Rajkuama and Rani Aatkare
Rajkuama and Rani Aatkare Agrowon
यशोगाथा

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

सुदर्शन सुतार

सुदर्शन सुतार

Raja Rani Brand : सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील सहाहजार लोकसंख्येच्या देगाव गाव परिसरात ऊस शेती सर्वाधिक होते. भागातून सीनानदी गेल्याचा काही लाभ इथल्या शेतकऱ्यांना होतो. गावात राजकुमार नागनाथ आतकरे यांची १० एकर शेती आहे. उसासह पारंपरिक पिके ते घेत. बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे.

पूर्वीपासूनच ते धडपडी, जिद्दी व कष्टाळू स्वभावाचे.वडील शेतीच करत, त्यांच्याबरोबर राजकुमारही शेतीत आले. पुढे पोस्ट विभागात ग्रामीण डाकसेवक म्हणून अर्धवेळ स्वरूपाची नोकरी मिळाली. आजही ते ही नोकरी सांभाळून शेतीही तितक्याच समर्थपणे कसतात. शेतीच विकास करण्यासाठी अनेक अडचणींतून तीन किलोमीटरवरून पाइपलाइन केली.

सन २०१८ मध्ये एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. त्या आधारे दोन एकर सीताफळ व पेरू, अर्धा एकर चिकू व केसर आंबा, एक एकर लिंबू अशी एकाचवेळी फळबागांची लागवड केली. शिवाय घराच्या १० गुंठे परिसरात संत्रा, मोसंबी, लिंबू अशी सुमारे ७०- प्रकारची फळझाडेही लावली.

घटनेने दाखविला प्रक्रियेचा मार्ग

एकदा पेरू घेऊन बाजार समितीत गेले असता सीताफळाला किलोला १५० ते १८० रुपये दर सुरू असल्याचे राजकुमार यांनी पाहिले. त्यांनीही सीताफळाची कष्टपूर्वक जोपासना केली. पुढील वर्षी २७ क्रेट सीताफळ बाजारात घेऊन गेले, त्या वेळी मात्र प्रति किलो ३० ते ४० रुपये एवढाच दर त्यांना देऊ केला. एवढ्या कष्टाने जपलेल्या सीताफळाची ही अवस्था पाहून राजकुमार व्यथित झाले. संताप अनावर होऊन ते सगळे क्रेट तसेच घेऊन घरी आले. सीताफळावर प्रक्रिया करायची आणि अधिकचा दर मिळवायचा असे मनाशी ठरवून तसे कामालाही लागले.

प्रक्रिया उद्योगाची वाटचाल

मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांच्याकडून सीताफळ पल्प प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. आवश्यक यंत्रसामग्री खरेदी केली. डाकसेवक असल्याने राजकुमार यांचा संपर्क चांगला होता. सुरुवातीची २५ किलो केलेली सीताफळ रबडी मित्रमंडळीत वाटली. सर्वांना ती आवडलीच. पण ७० किलोची ऑर्डरही मिळाली. मग उत्साह वाढून उद्योगाची ही गाडी नंतर थांबलीच नाही. जानेवारी २०२३ च्या दरम्यान एकेक उत्पादन तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी चिंचोली एमआयडीसी येथे भाडेपट्ट्याने जागा घेतली आहे. बॅायलर, बियांपासून वेगळा झालेला सीताफळ गर गोठवणारे यंत्र, आइस्क्रीम निर्मितीसाठी चर्नर, खवा यंत्र, कुल्फी निर्मिती यंत्र अशी सामग्री आहे.

उत्पादने व ‘ब्रॅण्डिग’

सीताफळ रबडी, बासुंदी, आइस्क्रीम, कुल्फी ही उत्पादने. बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि गुलकंदावर आधारितही ही उत्पादने. दूध व कच्चा माल शेतकऱ्यांकडून घेण्यात येतो. कोन, छोटा- फॅमिली व पार्टी पॅक अशी पॅकिंग विविधता. ग्राहकांची चांगली पसंती.

राजकुमार आणि पत्नी राणी या दोघांच्या नावावरून उत्पादनांच्या ब्रॅण्डला ‘राजाराणी’ नाव दिले आहे. सोलापुरातील मध्यवर्ती सात रस्ता परिसरात पहिली शॅापी व आजमितीस शहरात पाच शॅापी (आउटलेट्‍स) उघडल्या आहेत.

सीताफळ रबडीचा प्रति किलो दर ५०० रुपये, मिनी पॅक (१०० ग्रॅम) ६० रु.

प्रति नग कुल्फी ३० रुपये. आइस्क्रीम मिनीपॅक- ४९ रु.

पल्पचीही होते विक्री. सोलापूरसह सांगली, धाराशिव, कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा शहरात त्यास मागणी आहे.

पदार्थ निर्मितीसाठी होतो म्हशीच्या दुधाचा वापर.

उत्पादनात कोणतेही ॲडिटिव्हज, प्रिझर्व्हेटीव्हज यांचा वापर नाही.

शुद्धता आणि गुणवत्तेला प्राधान्य.

स्वतःच्या बागेतील सीताफळाचा वापर असल्याने उत्पादन खर्च कमी ठेवणे झाले शक्य.

राजकुमार झाले नोकरी देणारे

राजकुमार सांगतात, की व्यवसायाच्या माध्यमातून १४ जणांना प्रत्यक्ष रोजगार दिला आहे. डाकसेवक म्हणून जे आज मानधन मिळते त्यापेक्षा जास्त पगार आज दोन कर्मचाऱ्यांना देतो याचे समाधान आहे.

महिन्याला २० टक्के नफा मिळतो आहे. व्यवसायात पत्नी सौ. राणी यांची मोठी साथ आहे. शेती आणि डाकसेवकाच्या जेमतेम पगारावरच परिस्थिती नसतानाही मुलगा रोहन यास ‘बी फार्मसी’चे शिक्षण दिले. तो पुण्यात ‘फार्मसी कंपनी’ नोकरीस होता. मात्र प्रक्रिया व्यवसायात जम बसू लागल्यानंतर आणि भविष्यातील संधीचा विचार करून राजकुमार यांनी त्यास पूर्णवेळ व्यवसायात आणले आहे. प्रियांका आणि वैष्णवी या मुली ‘बीएएमएस’चे शिक्षण घेत आहेत.

संपर्क : राजकुमार आतकरे, ९२०९२३७११४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT