Hybrid Marigold Seed Production in Shednet. 
यशोगाथा

निवृत्त कृषी पर्यवेक्षकाची फायदेशीर एकात्मिक शेती

गाडीवाट (ता. जि. औरंगाबाद) येथील कृषी पर्यवेक्षक अशोक गायकवाड यांनी निवृत्तीनंतर जोखीम कमी करणारी एकात्मिक शेती विकसित केली आहे. शेडनेट, फळबागा, देशी कोंबडीपालन, शेळीपालन, मत्स्यपालन असे वैविध्य जपत ते प्रयोगशील व उत्पन्नाचे स्रोत वाढवणाऱ्या शेतीत रमले आहेत.

डॉ. टी. एस. मोटे

गाडीवाट (ता. जि. औरंगाबाद) येथील कृषी पर्यवेक्षक अशोक गायकवाड यांनी निवृत्तीनंतर जोखीम कमी करणारी एकात्मिक शेती विकसित केली आहे. शेडनेट, फळबागा, देशी कोंबडीपालन, शेळीपालन, मत्स्यपालन असे वैविध्य जपत ते प्रयोगशील व उत्पन्नाचे स्रोत वाढवणाऱ्या शेतीत रमले आहेत. औरंगाबाद शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर गाडीवाट येथे निवृत्त कृषी पर्यवेक्षक अशोक गायकवाड यांची सात एकर शेती आहे. त्यांचे मूळ गाव खुलताबाद (जि. जालना) आहे. गाडीवाट येथील जमीन डोंगराच्या कडेला असून हलक्या प्रतीची आहे. जमिनीला चढ उतार असल्याने ती सपाट न करता उंच- सखलतेप्रमाणे वेगवेगळे ‘कंपार्टमेंट्‌स’ करण्यात आले. खोदलेल्या विहिरीला पाणीही चांगले लागले. शेततळ्यात मत्स्यपालन : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामधून अशोक यांनी ३४ बाय ३४ बाय ३ मीटर आकारमानाचे सामूहिक शेततळे घेतले. विहिरीला पाणी असले तरी दुष्काळी वर्षांत पाण्याची ‘बँक’ असावी म्हणून ही तरतूद केली. या शेततळ्यात पंगॅसियस जातीचे मत्स्यपालन केले आहे. पाच रुपयांप्रमाणे एक याप्रमाणे १२ हजार मत्स्यबीज त्यात सोडले. या माशास मोठी मागणी आहे. त्याचे कारण म्हणजे काटे नसल्याने मांसाचे चांगले तुकडे करता येतात. पाण्यात तुलनेने कमी प्रमाणात प्राणवायू असला तरी मासा तगू शकतो. सुमारे आठ महिन्यांत माशाचे वजन एक ते दीड किलो होते. मासे काढणीस तयार झाले आहेत. साधारण ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न आहे. देशी कोंबडीपालन : ग्राहकांची मागणी, उत्पादन खर्च व नफा पाहून अशोक यांनी देशी कोंबडीपालन केले आहे. रात्री कोंबड्या शेडमध्ये बंदिस्त केल्या जातात. दिवसभर शेतात मुक्तपणे संचार करतात. गावातूनच २० कोंबड्या खरेदी करून जोपासना करून आज पक्ष्यांची संख्या लहान-मोठी मिळून ५०० पर्यंत नेली आहे. चार महिन्यांचे पक्षी झाले की वजन दीड ते दोन किलो होते. कोंबडीपालन ‘रोड टच’ आहे. औरंगाबाद शहरात विविध कामांवर जाणारे तांड्यातील लोक संध्याकाळी परतताना तसेच अन्य ग्राहक कोंबड्या खरेदी करतात. दररोज २० पर्यंत नगांची खरेदी होते. कोंबडी ४०० रुपये, तर कोंबडा ७०० रुपये असा दर आहे. दररोज ताजे उत्पन्न मिळते. अंड्याची विक्री करीत नाहीत. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील वाया जाणारे धान्य खरेदी करून कोंबड्यांना देण्यात येते. बंदिस्त शेळीपालन : बारबेरी, सानेन, सिरोही, कोठा, उस्मानाबादी आदी जातींच्या शेळ्या आहेत. त्यांच्यासाठी शेड व वेगवेगळे ‘कंपार्टमेंट्‌स’ तयार केले आहेत.आफ्रिकन बोअर जातीची नर- मादी जोडी ५० हजार रुपयांना खरेदी केली आहे. सध्या २७ मोठ्या शेळ्या व १५ पिले आहेत. शंभरहून अधिक शेळ्यांची शेतावरच विक्री केली आहे. ईदसाठी विक्री करण्यासाठी राजस्थानातील पुष्कर येथून २० ते २२ किलो वजनाचे कोठा व सिरोही जातीचे बोकड विकत आणतात. वजन ४० ते ५० किलोपर्यंत झाले की त्यांची विक्री इदला केली जाते. प्रति नग १७ हजार रुपये व कमाल ३३ हजार रुपये याप्रमाणे आर्थिक प्राप्ती झाली आहे. चारा म्हणून दशरथ व लसूणघास लावला आहे. ज्वारीचा कडबा, तूर, सोयाबीन, हरभऱ्याचा भुस्साही देतात. शेडनेटमध्ये झेंडू बीजोत्पादन कृषी विभागाच्या साह्याने २० गुंठे शेडनेट बांधले आहे. यात सुरुवातीला काकडी, ढोबळी मिरची घेतली. उत्पादन चांगले मिळाले मात्र दरांनी साथ दिली नाही. त्यानंतर गेल्या वर्षी नामांकित कंपनीच्या माध्यमातून संकरित झेंडूचे बीजोत्पादन ‘बेड’ व ‘मल्चिंग’द्वारे केले. यंत्राच्या साह्याने पुंकेसर असलेल्या पावडरीचा वापर करून मजुरांच्या साह्याने मादी फुलांवर घासून परागसिंचन करण्यात आले. २० गुंठ्यांत २० किलो बीजोत्पादन मिळाले. कंपनीने प्रति किलोला ४० हजार रुपये दर देऊन ते खरेदी केले. फळबाग लागवड

