सीताफळ गर पॅकिंग व कांचन ब्रॅंडद्वारे ताज्या फळांच्या पॅकिंगसह बोथरा कुटुंब
सीताफळ गर पॅकिंग व कांचन ब्रॅंडद्वारे ताज्या फळांच्या पॅकिंगसह बोथरा कुटुंब 
यशोगाथा

सीताफळाचा ‘कांचन’ ब्रॅण्ड अन् पल्पनिर्मितीही

Vinod Ingole

पंधरा वर्षांपासून सीताफळ लागवडीत हातखंडा, फळाचा कांचन ब्रॅण्ड, लागवड पध्दतीचे व नव्या वाणांचे प्रयोग करण्यात अमरावती येथील विनय बोथरा यांनी नाव मिळवले आहे. त्यापुढे जाऊन कमी ग्रेडच्या फळांचे मूल्यवर्धन करून पल्पनिर्मिती केली व त्यास विदर्भातील बाजारपेठही मिळवली आहे. सध्या अमरावती येथे वास्तव्य असलेले विनय बोथरा यांची धनज (ता. कारंजा, जि. वाशीम) येथे शेती आहे. सन १९८९ मध्ये त्यांनी रोपवाटिका व्यवसाय सुरू केला. आजमितीला सागवान रोपांचा तब्बल सात राज्यांना पुरवठा ते करतात. १५ वर्षांपासून सीताफळ बाग फुलवून या पिकातही हातखंडा तयार केला आहे. सुमारे ४८ एकरांवर सीताफळ लागवड असून, १५ ते तीन वर्षे जुनी अशी झाडे त्यात आहेत. विनय सीताफळ महासंघाचे संचालकही आहेत. सीताफळ शेती

  • सुमारे १४ जातींचे संकलन. मुख्य वाण बालानगर.
  • बारा बाय आठ, १० बाय १०, १३ बाय ८ फूट अशा विविध लागवड अंतरांचे प्रयोग
  • तिसऱ्या वर्षापासून व्यावसायिक उत्पादनास सुरुवात.
  • सप्टेंबर ते डिसेंबर असा विक्री हंगाम. मेमध्ये छाटणी. त्यासाठी कुशल कामगार तयार केले आहेत. १५ रुपये प्रति झाड असा छाटणी खर्च.
  • कांचन ब्रॅण्ड लोकप्रिय

  • प्रति झाड सरासरी २५ ते ३० किलो व कमाल ते ४० किलोपर्यंत उत्पादन मिळते. उत्कृष्ट व्यवस्थापनातून आईच्या नावाने कांचन ब्रॅण्ड विकसित केला आहे. हंगामात दररोज २००० ते २५०० बॉक्स (प्रति दोन ते अडीच किलो) नागपूर व अन्य मार्केटला या ब्रॅण्डने सीताफळ जाते.
  • केवळ स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून न राहता दिल्ली, कोलकता, भुवनेश्‍वर येथेही माल पाठवतात. दुबई येथे निर्यात करणाऱ्या अपेडा प्रमाणित निर्यातदारांनाही माल देण्यात येतो. खरेदीदारांसोबतचा व्यवहार बागेतच होतो. सरासरी दर प्रति किलो ६० ते १०० रुपये मिळतात.
  • प्रक्रियेतून मूल्यवर्धन ‘ए’ आणि ‘बी’ ग्रेडच्या फळांना चांगला दर मिळतो. मात्र लहान आकाराच्या (१५० ते २५० ग्रॅम) फळांना अपेक्षित दर मिळत नाही. त्यापासून पल्प (गर) तयार करून फळाचे मूल्यवर्धन करण्याचे ठरविले. विनय यांचा मुलगा ऋषभने ‘फूड टेक्नॉलॉजी’ विषयात ‘बी टेक’ केले आहे. त्याच्याकडे प्रक्रियेची जबाबदारी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (अकोला) सीताफळापासून गर वेगळे करणारे यंत्र विकसित केले आहे. वसई येथील उद्योजकाकडून ‘फूड ग्रेड’चे तसे यंत्र बनवून घेतले. त्यास दीड लाख रुपये खर्च आला. एक लाख ८० हजार रुपयांना ‘ब्लास्ट फ्रिझर’ खरेदी केला. पल्पमधील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहावेत यासाठी त्याचा उपयोग होतो. गरनिर्मिती

  • शास्त्रीय पद्धतीने फळातील पल्प काढल्यानंतर ब्लास्ट फ्रिझरमध्ये तत्काळ अडीच ते तीस तास ठेवण्यात येतो. तिथे उणे ४० अंश तापमान असते.
  • त्यानंतर उणे २० अंश सेल्सिअस तापमानाच्या शीतगृहात साठवणूक
  • त्यासाठी प्रकल्पस्थळी सहा टन क्षमतेचे शीतगृह (कोल्ड स्टोअरेज). त्याची किंमत सहा लाख रु.
  • सध्या बागेतील फळांचाच वापर प्रक्रियेसाठी होतो. बाहेरून खरेदी नाही.
  • हंगामात पाच ते सहा टन पल्पनिर्मिती.
  • उणे ६० अंश तापमानात पल्प ठेवल्यास त्यातील ओलावा निघून जातो. परिणामी पॅकिंगमध्ये त्यातील नैसर्गिक गुणधर्म व स्वाद तीन वर्षे राखता येतो. सामान्य वातावरणातही ठेवता येईल, अशी फ्रीजबँक विकसित करण्याचे प्रस्तावित.
  • मिळवली बाजारपेठ आइस्क्रीम, सीताफळ रबडी, शेक व विविध खाद्यपदार्थांत पल्पचा उपयोग होतो. विदर्भात अनेक आइस्क्रीम व्यावसायिक, केटरर्स आहेत. त्यांना पल्पचा नमुना देण्यात आला. त्यांच्याकडून मागणी वाढत गेली. कोरोनातील दोन वर्षांचा अपवाद वगळता अन्य वेळी बाजारपेठेत मागणी चांगली राहिली. मागणी, ‘क्वांटिटी’, पॅकिंग व वाहतूक यानुसार किलोला १६० रुपये ते २२५ रुपये दर मिळतो. लागवडीतील प्रयोग नव्या वाणाची लागवड

  • छत्तीसगड येथील एका सीताफळ वाणाचा प्रयोग केला आहे. ‘सिंगल ट्रेलिंग सिस्टीम’नुसार त्याची लागवड आहे. यात सिमेंट पोल असून तीन तारा बांधून त्यावर सहा फांद्या ठेवल्या जातात. या तंत्रज्ञानानुसार प्रति झाड ४५ ते ५० किलो उत्पादन अपेक्षित असल्याचे बोथरा सांगतात.
  • यामध्ये फांद्यांची संख्या कमी असल्याने प्रकाश संश्‍लेषण प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते. सहा फुटांपेक्षा झाडाची अधिक वाढ होत नाही. त्यामुळे तोडणी सुलभ होते. विदर्भातील हा पहिलाच प्रयोग असावा असे बोथरा यांना वाटते. सीताफळाच्या एकरी उत्पादकता वाढीसाठी संशोधनाची गरज लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला आपल्या प्रक्षेत्रावरील सुमारे १२०० झाडे संशोधनासाठी उपलब्ध करून दिली आहेत.
  • प्रयोगशीलतेचा गौरव सुसूत्रता आणि नियोजनबद्ध यांच्या बळावर शेती क्षेत्रात बोथरा यांनी ओळख तयार केली आहे. त्यात विनय शेतीतील प्रयोगांसह ‘मार्केटिंग’ची जबाबदारी सांभाळतात. तर बंधू तिलोक यांच्याकडे बाग व्यवस्थापनाची सूत्रे आहेत. सीताफळ महासंघाचे श्याम गट्टाणी, सचिव अनिल बोंडे, जयवंतराव महल्ले यांचे शेतीत मार्गदर्शन लाभते. यापूर्वी शेतीनिष्ठ पुरस्काराने बोथरा यांना गौरविण्यात आले आहे. संपर्क ः विनय बोथरा, ९८२३०३६९०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

    Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

    Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

    Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

    Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

    SCROLL FOR NEXT