Agriculture Success Story : अमरावती येथील भावेश वानखडे यांनी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या शेतीमालाला जागतिक स्तरावर बाजारपेठ देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी बीए मानसशास्त्राची पदवी घेतल्यानंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ‘सोशल इंटरप्रिनरशिप’ विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
त्यांचे वडील रवींद्र ‘एमआर’ (वैद्यकीय प्रतिनिधी) होते. कोरोना काळात त्यांचे निधन झाले. त्यामुळे घरातील मोठा आणि कर्ता म्हणून भावेश यांच्यावर मुख्य जबाबदारी आली. पदव्युत्तर शिक्षणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास भावेश यांना करता आला.
त्यातून पुढे कृषी क्षेत्रात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दरम्यान, जैविक शेती क्षेत्रात कार्यरत सर्ग विकास समितीचे (कै.) संजय रोमन यांच्याशी संपर्क आला. त्यातून सेंद्रिय फळे- भाजीपाला उत्पादन, खरेदी व पुरवठा साखळी या क्षेत्रात काही वर्षे अनुभव घेतला.
स्टार्टअपला मिळाले बळ
अनुभवातून भावेश यांनी १० फेब्रुवारी, २०२० मध्ये ‘ट्राईब ग्रोन एंटरप्राइजेस ही कंपनी स्थापन केली. त्याद्वारे महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यातील आदिवासींसोबत काम करण्यास सुरुवात केली. भावेश यांचे मामा मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील गहाल भागात राहतात. त्यांच्या माध्यमातून या भागातील २० ते २५ खेड्यांतील आदिवासींपर्यंत पोहोचणे शक्य झाले.
सुरुवातीच्या टप्प्यात आदिवासींना व्यावसायिक स्तरावरील दुग्धोत्पादक म्हणून तयार करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यांच्याकडून दुध खरेदी व त्यापासून तूपनिर्मिती सुरू केली. सन २०२० मध्ये ७० लिटरपर्यंत असलेले एकूण दूध संकलन वाढत १३ हजार लिटरवर पोहोचले. दुधाला दरही चांगला मिळू लागल्याने आदिवासींचा प्रतिसाद वाढत गेला.
पारंपरिक पद्धतीने तूप करण्याची प्रक्रिया होते. त्यामुळे त्याचा दर्जा देखील राखला जातो. सध्या २५०० रुपये प्रति किलो दराने देशभरात विविध ठिकाणी तूप विक्री होते. काही कंपन्या आपल्या ब्रॅण्डने या तुपाची पुढे विक्री करतात.
जंगली मधाचे ‘प्रमोशन’
पूर्वी आदिवासी पारंपरिक पद्धतीने झाडांवरील जंगली पोळ्यांपासून मधाचे संकलन करीत.भावेश यांच्या कंपनीकडून त्यांना शास्त्रीय पद्धतीने मध संकलन व त्यासाठी सुरक्षित पोशाखाचा वापर याबाबत प्रशिक्षित करम्यात आले. अशा पोशाखांचा पुरवठाही करण्यात आला. या सर्व प्रयत्नांमधून तीन राज्यांमधून वर्षाला ४५ टन जंगली मधाची उपलब्धता करण्यापर्यंत मजल गाठली आहे. बहुतांश मधाची विक्री घाऊक पद्धतीने होते. देशभरातील काही व्यावसायिकांनाही किरकोळ विक्रीसाठी मध उपलब्ध करून देण्यात येतो. मल्टीफ्लोरा प्रति किलो ७००, तर विशिष्ट फुलांच्या मधाची दोन हजार रुपये दराने आकर्षक पॅकिंग व लेबलमधून विक्री होते.
हळदीच्या शेतीला प्रोत्साहन
मध्य प्रदेशातील आदिवासी हळदीची शेतीही करतात. त्यांना या पिकाच्या सुधारित शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आता हळकुंडे वा त्याची पावडर या दोन्हींची कंपनीकडून एकूण ८० टनांपर्यंत वार्षिक विक्री होते. देशांतर्गत प्रति किलो ५०० रुपये, तर देशाबाहेर ७०० रुपये असे दर ठेवले आहेत.
कांडप यंत्राचा वापर पावडर तयार करण्यासाठी होतो. त्यातील कुरकुमीनचे प्रमाण कायम राखण्यावर भर दिला आहे. येत्या काळात मोरिंगा (शेवग्याच्या बियांपासून) पावडर, सातू, कॉफी, ‘मल्टिग्रेन’ आटा यासारखी उत्पादने बाजारात आणण्याचा प्रस्ताव असल्याचे भावेश सांगतात. त्याचबरोबर आदिवासींना भुईमूग लागवडीसाठी बियाणे आणि तंत्रज्ञान पुरविण्यात येणार आहे. शेंगांची खरेदी व घाण्यावर आधारित तेलनिर्मितीचे पुढील उद्दिष्ट आहे.
कंपनीची उत्साहवर्धक उलाढाल
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील ‘रफ्तार’ घटकांतर्गत २३ लाखांचा निधी भावेश यांच्या ‘स्टार्ट अप’ला मंजूर झाला आहे. नऊ लाख २० हजारांचा पहिला हप्ता मिळाला आहे. आज तीन राज्यांतील सुमारे साडेचार हजार ते पाच हजार आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत कंपनी पोहोचली आहे. त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहेत.
तर त्यातील २८०० शेतकरी शेतीमाल पुरवठा करीत आहेत. ‘ट्राइब ग्रोन’ ब्रॅण्डने उत्पादनांची विक्री होते. त्यासाठी ‘सोशल मीडिया’चाही प्रभावी वापर होतो. ट्राइब ग्रोन डॉट कॉम नावाने संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.
सुमारे ८५ ते ९० लाख रुपयांपर्यंत कंपनीची वार्षिक उलाढाल पोचली आहे. आजपर्यंत मध्यस्थांमार्फत दुबई, सिंगापूर, अमेरिका, जपान आदी विविध देशांना थोड्या थोड्या स्वरूपात निर्यातही झाली आहे. वडिल हयात असेपर्यंत त्यांचे मार्गदर्शन होतेच. पण भावेश यांना आई नंदिनी यांचेही मोठे पाठबळ आहे.
‘इनोव्हा युरोप संकल्पने’त मारली मजल
भावेश यांच्या पत्नी पल्लवी कांडलकर (वानखडे) कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सध्या त्या स्पेन देशात ‘एमबीए’ करीत आहेत. त्यांनी ‘इनोव्हा युरोप’ संकल्पनेंतर्गत व्यावसायिक स्पर्धेत भाग घेत आपल्या कंपनीचे सादरीकरण केले. तेथील परिक्षकांना आदिवासींच्या उत्कर्षासाठी चाललेले हे कार्य भावले. त्याची दखल घेत सुमारे साडेसातशे स्पर्धकांमधून निवडलेल्या दहा स्पर्धकांमध्ये वानखडे दांपत्याच्या कंपनीची निवड झाली. अंतिम फेरीपर्यंत आता मजल मारली आहे.
भावेश वानखडे ९९६०१३१४११
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.