  • हमखास उत्पन्नाचे साधन म्हणून नारळ, आंबा (पाऊण एकर), तैवान पिंक पेरू (एक एकर), सीताफळ (अर्धा एकर), सफरचंदाची काही झाडे व ओडीसी शेवग्याची अर्धा एकर लागवड
  • जवळपास सर्व फळपिकांचे उत्पादन सुरू व्हायचे आहे.
  • शेवग्याची एक हजार झाडे. सहा किलो बियाणे तयार केले आहे. किलोला तीन हजार रुपये दराने विक्री करण्यात येत आहे.
  • कलिंगडाची थेट विक्री आंबा व सीताफळाच्या दोन ओळींत ‘बेड’ व ‘मल्चिंग’द्वारे कलिंगड घेतले. त्याची स्वतः शेतावरच थेट ग्राहकांना विक्री केली. त्यासाठी रस्त्यालगत फलक लावला. या भागात साई मंदिर आहे. तेथे येणारे भाविक येथे येऊन खरेदी करायचे. लोकांनी आपल्या शेतात यावे, आपल्याला हवे ते फळ निवडावे, वाटल्यास फोडून पाहावे, वजन करावे व घेऊन जावे अशा पद्धतीने मार्केटिंग केले. त्यातून सुमारे १५ टन विक्री करण्यात अशोक यांना यश मिळाले. शेळी व कोंबड्यापासून खत उपलब्ध होते. ते फार सुपीक असते. त्याचाच वापर शेतीत व फळबागेत करीत असल्याचे ते सांगतात. संपर्क : अशोक गायकवाड, ७७६८९०४५४५ (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

    Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

    Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

    Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

    Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

    SCROLL FOR NEXT