Technology Company
Technology Company Agrowon
यशोगाथा

Agriculture Marketing : पणन यंत्रणेत ‘रावेर’च्या कंपनीची भरारी

Chandrakant Jadhav

Technology company : जळगाव जिल्ह्यात ऐनपूर (ता. रावेर) हे गाव आहे. तापी नदीचा लाभ गावास होतो. ही मुख्य नदी असून, शिवारात जलसाठे (Water Stock) मुबलक आहेत. काही शेतकऱ्यांनी उपसा सिंचन (Irrigation) करून घेतले आहे. शिवारात जमीन काळी कसदार आहे.

केळी (Banana), कापूस (Cotton), मका (Maize), मसाला वर्गीय पिकांच्या उत्पादनासाठी (Spices Crop Production) हा परिसर प्रसिद्ध आहे. केळीची लागवड बारमाही केली जाते.

कंपनीची स्थापना

कंपनीचे जितेंद्र युवराज पाटील अध्यक्ष आहेत. सचिवपदी असलेले राहुल पाटील पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. त्यांनी २० वर्षे नोकरी केली. परंतु शेती, ग्रामविकास हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून नोकरीचा राजीनामा देत ते कंपनीच्या स्थापनेत सक्रिय झाले.

अनिता सदाशिव पाटील, अर्चना संदीप पाटील, अजय मुरलीधर पाटील, अतुल मधुकर पाटील, मनोज श्रीराम पाटील, विनोद पाटील, रमेश भगवान पाटील आणि मिलिंद रामदास पाटील हे संचालक आहेत. कंपनीचे भागधारक किंवा सभासद रावेर तालुक्यातील २५ गावांतील आहेत.

प्रति सभासद दोन हजार रुपये भागभांडवल संकलित करण्यात आले आहे. सध्या ८०४ सभासद असून १२२ महिला, तर ६८२ पुरुष शेतकरी आहेत.

केळी पिकातील कार्य

केळी पिकात रावेर तालुका जगात ओळखला जातो. महाबनाना, अखिल भारतीय केळी उत्पादक संघ यांचेही मोठे काम रावेर येथेच आहे. साहजिकच शेतकरी कंपनीने केळी हेच पीक समोर ठेवून कार्य सुरू केले. परिसरात निर्यातक्षम केळीचे उत्पादन वाढावे हा देखील कंपनीचा हेतू होता.

या अंतर्गत निर्यातक्षम उत्पादनासाठी प्रक्षेत्र भेट, तज्ज्ञ मार्गदर्शनातून शेतकरी प्रशिक्षण आदी कार्यक्रम घेतले. ग्रॅण्ड नैन या वाणाच्या उतिसंवर्धित रोपांवर भर देण्यात आला. केवळ तेजीतच नव्हे तर मंदीतही चांगले काम करण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो.

कोविड काळात कंपनीने सुमारे दोन कोटींची उलाढाल केली. विक्री व्यवस्था भक्कम करताना निर्यातदार कंपन्या, परवानाधारक संस्थांशी संपर्क केला आहे. यंदा परदेश व उत्तर भारतात केळीची पाठवणूक वाढेल असा अंदाज आहे.

खरेदी करताना गुणवत्ता हा मुद्दा महत्त्वाचा असतो. त्यादृष्टीने शेतातच स्वच्छता, प्रतवारी व पॅकिंगची कार्यवाही केली जाते. तेरा किलोच्या बॉक्समध्ये केळीचे पॅकिंग होते.

हरभरा विक्री

रावेर तालुक्यात केवळ एकच शासकीय खरेदी केंद्र आहे. हरभरा विक्रीत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी यायच्या.

ही समस्या लक्षात घेऊन कंपनीने शासकीय धान्य खरेदी केंद्रासंबंधी प्रस्ताव मंजूर करून घेतला. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांकडील हरभऱ्याची खरेदी शासनाकडून होऊ शकली.

कंपनीची यंत्रणा

कंपनीचे ऐनपूर येथे १०० बाय १०० फूट क्षेत्रफळाचे गोदाम असून, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून ते भाडेतत्त्वावर घेतले आहे. लवकरच स्वमालकीचे गोदाम उभारण्याच्या प्रयत्नातही कंपनी आहे.

केळीत ‘सीएमव्ही’ रोगाची समस्या शिवाय अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेऊन पीक फेरपालट, माती- पाणी परीक्षणाचे कामही सुरू केले आहे. सुमारे १२०० शेतकऱ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. ऐनपुरात सुसज्ज, संगणकीकृत कार्यालयही आहे.

ज्ञानेश्‍वर बाविस्कर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर संकेत पाटील अकाउंट विभाग व भूषण पाटील केळी खरेदीची जबाबदारी सांभाळतात.

ॲक्शन फॉर सोशल असेसमेंट (भोपाळ) या संस्थेचे अमोल पाटील, तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी एल. ए. पाटील, ‘नाबार्ड’चे (जळगाव) जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, ‘आत्मा’चे उपसंचालक कुरबान तडवी यांचे मार्गदर्शन होते.

विविध परवाने मिळवले

कंपनीने कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे केळी खरेदी-विक्री, भुसार माल खरेदी- विक्री, कृषी विभागातर्फे निविष्ठा विक्री आदी परवाने घेतले आहेत. पणन संचलनालयाकडेही थेट खरेदीसाठी केलेला अर्ज मंजूर झाला आहे. ई नाम अंतर्गतही नोंदणी झाली आहे.

आयातदार व निर्यातदार कोड, अपेडातर्फे आंतरराष्ट्रीय निर्यात परवाना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थांसोबत गहू विक्री करारासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आश्‍वासक उलाढाल

कंपनीने केळी खरेदी-विक्रीत एक कोटींवर उलाढाल साध्य केली आहे. सन २०२३-२४ मध्ये पाच कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य आहे. शासकीय हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून ४२२ शेतकऱ्यांकडील साडेआठ हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा एका वर्षात खरेदी केला.

गावातच खरेदीद्वारे तो शासकीय गोदामाला पोहोच केला. यात कंपनीला पूर्ण व्यवहारावर एक टक्का कमिशन मिळाले. हळद पिकात कंपनी काम करणार आहे. त्यासाठी केरळ व अन्य भागात दौरे करून दर्जेदार वाण, उत्पादन, प्रक्रिया, बाजारपेठ याची माहिती घेतली आहे. कंपनी दरवर्षी नफ्यात आहे. दरवर्षी त्यात वाढ होत आहे.

पुढील मनोदय

‘नाबार्ड’च्या मदतीने २५ लाख रुपये कर्ज मिळाले आहे. त्यातून ऐंनपूर येथे कृषी सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हळद प्रक्रिया उद्योग

व ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत एकात्मिक पॅकहाउस उभारले जाणार आहे. सुमारे ८० टन क्षमतेचे प्रीकूलिंग चेंबर, प्रतवारी, स्वच्छता व केळी वेफर्स निर्मितीचे काम केले जाणार आहे.

संपर्क - राहुल पाटील, ९०९६७३१८२६, ज्ञानेश्‍वर बाविस्कर, ९९२३६७६७६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT