Sunil Salunkhe while guiding the farmers. 
यशोगाथा

फळबाग, जिरॅनियम प्रक्रियेतून शाश्‍वत झाली शेती

नागठाणे (जि. सातारा) येथील सुनील हणमंत साळुंखे यांनी आले, ऊस शेतीला पेरू फळबाग, जिरॅनियम तेलनिर्मिती आणि सेंद्रिय खत उद्योगाची जोड देत अर्थकारण सक्षम बनविले. प्रक्रिया उद्योगामध्ये परिसरातील पंचवीस शेतकऱ्यांना सामील करून कायम स्वरूपी रोजगार दिला आहे.

विकास जाधव

नागठाणे (जि. सातारा) येथील सुनील हणमंत साळुंखे यांनी आले, ऊस शेतीला पेरू फळबाग, जिरॅनियम तेलनिर्मिती  आणि सेंद्रिय खत उद्योगाची जोड देत अर्थकारण सक्षम बनविले. प्रक्रिया उद्योगामध्ये परिसरातील पंचवीस शेतकऱ्यांना सामील करून कायम स्वरूपी रोजगार दिला आहे. सातारा तालुक्यातील नागठाणे हे शेतीप्रधान गाव. आल्याची बाजारपेठ म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. या गावातील सुनील हणमंत साळुंखे हे प्रयोगशील शेतकरी. साळुंखे यांनी स्वतःची साडेसहा एकर आणि खंडाच्या चार एकर शेतीमध्ये ऊस, आले, पेरू, जिरॅनियम तसेच भाजीपाला लागवडीचे नियोजन केले आहे. सुरुवातीच्या काळात पाणी नसल्यामुळे कोरडवाहू पिकांची लागवड होत होती. २००६ मध्ये त्यांनी कूपनलिका खोदली. सात हजार फूट पाइपलाइन करून त्यांनी गणेशवाडी हद्दीत पाणी नेऊन शेती बागायती केली. या क्षेत्रात त्यांनी आले, ऊस आणि हंगामी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली. भाजीपाला आणि नगदी पिकांच्या दरातील चढ-उतार लक्षात घेऊन त्यांनी तीन एकरावर पेरू लागवड करण्याचे ठरविले.  पेरू फळबागेचे नियोजन पेरू लागवडीबाबत सुनील साळुंखे म्हणाले, की २०१५ मध्ये तीन एकर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन केले. दोन एकर क्षेत्रामध्ये मोठ्या आकाराची पेरू जात आणि एक एकर क्षेत्रात सरदार या जातीची लागवड केली. पेरू रोपांची लागवड करताना दोन ओळींत १४ फूट आणि दोन रोपांत दहा फूट अंतर ठेवले. बहर धरण्यापूर्वी पहिली दोन वर्षे या बागेत आले आणि हंगामी भाजीपाला पिकांची लागवड केली. त्यातून पेरू लागवडीचा खर्च निघाला. दोन वर्षांनंतर सप्टेंबरमध्ये पेरू रोपांची छाटणी करून बहर धरण्यास सुरुवात केली. पहिल्या हंगामात झाडांचा आकार आणि गुणवत्ता बघून प्रत्येक झाडावर १५ ते २० फळे ठेवली. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत फळांचे उत्पादन सुरू झाले. पहिल्या बहरात एकरी दोन ते अडीच टन फळांचे उत्पादन मिळाले. या काळात दर चांगले असल्याने मोठ्या आकाराच्या पेरूला प्रति किलो १०० ते १२० रुपये दर मिळाला. पुढील टप्प्यात झाडाचा आकार वाढत जाईल तसतशी फळांची संख्या वाढवत नेली. यामुळे उत्पादनात वाढ होत गेली.  फळबागेचे व्यवस्थापन

  • वर्षाकाठी दोन बहर घेतले जातात. सप्टेंबर आणि मार्च महिन्यात बागेची छाटणी केली जाते. सप्टेंबर छाटणीचे उत्पादन जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात आणि मार्च छाटणीचे उत्पादन ऑगस्ट महिन्यात सुरू होते.
  • छाटणीनंतर जमिनीच्या पोतानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा दिली जाते.
  • झाडांना फूट सुरू झाल्यावर कीड, रोगनियंत्रणासाठी सेंद्रिय आणि रासायनिक कीडनाशकांची शिफारशीनुसार फवारणी. सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर भर.
  • फळे लिंबू आकाराची झाल्यावर प्लॅस्टिक पिशवी आणि फोम आवरण. त्यामुळे फळांची गुणवत्ता चांगली राहते. दरही चांगला मिळतो.
  • सध्याच्या काळात प्रति झाडास ५० ते ६० फळे ठेवली जातात. योग्य संख्येमुळे फळांची वाढ चांगली होते. झाडाची वाढही योग्य राहाते. 
  •  फळे तोडणी झाल्यावर बॉक्स पॅकिंग करून  पुणे, मुंबई बाजारपेठात जातात.
  •  छाटणीपासून बागेतील सर्व फळे विक्री होईपर्यंत एकरी एक लाख रुपये खर्च येतो. सध्या मोठ्या पेरूला ५५ रुपये आणि सरदार पेरूला ४० रुपये प्रति किलो हा दर मिळत आहे. 
  • लॉकडाउनमध्ये बांधावरून विक्री  कोरोना लॉकडाऊनमुळे सगळ्या बाजारपेठा बंद होत्या. पेरू विक्रीची अडचण तयार झाली. परंतु साळुंखे यांनी न खचता किरकोळ  विक्रेत्यांना शेती बांधावरून पेरू विक्री सुरू केली. या काळात ३० टन पेरूची सरासरी ५० रुपये किलोप्रमाणे विक्री झाली. यामुळे आर्थिक नुकसान टाळता आले.  सेंद्रिय खतनिर्मिती उद्योग  परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन साळुंखे यांनी पाच गुंठे क्षेत्रावर सेंद्रिय खतनिर्मितीचे युनिट उभारले आहे. हे खत तयार करण्यासाठी कुजलेले कंपोस्ट, निंबोळी पेंड, एरंडी पेंड, करंज पेंड, गांडूळ खत, जिवाणू संवर्धक, सिलिकॉन आदी घटकांचा वापर केला जातो. वर्षाकाठी २५० ते ३०० टन सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. खताची ‘कृषीवेद’ या नोंदणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी परिसरातील २५ शेतकरी गांडूळ खताचा पुरवठा करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत तयार झाला आहे.     जिरॅनियम प्रक्रिया उद्योग सुनील साळुंखे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून तीन वर्षांपूर्वी जिरॅनियम तेलनिर्मिती उद्योगाची उभारणी केली. त्यांनी स्वतःच्या एक एकर शेतीमध्ये जिरॅनियम लागवड केली. त्याचबरोबरीने परिसरातील २५ शेतकऱ्यांनी देखील साळुंखे यांच्या साथीने जिरॅनियम लागवड केली आहे. या युनिटमध्ये दरवर्षी १०० लिटर जिरॅनियम तेलनिर्मिती केली जाते. या तेलाची मुंबई येथील प्रक्रियादाराला विक्री केली जाते. किफायतशीर दर मिळत असल्याने जिरॅनियमची लागवड फायदेशीर ठरली आहे.    कुटुंबाची साथ आणि  तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेती आणि पूरक व्यवसायामध्ये सुनील साळुंखे यांना पत्नी संगीता यांची मोलाची साथ मिळाली आहे. मुलगा प्रथमेश आणि मुलगी करुणा यांचे इंजिनिअरिंग शिक्षण झालेले आहे. मुलांची देखील शेती, उद्योगांना मदत होत असते. पीक व्यवस्थापनामध्ये साळुंखे यांना कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, कृषी सहायक अकुंश सोनावले यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळते. त्यामुळे शेती व्यवस्थापनात दरवर्षी बदल करणे शक्य झाले आहे.  - सुनील साळुंखे, ९८५०४०१९७८

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT