Maize Farming Agrowon
यशोगाथा

Maize Farming : हंगामी मका पिकातून साधले उत्पन्नाचे गमक

Agricultural Success : कोल्‍हापूर जिल्ह्यातील तारदाळ (ता. हातकणंगले) हे कोरडवाहू पट्ट्यातील गाव. भूजलाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या आपल्या शेतीमध्ये बाबासाहेब शंकर महाजन यांनी मक्‍यासारख्या हंगामी पिकांमध्ये सातत्य ठेवले आहे. मका उत्पादनासोबत चारा विक्री, मुरघास निर्मिती आणि त्यावर आधारित पशुपालन यातून उत्पन्नांचे अनेक स्रोत तयार केले आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले

Farming Strategies : तारदाळ शिवारात महाजन कुटुंबीयांची पाच एकर मध्यम प्रतीची शेती आहे. पाण्यासाठी २ विहिरी, पाच कूपनलिकांवर अवलंबून असलेल्या बाबासाहेब महाजन यांनी बहुतांश क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन केले आहे. शेतीमध्ये एक ठोक नियमित उत्पन्नांसाठी दीड एकरामध्ये ऊस पीक असते. याशिवाय दर हंगामातून नियमित उत्पन्न मिळत राहण्यासाठी त्यांच्याकडे साधा मका आणि स्वीट कॉर्न एक ते दीड एकर, अन्य क्षेत्रात भुईमूग, ज्वारीसारखी पिके असतात. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी केवळ उसाच्या पिकांवर अवलंबून असतानाही बाबासाहेब यांनी ऊस पीक मर्यादित ठेवून विविध हंगामी पिकांची लागवड केली आहे. त्यातून वर्षभर नियमित उत्पन्न मिळत राहते. पूरक व्यवसाय म्हणून दीड गुंठ्यात मुक्तसंचार पद्धतीने पशुपालन करतात. त्यांच्याकडे पाच म्हशी, चार गायी आहेत. जनावरांची निगा राखताना आहार व्यवस्थापनाकडे काटेकोर लक्ष देत त्यांनी दूध उत्पादनामध्ये पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढ मिळवली आहे. रोज सरासरी ३० ते ३५ लिटर दूध संकलन केले जाते.

मका उत्पादनात सातत्य

मका हा बाबासाहेब यांचे मुख्य नफा मिळवून देणारे पीक बनले आहे. पूर्वी काही वर्षे ते उसामध्ये आंतरपीक म्हणून स्वीट कॉर्न करत. पुढे वेगळ्या एक ते दीड क्षेत्रावरही मक्याची लागवड करू लागले. या पिकातून स्वीट कॉर्नमधून मक्याच्या कणसाबरोबरच चारा उपलब्ध होतो. स्वतःच्या जनावरांची गरज भागवून उर्वरित चाऱ्यापासून मुरघासही ते तयार करतात. हा मुरघास स्वतःच्या जनावरांसाठी प्राधान्याने वापरला जातो.

मुरघास निर्मिती

जनावरांच्या खाद्यामध्ये मक्याचे प्रमाण अधिक ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी स्वतःच्या शेतात ते मक्याचे पीक घेतात. कसबा बावडा येथील मका संशोधन केंद्राने दिलेले बियाणे मका उत्पादनासाठी वापरतात. कधी फक्त चाऱ्यासाठी, तर कधी स्वीट कॉर्नचे उत्पादनही ते घेतात. उसामध्ये आंतरपीक म्हणूनही त्याची लागवड केली जाते. मक्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर कडबा कुट्टी मशिनने बारीक करून घेतात. तो पोत्यामध्ये दाबून भरून ठेवला जातो. पोत्यात हवा राहू नये, यासाठी यंत्राद्वारे पोत्यातील हवा काढून घेतली जाते. साधारणपणे ४५ दिवसांनंतर मुरघास तयार होतो. वर्षाला सुमारे चार ते सहा टन मुरघास तयार केला जातो.

पशुपालनातील आहार नियोजन

चारा देताना एका जनावराला प्रतिदिन वीस किलो कडबा कुट्टी, हत्तीघास, गवत या मिश्रणाबरोबरच चार ते पाच किलो चारा दिला जातो. याशिवाय गोळी पेंडही दिली जाते. कोणताही चारा असला तरी तो मुरघासबरोबर दिल्यास जनावरे तो चारा शिल्लक न ठेवता खातात, असा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे जनावरांची कार्यक्षमता वाढते. दुधाचेही प्रमाण ३० ते ३५ टक्के वाढते. मनसोक्त चारा खाल्ल्याने जनावरेही शांत राहतात.

वर्षभर अर्थप्राप्तीचे मांडले गणित

पाच एकरांमध्ये दरवर्षी ऊस व मका ही पिके ठरलेली असतात. हवामानानुसार अन्य पिके घेतली जातात. उसाच्या पिकातून सुमारे १.२५ लाख रुपये, मक्‍याच्या दोन पिकातून सुमारे दोन लाख रुपये, भुईमूग व ज्वारी पिकातून सुमारे एक लाख रुपये असे निव्वळ उत्पन्न हाती येते. त्याच प्रमाणे पाच ते दहा गुंठे क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड असते. हे सर्व कमी पाण्यातही शक्य होते.

दुग्धोत्पादनातून दरमहा तीस हजार रुपयापर्यंत रक्कम हाती येते. सुमारे दहा हजारांचा व्यवस्थापन खर्च वजा केल्यास दरमहा वीस हजार रुपये शिल्लक राहतात.

मक्याबरोबर रब्बी ज्वारीही कडब्‍यासाठी केली जाते. त्यामुळे जनावरांच्या आहारासाठी नियमित चारा उपलब्ध राहतो. दूध उत्पादनाच्या खर्चात बचत होते.

जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी घरच्या जनावरांच्या सर्व शेणखताचा वापर स्वतःच्या शेतीमध्येच करतो.

पाणी कमी आणि पावसावरच अवलंबून असलेल्या आपल्या शेतीमध्ये नफा नुकसान चालूच राहते. एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा हंगामी पिके बरी पडतात. शेती आणि गुंतवणूक अधिक काळ अडकून पडत नाही. नफ्याने चढून जायचे नाही आणि नुकसानाने खचून जायचे नाही, हे आपले धोरण असल्याचे बाबासाहेब महाजन सांगतात. त्यांना शेती कामांमध्ये बंधू बाळासाहेब, मुले विनायक, विशाल आणि ओंकार यासह पत्नी सौ. मीनाक्षी व वहिनी सौ. पमाताई या सर्व कुटुंबीयांची मदत होते.

शास्त्रीय मार्गदर्शन

गावात बाबासाहेब महाजन हे बळीराजा कृषी विज्ञान मंडळही चालवतात. त्यात परिसरातील ५० शेतकरी सभासद आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषी महाविद्यालयाचे विस्तार शिक्षण व संज्ञापन विभागप्रमुख डॉ. भरत कोलगणे, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. संदीप पाटील, आळते येथील विस्तार गट केंद्राचे प्रमुख बाबूराव आवळे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ, मका पैदासकार डॉ. सुनील कराड, कृषी विद्यावेत्ता डॉ. सुहास भिंगारदेवे यांच्या नियमित संपर्कात राहतात. त्यामुळे सर्वांनाच लागवडीपासून काढणीपर्यंत आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध होते.

...असे आहे फायद्याचे गणित

या भागात आडसाली ऊस लागवड मोठ्या प्रमाणात आहे. हे पीक पंधरा महिने शेतात राहतात. वेळेवर तोडला गेला तरी पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने सरासरी उत्‍पादन एकरी चाळीस टनांपर्यंत मिळते. अशा स्थितीत उसापासून सरासरी सव्‍वा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्याच ठिकाणी मका पीक घेतल्यास, ते ऐंशी दिवसात निघते. गेल्याच महिन्यात एकरी पाच टन स्वीट कॉर्न मिळाला. त्याला प्रति टन २२,५०० रुपये दराप्रमाणे १ लाख १२ हजार ५०० रुपये मिळाले. साध्या मक्याला नियमित मागणी असते. मक्याच्या कणसांची किरकोळबरोबर घाऊक विक्री केली जाते. त्यापासून जुलैमध्ये झालेली वैरण ताजीच २१,००० रुपयांमध्ये विकली गेली. सामान्यतः वैरणीचा आम्ही मुरघास करतो. या वर्षी अधिक पावसामध्ये मुरघास करणे शक्य झाले नाही. म्हणजे गरजेनुसार वैरण आणि मुरघास दोन्ही पर्याय वापरता येतात. याचाच अर्थ दीड वर्षात उसापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत मका पीक दोन वेळा आणि ज्वारी एकदा घेता येते. म्हणजेच उसाच्या तुलनेत कितीतरी अधिक उत्पन्न मका हे पीक देते. पुन्हा मक्याला पाणी कमी लागते. साधारणतः एप्रिलमध्ये पाण्याचा अंदाज घेऊन ठिबकवर मका लागवड केली जाते. कीडनियंत्रणासाठी साधारण चार फवारण्या, तीन वेळा भांगलण याशिवाय फारसे व्यवस्थापन करावे लागत नाही. त्यासाठी जास्तीत जास्त ३० हजार रुपये खर्च येतो. मक्याच्या काढणीनंतर रब्बीमध्ये भुईमूग किंवा ज्वारीसारखी पिके घेता येतात.

बाबासाहेब महाजन, ९४२३८१३७०९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा कडका राहणार: राज्यातील बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमानात घट

Karanja Assembly Constituency : कारंजा मतदार संघाला ४६ वर्षानंतर मिळाल्या पहिल्या महिला आमदार

Jayakwadi Dam : जायकवाडीतून मिळणार रब्बीसाठी तीन आणि उन्हाळी पिकांसाठी चार अवर्तन

Agriculture Irrigation : सिंचनासाठी शेतकऱ्यांचे रात्री जागरण

Rabi Season 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी

SCROLL FOR NEXT