात्र एक करीत शेतीतून मोती पिकवत अवघ्या कुटुंबाला सुखी-समाधानी ठेवणारा विनायक शेतीतला आदर्श, झुंजार सैनिकच आहे.   गाव दुष्काळाने भाजून निघत होते. घरात खायला अन्न नाही. जमीन गहाण पडलेली. गाठीला पैका नाही. अशातच १९६६ मध्ये मुंबईला जायला घराबाहेर पडलो. दिवसरात्र चालत मुंबई गाठली. मुंबईत फोर्ट भागात भाजी मार्केटला हमालीचा व्यवसाय केला. जी पुंजी जमा झाली ती घेऊन चार वर्षांनी गावाकडे परतलो. त्यातून  दोन एकर गहाण जमीन सोडवली. चासकमान (जि. पुणे) येथील पांडुरंग मुळूक यांनी मनोगत व्यक्त केले.

हिराबाईंची खंबीर साथ

पांडुरंग यांच्या सौभाग्यवती सौ. हिराबाई देखील गावातील आदर्श महिला शेतकरी. खेडच्या कडदे गावातील सधन शेतकरी भगवंता नाईकवडे यांची मी मुलगी; पण हमाली करणाऱ्या कुटुंबात दिल्यानंतरही मी संसार जिद्दीने केला. पतीच्या कष्टाला शेतमजुरीची जोड दिली. पुढे गावातील महिला बचत गटात सहभागी झाले. पतीचे उत्पन्न आणि माझी मजुरी यातून बचत करीत पैका जमा होत होता. जात्यावर दळता दळता आपल्या कष्टाळू आयुष्याच्या आठवणी सौ. हिराबाई सांगत होत्या. पुढे त्यांनीच पुढाकार घेत ‘भाग्यलक्ष्मी शेतकरी महिला बचत गट’ सुरू केला. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या स्थानिक शाखेने साथ दिली. मोलमजुरी करणाऱ्या पंधरा- वीस महिलांना एकत्र करून हिराबाईंनी या महिलांना शेतीपूरक व्यवसायाचा मार्ग दाखविला. त्याच माध्यमातून गायी आणत दुग्ध व्यवसाय सुरू केला. पडके घर बांधले. विहीर खोदली. मुलांना शिक्षण देण्यास सुरवात केली, हिराबाई सांगतात.

शिक्षणासाठी सर्व काही

विनायक यांच्या आई-वडिलांनी आपल्या चारही मुलांचे (दोन भाऊ, दोन बहिणी) शिक्षण चांगले व्हावे, यासाठी मजुरी आणि शेतीकाम कधीच सोडले नाही. बहीण सौ. मीना गबाजी गोपाळे ग्रामपंचायतीच्या दिव्याखाली शिकून पदवीधर झाली. विनायक आयटीआयपर्यंत शिकले.

आई-वडिलांचे संस्कार

आज विनायक आई-वडिलांचे संस्कार पुढे चालवत आहेत. आई-वडिलांनी पैसे नसल्यामुळे चक्क २० फूट विहीर स्वतः हाताने खणली होती. वीस फुटांखालचा कठीण दगड फुटेना, त्यामुळे मजुरीतील पैसे जमवून पुढची विहीर खोदली गेली. हे सगळे विनायक यांच्या मनात पक्के भिनले होते.त्या दरम्यान आर्थिक प्राप्तीसाठी पुण्यात एका प्रसिद्ध अौद्योगिक कंपनीत विनायक नोकरीला लागले. बहुतांश वेळा रात्रपाळीच स्वीकारली. ती संपवून सकाळी घरी यायचे. दुधाच्या धारा काढायच्या. दूध घालायचे. शेतीकाम करून दुपारचे काही तास झोपायचे. पुन्हा उठून शेती, धारा काढणे आणि कंपनीत रात्री कामाला जाणे असा अतीव कष्टाचा दिनक्रम सुरू होता. अगदी कंपनीतील व्यवस्थापन देखील चकीत झाले होते, असे विनायक म्हणाले.

अखेर पूर्णवेळ शेतीचा निर्णय

एक दिवस नोकरी सोडली. पूर्णवेळ शेतीचा निर्णय घेतला. माझ्यासाठी आयुष्यातील तो आनंदाचा क्षण होता. काही नियम कठोरपणे पाळायचे ठरविले. असे वागायचे ठरवले तर कोणीही शेती परवडत नाही असे म्हणणार नाही व शेतीला बदनाम करणार नाही, असे विनायक आत्मविश्वासाने सांगतात.

विनायक यांच्या शेतीची सूत्रे

  • पूर्वी एकच एकर शेती होती. आज चार एकरांपर्यंत वाढवली.
  • सोयाबीन, कांदा, मेथी, धने अशी वर्षभरातील पिके
  • पीक फेरपालट, बाजारपेठेचा अभ्यास करूनच पिकांची निवड
  • कांद्याची ‘लेट’ म्हणजेच जानेवारीत लागवड, त्याला पुढे चांगले दर मिळतात. एकरी साडेबारा टनांपर्यंत उत्पादन. बियाणे घरीच तयार करतात. दोन ते पाच हजार रुपये सारा या दराने रोपांची विक्री.
  • विनायक सांगतात, की सोयाबीन आमच्या भागाचे पीक नाही, तरीही त्याला जोडपीक म्हणून पाहतो. तीन वर्षांपासून या पिकाचे चांगले उत्पादन घेत आहे. यंदा चार एकरांत ४२ पोती उत्पादन.
  • विहिरीच्या दोन पाण्यात सोयाबीन उत्पादनाचे कसब मिळवले. घरच्याच बियाण्याचा वापर
  • सर्व शेतीत शेणखताचा चांगला वापर
  • स्प्रिंकलवर बटाटा; तसेच ज्वारी, मका, धना, मेथी व अन्य भाजीपाला. मेथी व धना मिळून उन्हाळी हंगामात दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न.
  • नियोजनातील ठळक बाबी

  • नफा होवो की तोटा; पण काही निर्णय ठाम
  • कोणतेही काम पूर्ण प्रामाणिकपणे
  • पहाटे साडेचार ते पाच वाजता दिवस सुरू. शेती, जनावरे संगोपन, दुग्धव्यवसाय असे रात्री दहा वाजेपर्यंत काम सुरूच
  • शेतीला दुग्धव्यवसायाची जोड. त्यातून महिन्याला १५ हजार रुपये मिळतात. सहा गायी, एक म्हैस, आठ कालवडी. दररोज ५० लिटर दुधाचे उत्पादन. गुजरातमधील आघाडीच्या कंपनीकडून खरेदी.
  • विनायक यांची विचारपद्धती

  • कोणत्याही राजकीय भानगडीत पडू नये.
  • बॅंकेला बुडवू नये, मद्यपान करू नये, आई-वडिलांना देव मानावे
  • शेतीतून आलेला पैसा अन्यत्र खर्च न करता योग्य विनियोग करावा. शेतजमीन खरेदी करावी.
  • आधी शेती नेटकी करावी, मगच जगाला मार्गदर्शन करावे.
  • बाहेरगावी मुक्काम नाही

    विनायक गेल्या दहा वर्षांत बाहेर मुक्कामी कुठे गेलेले नाहीत. कार्यक्रम आहे म्हणून शेतीकामाला सुटी घेतलेली नाही. पत्नी सौ. वैशाली यांचीही मोलाची साथ त्यांना मिळते. घरचे सर्वजण शेतीत अखंड राबतात.

    सुखाची शेती

    विनायक म्हणतात, की शेतीत उन्हातान्हात काम करावे लागते. पायांना काटे लागतात. काहींना नोकरी चांगली वाटते. मी मात्र नोकरदार आणि कंपनी मालकापेक्षा सुखी आहे. आपल्या डोळ्यांसमोर पीक वाढत असल्याचा आनंद वेगळाच असतो. शेतीत कष्ट जाणवत नाहीत.

    आधुनिक श्रावणबाळ

    आई-वडील हेच विनायक यांचे महागुरू आहेत. घरात कुणालाही सुपारीचे देखील व्यसन नाही. शेतीतून मिळालेले उत्पन्न विनायक यांनी बॅंकेत आई-वडिलांच्या नावे ठेवले आहे. त्यांनाच देव मानून त्यांची मनोभावे सेवा ते करतात. शेतीतील असंख्य समस्यांशी सामना करीत कोणत्याही आपत्तीरूपी शत्रूला न घाबरता झुंजत त्यावर यश मिळवणारे ते शेतीतील सैनिकच आहेत.

    संपर्क - विनायक मुळूक, ७३८७५१५६०५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT