वेतोरे (ता.वेंगुर्ला,जि.सिंधुदुर्ग) येथे प्रयोगशील महिला शेतकऱ्यांच्या संजीवनी सेंद्रिय भाजीपाला उत्पादक समूह कार्यरत आहे. या समुहाने जिल्ह्यासह गोवा बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाल्याची थेट आणि घाऊक विक्री करीत आर्थिक उलाढाल वाढविली आहे. कुडाळ-वेंगुर्ला मार्गावर वेतोरे हे गाव आहे. गावशिवारात आंबा,काजू ,नारळ,कोकम लागवड मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबरीने मागील काही वर्षांपासून भाजीपाल्यासाठी देखील हे गाव ओळखले जाऊ लागले आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसह विविध फळपिकांचे वेळापत्रक ठरवीत या गावातील शेतकरी शेती कामाचे नियोजन करतात. शेतीतून या गावाची आर्थिक उलाढाल चांगल्याप्रकारे वाढली आहे. या गावातील अनेक कुटुंब दुग्धव्यवसायात देखील आहेत.याच गावातील महिला गटांनी भाजीपाला लागवडीमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. महिला समूहाची स्थापना राज्यात गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान सुरू आहे. या अभियानातर्गंत वेतोरे येथील पंचवीस महिला बचत गटांचा मिळून सखी महिला ग्रामसंघ स्थापन करण्यात आला. यापैकी पाच गटातील वीस महिला वर्षभर भाजीपाला लागवड करणाऱ्या आहेत. बहुतांशी महिला रासायनिक आणि सेंद्रिय खते,कीडनाशकांचा वापर करून भाजीपाला उत्पादन घेतात. परंतु बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाल्याची मागणी लक्षात घेऊन या महिला गटांनी सेंद्रिय भाजीपाला उत्पादक समूहाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन वेतोरे गावातील भाजीपाला उत्पादन करणाऱ्या गटातील २० महिला एकत्र आल्या.त्यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनाबाबत कृषी तज्ज्ञांच्याकडून तांत्रिक माहिती घेतली. सेंद्रिय भाजीपाला उत्पादित केला तर बाजारपेठेत मागणी कशी असेल, दर अधिक मिळेल का ? याचा अंदाज घेण्याचा निर्णय झाला. भाजीपाला विक्रीसाठी महिला परिसरातील विविध बाजारपेठांमध्ये जात असतात.त्यामुळे ही माहिती मिळविणे त्यांच्यासाठी अवघड नव्हते. ग्राहकांशीच चर्चा केल्यावर असे लक्षात आले की, सेंद्रिय भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. या चर्चेतूनच २० महिलांनी २५ डिसेंबर, २०१९ रोजी संजीवनी सेंद्रिय भाजीपाला उत्पादक समूह स्थापन केला. भाजीपाला लागवडीची संपूर्ण माहिती महिलांना होती. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन करताना घ्यावयाची काळजी, गांडूळखत निर्मिती,दशपर्णी अर्क,निमअर्क बनविण्याचे प्रशिक्षण गटातील काही महिलांनी घेतले.त्यानंतर प्रशिक्षित महिलांनी इतर महिलांना याबाबत प्रशिक्षण दिले.गटातील प्रत्येक महिलेने आपापल्या जमिनीत भाजीपाला लागवड करून तो एकत्रित विक्री करण्याचा निर्णय झाला. समूहातील आरती नाईक (अध्यक्ष),संपदा नाईक (सचीव), विलासिनी नाईक (कोषाध्यक्ष), अनिता गावडे,समृद्धी नाईक ,स्मिता नाईक,जान्हवी नाईक, रश्मी चव्हाण यांनी गांडूळखत प्रकल्प सुरू केला आहे. भाजीपाल्याची थेट विक्री गटातील २० महिलांनी सेंद्रिय भाजीपाला लागवड सुरू केली.भाजीपाला उत्पादन सुरू होण्याच्या काळातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला.ज्या बाजारपेठांमध्ये यापूर्वी महिला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात होत्या, त्या सर्व बाजारपेठा बंद झाल्या. एकूणच सर्व जनजीवन ठप्प झाले.त्यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या सुरवातीलाच अडचण निर्माण झाली. उत्पादित भाजीपाल्याचे करायचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला. अडचणीवर उपाय शोधताना या महिलांनी गावातच स्टॉल उभारून भाजीपाल्याची थेट विक्री करण्याचे ठरविले. गटातील सदस्या जान्हवी नाईक यांचे वेंगुर्ला-कुडाळ मार्गालगत घर आहे. तेथे स्टॉल उभा करून भाजीपाला विक्री करण्यास सुरवात केली.कोरोनामुळे परजिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक नव्हती.त्यामुळे वेतोरे,आडेलीसह वेंगुर्ला,कुडाळ तालुक्यातील अनेक गावांमधील ग्राहक या स्टॉलवर येऊन सेंद्रिय भाजीपाला खरेदी करू लागले.मोठ्या प्रमाणात विक्री होवू लागल्यामुळे आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत झाली. महिला समुहाच्या गटामार्फत उत्पादित भाजीपाला समूहातील काही महिला विक्रीसाठी जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवलीसह गोवा राज्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. उत्पादित भाजीपाल्याची आवक पाहून त्यातील किती भाजीपाल्याची थेट विक्री आणि किती भाजीपाल्याची घाऊक विक्री करायची याचा निर्णय घेतला जातो. एकदा सेंद्रिय भाजीपाला खरेदी केलेला ग्राहक स्वतःहून पुन्हा खरेदीसाठी येतो. असे आहे नियोजन
कोट ‘‘ सेंद्रिय भाजीपाला उत्पादक समूह सुरू करणे धाडसाचे होते.परंतु महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे राज्य व्यवस्थापक समिरखान पठाण,जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार, तालुका व्यवस्थापक अमोल कावले यांचे मार्गदर्शन आणि महिला सदस्यांची मेहनत यामुळे समुहाने भाजीपाला उत्पादनात चांगली आघाडी घेतली आहे. - आरती नाईक,अध्यक्ष,संजीवनी समूह,वेतोरे ‘‘रसायन अवशेषमुक्त भाजीपाला ही सध्या लोकांची गरज आहेत.ती ओळखून संजीवनी सेंद्रिय भाजीपाला उत्पादक समूह स्थापन करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करण्यात आले. गेली तीन वर्ष अतिशय नियोजनबद्ध काम सुरू आहे.समूहाची आर्थिक उलाढाल वाढली आहे.गटातील महिलांना सेंद्रिय तज्ज्ञ तायप्पा करे, रेखा परूळेकर, समन्वयक राजेश्वरी परब, कृषी व्यवस्थापक योगिता हळदणकर आणि उत्कर्ष आरोंदेकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.‘‘ - विलासिनी नाईक,कृषी सखी ‘‘मी संजीवनी सेंद्रिय भाजीपाला उत्पादक समूहाची सदस्य आहे.सेंद्रिय भाजीपाला उत्पादनातून आम्हाला चांगला नफा होत आहे. मला मिळणाऱ्या नफ्यातून माझ्या मुलींना चांगले शिक्षण देत आहे.‘‘ - संपदा नाईक,सदस्य संपर्क ः विलासिनी नाईक,९४२१९७९८७१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.