Mushroom production by Trupti Dhakate.
Mushroom production by Trupti Dhakate. 
यशोगाथा

पदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय मार्गदर्शक

sandeep navale

पुणे येथील तृप्ती धकाते यांनी मशरूम (अळिंबी) निर्मिती सुरू केली असून, ती मार्गदर्शक ठरते आहे. त्यातून उत्पन्नाचा चांगला स्रोत तयार करताना चार ते पाच जणांसाठी रोजगारनिर्मितीही उपलब्ध केली आहे. ग्राहकांचा कल, संधी व मागणी या बाबी अभ्यासून त्यांनी उत्पादनांसाठी बाजारपेठही मिळविण्यास सुरुवात केली आहे. अलीकडील काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचा युवा पिढीचा कल आहे. पदवीधर असलेल्या तृप्ती धकाते या मूळ वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अळिंबीची (मशरूम) आवड असल्याने त्यावर आधारित विविध पदार्थ बनवण्याची त्यांची खासियत आहे. बाजारपेठ व ग्राहकांची गरज ओळखून मशरूमचे व्यावसायिक उत्पादन सुरू करावे असा विचार त्यांच्या मनात आला. अधिक माहिती मिळवून औरंगाबाद येथे दोन वर्षे उत्पादनासंबंधी प्रयोगशाळेत प्रयोग केले. सुरुवातीला अडचणी आल्या. हळूहळू बारकावे लक्षात आले. दरम्यान, २०१५-१६ मध्ये पुण्यात राहण्यासाठी आल्यानंतर भाडेतत्त्वावर जागा घेऊन २०१८ उत्पादनास सुरुवात केली. मशरूम निर्मिती मशरूमचे उत्पादन कमी जागेतही घेता येते. गहू, तांदूळ, मका, ज्वारी आदींपासून तयार होणारा भुस्सा आणून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. वाफा (बेड) बनवला जातो. एक किलो कोरड्या भुश्श्यापासून तीन किलोचा बेड तयार होतो. पाणी फवारल्यामुळे त्याचे वजन वाढते. त्यावर मशरूम बियाण्याची (स्पॉन) लागवड होते. सुमारे २५ दिवसांनी मशरूम तयार होते. यातील पहिले १८ दिवस बेड उबदार आणि अंधाऱ्या जागेत ठेवले जातात. त्यानंतर मोकळ्या, खेळती हवा असलेल्या जागेत ‘ग्रोइंग रूम’मध्ये हलवले जातात. सात दिवसांनंतर ते काढणीस येतात. प्रति बेड एक ते दीड किलो उत्पादन मिळते. जागेचे तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे लागते. त्या अनुषंगाने वर्षभर उत्पादन घेता येऊ शकते. मशरूम काढणीनंतर बेडचा दोन वेळा वापर होतो. त्यानंतर गांडूळ खतनिर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो. उत्पादन निर्मिती प्रक्रियेत तीन ते चार कर्मचारी सहभागी असतात. दररोज ३५ ते ४० किलो उत्पादन होते. अलीकडेच नसरापूरजवळ (ता. भोर) उंबरे येथे मोठ्या स्वरूपात प्रकल्प उभारला आहे. त्यामध्ये प्रति दिन ६० ते ७० किलोपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या ऑयस्टर आणि मिल्की जातीवर भर असला तरी भविष्यात विविध जातींचे उत्पादन घेण्याचा मानस आहे. काही खाण्यासाठी योग्य तर काहींचे औषधी उपयोग आहेत. बाजारपेठ ताज्या मशरूमची टिकवणक्षमता कमी असते. ते खुल्या वातावरणात एक दिवस तर फ्रीजमध्ये तीन ते चार दिवसांपर्यत टिकतात. उत्तम दर्जाच्या मशरूमची थेट किरकोळ विक्री ४०० रुपये प्रति किलो दराने केली जाते. भाजीपाला विक्रेत्यांसाठी हा दर ३०० रुपये असतो. स्वच्छ सूर्यप्रकाशात चांगले वाळवून पॅकिंगमधूनही विक्री होते. वाळलेल्या मशरूमची पावडरही तयार केली जाते. त्यासही बाजारात चांगली मागणी असते. कमी प्रमाणात असल्यास मिक्सर तर मोठ्या प्रमाणात पावडर बनविण्यासाठी ग्राइंडर किंवा पल्वलायझरचा उपयोग होतो. स्टॉलद्वारे विक्री सुरुवातीच्या काळात विक्रीत बऱ्याच अडचणी आल्या. पुणे शहरातील विविध उपनगरांमध्ये तृप्ती आपला स्टॉल उभारायच्या. मशरूमची भाजी, सूप पदार्थांचा स्वादही ग्राहकांना देत. त्यातून जागृती वाढण्यास मदत झाली. पिझ्झा, पास्ता आदी विविध पदार्थांत मशरूमचा वापर होतो. त्यामुळे रेस्टारंट्स, हॉटेल आणि किरकोळ ग्राहकांकडूनही चांगली मागणी असते. ग्राहकांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी मशरूमच्या पॅकेटबरोबर पाककृती असलेले माहितीपत्रकही दिले जाते. त्यामुळे नव्या ग्राहकांना त्याबाबत माहिती मिळते. व्यवसायासंबंधी सुरुवातीला जागा, शेड, अन्य असा एकूण तीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला. दर महिन्याला एक टनांपर्यंत उत्पादनक्षमता गाठता येते. महिन्याला दीड ते पावणे दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. खर्च वजा जाता ५० हजार रुपयांपर्यंत अर्थप्राप्ती होऊ शकते. जागा भाडेतत्त्वावर असल्यास खर्चाचे प्रमाण वाढते. मशरूमवर आधारित उत्पादने पावडर, बिस्किटे, पापड, मसाला, सॅलड, भजी, भुर्जी, पॅटिस, मंच्युरियन आदी. शेतकऱ्यांना मार्गदर्शन  तृप्ती शेतकऱ्यांसाठी कार्यशाळाही घेतात. राज्यातील विविध भागांतून त्यास प्रतिसाद मिळतो. मर्यादित संख्येने बॅच असल्याने सहभागी व्यक्तींना उत्पादनाचे नेमके आणि अचूक प्रशिक्षण मिळते. काहींनी त्याद्वारे व्यवसाय सुरू केला आहे. कोरोना संकटाच्या काळात ऑनलाइन कार्यशाळाही घेतल्या आहेत. आलेले अनुभव :

  • किती जागा उपलब्ध आहे त्यानुसार उत्पादन किती घेता येईल ते ठरवता येते.
  • जागा लहान असल्यास एखाद्या व्यक्तीच्या मदतीनेही व्यवसाय करणे शक्य आहे. अर्थात, त्याचे प्रमाण मर्यादित राहते.
  • ज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्यासाठीही हा उद्योग अर्थार्जनासाठी उत्तम पर्याय होऊ शकतो.
  •  कमी भांडवल, कमी श्रमात चांगला मोबदला मिळण्याची संधी असते.
  • व्यवसाय म्हणून करताना अन्न सुरक्षितता, शॉप ॲक्ट असे परवाने घ्यावे लागतात.
  • संपर्क : तृप्ती धकाते, ९३२५८१९४९८, ९८६०५७१३५८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT