Fruit Farming : दुष्काळात शून्यातून फुलवले शेतीचे ऐश्‍वर्य

Grape Farming : प्रामाणिकपणा, हिंमत, धाडस, जिगर, दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांच्या बळावर कुरवली (ता. फलटण, जि. सातारा) येथील सचिन सांगळे यांनी दुष्काळी भागात शेतीचा कायापालट घडवला आहे.
Fruit Farming
Fruit Farming Agrowon

विकास जाधव

Success Story : प्रामाणिकपणा, हिंमत, धाडस, जिगर, दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांच्या बळावर कुरवली (ता. फलटण, जि. सातारा) येथील सचिन सांगळे यांनी दुष्काळी भागात शेतीचा कायापालट घडवला आहे. सर्व आधुनिक तंत्रज्ञान शेतापर्यंत आणून निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब शेती विकसित केली. प्रगतिशील, प्रयोगशील शेतकरी अशी ओळख मिळवताना घर आणि शेतीत शून्यातून ऐश्‍वर्य निर्माण केले आहे.

सातारा जिल्ह्यातील कुरवली ब्रु (ता. फलटण) येथील प्रगतिशील, प्रयोगशील शेतकरी अशी
सचिन सांगळे यांची ओळख आहे. त्यांची २० एकर शेती आहे. मूळचे ते बिरंगुडी (ता. इंदापूर जि. पुणे) येथील रहिवासी आहेत. पूर्वी घरी अत्यंत गरिबी होती. सन १९८५ मध्ये गावात दुष्काळ पडला,
मग परिस्थती आणखी अडचणीची झाली. सन २००४ मध्ये कुटुंबांत शेतीच्या वाटण्या झाल्या.
वडील स्वभावाने साधे व अशिक्षित होते. त्यावेळी सर्व जबाबदारी सचिन यांच्यावर आली. शंभर रुपये हजेरीवर सचिन यांना दुसऱ्यांच्या शेतावर कामाला जाण्याची वेळ आली.

शेतीची वाटचाल

संघर्षातच दिवस काढत कुरवली येथे तीन एकर माळरान जमीन सचिन यांनी खरेदी केली. त्या वेळी या भागात कोणी फिरकत देखील नसे. गावाकडील काही जमिनीची विक्री करून आणखी सात एकर माळरान येथे खरेदी केले. ही जमीन हलक्या प्रतीची, दगड- धोंड्यांनी युक्त होती. हिंमतबहाद्दूर सचिन यांनी मग नीरा उजवा कालव्या जवळ काही गुंठे जागा घेऊन विहीर घेतली. तेथून चार किलोमीटरवरून पाइपलाइन करून पाण्याची सोय केली. त्या वेळी सात एकरांत २००८ मध्ये द्राक्ष बाग घेतली.
प्रामाणिक कष्ट, अभ्यासूवृत्ती या बळावर बाग यशस्वी केली. त्यातून काही कर्जफेड केली.
मध्यंतरीच्या काळात बीएपर्यंत, तर धाकटे भाऊ सुरेश यांनी १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

Fruit Farming
Success Story : माळरानावर जतच्या गायत्री पुजारींनी शून्यातून साकारले शेतीचे विश्‍व

द्राक्षशेतीत हातखंडा

संघर्ष व मेहनतीतून अनेक अडथळे पार करीत सचिन आज शेती विकासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहेत. द्राक्ष व डाळिंब ही त्यांची आजची मुख्य पिके आहेत. दोन्ही पिकांत अनेक वर्षांच्या अनुभवातून हातखंडा तयार केला आहे. सतरा एकरांतील द्राक्ष बागेत व्हाइट व ‘कलर’ मिळून नानासाहेब पर्पल, कृष्णा, माणिक,चमन, रेड ग्लोब हे वाण आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने गोडी छाटणी होते. फळांचा ‘सनबर्निंगा’पासून बचाव करण्यासाठी बागेवर प्लॅस्टिक
आच्छादनाचा वापर होतो. नाशिक येथून मजूर व्यवस्थापन होते.

उत्पादन व विक्री व्यवस्था

-रंगीत द्राक्षांचे एकरी १० टन, व्हाइट द्राक्षांचे एकरी १३ टनांपर्यंत उत्पादन.
-रंगीत द्राक्षांना प्रति किलो ६० पासून ११० रुपयांपर्यंत, तर व्हाइट द्राक्षांना ३० ते ९० रुपयांपर्यंत दर.
-काही मालाची निर्यातदारांमार्फत रशिया, दुबई, मलेशियाला निर्यात. दक्षिणेकडील राज्यातील व्यापारीही जागेवरून खरेदी करतात. यंदा त्यांनी किलोला ९७ रुपये दर देऊ केला.

डाळिंब व अन्य शेती


द्राक्षाप्रमाणेच डाळिंबाचीही आदर्श शेती आहे. पहिली जुनी बाग काढून अलीकडील वर्षात साडेचार एकरांत नवी बाग (भगवा वाण) लावली आहे. डाळिंबाच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून
एकरी दहा टनांपर्यंत उत्पादकता मिळवली आहे. जागेवर प्रति किलो १०० ते कमाल २०० रुपये तर सरासरी १२० रुपये दर मिळतो आहे. डाळिंबातही झाडांवर नेटचा वापर होतो. त्यातून ‘सनबर्निंग’ टाळले जाऊन एकरी ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा होतो असे सचिन सांगतात.
केळी, काकडी, टोमॅटो, दोडका आदी पिकेही घेतली जातात.


केलेल्या आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान (इन्फो)

-दुष्काळात पाण्याची शाश्‍वती निर्माण करण्यासाठी शेतीतील उत्पन्नातूनच दोन कोटी लिटर व ९० लाख लिटर क्षमता अशी दोन शेततळी. पाऊस कमी झाल्यास विहिरीतील पाणी आणून शेततळी भरली जातात. उन्हाळ्यात या पाण्याचा मोठा फायदा होतो.
-सर्व म्हणजे २७ एकर क्षेत्र स्वयंचलित ठिबक सिंचनाखाली आणले आहे. तसेच १५ केव्ही क्षमतेची सौर यंत्रणा (४५ पॅनेल्स) बसविली आहे. त्यावर साडेसात एचपी क्षमतेचे दोन पंप चालत असल्याने भारनियमनाच्या काळात रात्री किंवा दिवसा पाणी देता येते.
-गांडूळ खत युनिट, नाडेप खड्डा पद्धती. शेतातील पालापाचोळा कुजवून कंपोस्ट निर्मिती. सेंद्रिय स्लरी तयार करून त्याचा वापर.
-यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर. ट्रॅक्टरचलित आवश्यक सर्व अवजारे.
-अवकाळी पाऊस, तापमान यांच्यापासून फळपिकांचे नियंत्रण करण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर
- सौरऊर्जेवरील स्वयंचलित हवामान केंद्रही उभारले आहे.
-कायम स्वरूपी २० कामगार असल्याने कामे वेळेत होतात.
-आई रंजना, वडील साधू यांचे मार्गदर्शन. पत्नी पूनम व बंधू सुरेश यांची मदत.
-कृषी विभाग, विविध बँका यांचे मोठे सहकार्य. द्राक्षात नाशिक जिल्ह्यातील सदाशिव शेळके व डाळिंबात दिलीप अहिरेकर यांचे मार्गदर्शन.

शेतीत कमावले यश (इन्फो)

एकेकाळी दुसऱ्यांकडे हजेरीवर कामाला जाणाऱ्या सचिन यांनी केवळ शेतीतून दुष्काळात ऐश्‍वर्य
तयार केले आहे. आजपर्यंत जपलेला प्रामाणिकपणा, हिंमत, धाडस, जिगर, दुर्दम्य इच्छाशक्ती
या बाबी त्यासाठी कामी आल्या. आर्थिकदृष्ट्या फसवण्याचेही तसेच मानहानीचे प्रसंग आले.
पण न डगमगता सचिन पुढे चालत राहिले. चांगली माणसेही भेटत गेली. सचिनही त्यांचे नेटवर्क उभे करीत गेले. त्यातूनच बंगला, वाहने व घरातील अन्य सेवासुविधा तयार करणे शक्य झाले.
सचिन यांनी ओमसाई शेतकरी बचत गटाची स्थापना व त्यापुढे जाऊन याच नावाने शेतकरी कंपनीही सुरू केली आहे.

पुरस्कार
-राज्य शासनाचा उद्यान पंडित (२०१६)
-यंदाच्या वर्षी २०२१ चा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
-‘यशवंत’, सेवागिरी, ‘शरद पवार’ आदी कृषी प्रदर्शनांमध्ये आदर्श शेतकरी सन्मान.सचिन सांगळे, ८४११९८५५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com