Fruit Production Agrowon
यशोगाथा

Fruit Production : युवा शेतकऱ्याची फलोत्पादनात घोडदौड

Success Story : हिंगणी बुद्रुक (जि. अकोला) येथील सचिन कोरडे यांनी कल्पकता, नियोजन, धाडस व तंत्र वापरातून ३० एकरांत केळी, आठ एकरांत पपई, तर २० एकरांपर्यंत कलिंगड अशी व्यावसायिक पीकपद्धती विकसित व यशस्वी केली आहे. जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रयत्नवादी तरुण शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक तयार झाला आहे.

 गोपाल हागे

Akola Fruit Production News : अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बुद्रुक येथील सचिन गजाननराव कोरडे यांची संयुक्त एकूण १०० एकर शेती आहे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीत झोकून दिले.

भाऊ मंगेश तसेच कुटुंबीयांचे सहकार्य, नावीन्यतेबद्दलची आस व प्रयत्नवाद यातून मागील १० ते १५ वर्षांत पारंपरिक पीकपद्धतीकडून फलोत्पादनाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यातूनच जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रगतिशील युवा शेतकरी म्हणून त्यांचे नाव तयार झाले आहे.

केळी झाले मुख्य पीक

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या भागात केळी अनेक शेतकरी घेतात. सिंचनाची सोय, दळणवळणाच्या सुविधा असल्याने सचिन यांनीही केळीवर लक्ष केंद्रित केले. काही वर्षांपूर्वी चार एकरांपर्यंत असलेले हे पीक आजमितीला ३० एकरांपर्यंत पोहोचले आहे.

अलीकडील पाच वर्षांत ऑगस्टमध्ये लागवड केली जाते. त्याचे कारण पुढील जून-जुलैच्या काळात केळी बाजारात येतात. त्या काळाच मागणी व दरही चांगले मिळतात. पुण्याहून उतिसंवर्धित रोपे मागवून सहा बाय पाच फूट अंतरावर लागवड होते. रोपे विषाणूमुक्त असावीत याची काळजी घेतली जाते.

मातीची सुपीकता जपली

सचिन यांच्याकडील जमीन पूर्ण काळ्या स्वरूपाची आहे. त्यांच्या शेतातील एका भागात माती थोड्या वेगळ्या प्रकारची होती. तेथे केळीची वाढ व घड यांची गुणवत्ता तुलनेने अधिक मिळते असे त्यांना आढळले. त्यानंतर मग संपूर्ण काळवट शेतात नदीकाठची माती आणून टाकण्यास सुरुवात केली. एकरी १०० ट्रॉली तर एकूण एक हजार ट्रॉली असा दरवर्षी वापर होतो.

दरवर्षी केळीच्या अवशेषांचा पुरेपूर वापर केला जातो. त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. त्यामुळे रासायनिक खताचा वापर व त्यावरील खर्च काही प्रमाणात कमी झाला आहे. सचिन यांनी केळीच्या खोडापासून धागा (फायबर) बनवण्याचे काम हाती घेतले आहे.

त्यासाठी यंत्र खरेदी केले आहे. एका कंपनीसोबत त्यांनी करार केला असून, ५०० रुपये प्रति किलो दराने धाग्यांची विक्री होते. केळी पिकाच्या काढणीनंतर त्या शेतात हरभऱ्याचे पीक घेतले जाते. त्यातून फेरपालट साधली जाते. दरवर्षी केळीचे एकच पीक घेतले जाते. खोडवा टाळला जातो.

‘ॲग्रोवन’ने दिली दिशा

सचिन ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. त्यातील तांत्रिक लेख व यशकथांनी शेतीतील नियोजनात सुधारणा घडवून आणल्याचे ते सांगतात. एका यशकथेतील केळी उत्पादकाच्या नियोजनातून केळी पिकातील पाणी नियोजनात सुधारणा घडविल्याचे सचिन सांगतात. आता ‘डबल लॅटरल’ ठिबक पद्धतीने त्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे.

उत्पादन व बांधावरच मार्केट

सातत्यपूर्ण प्रयत्न व नेटक्या व्यवस्थापनातून केळीचे एकरी ३५ टनांपर्यंत व कमाल ४० टनांपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. दिल्ली, कोलकाता, जम्मू-काश्मीर भागातील व्यापारी हंगामात शेतात येऊन खरेदी करतात. कापणीही त्यांच्याकडेच असते.

किमान सात रुपये, सरासरी १० ते १२ रुपये प्रति किलो दर मिळतो. मागील वर्षी १३० टन केळी किलोला २१ रुपये दराने विकण्यात सचिन यांना यश मिळाले. व्यापारी हंगामात मुक्कामाला असल्याने त्यांच्यासाठी स्वतःच्या शेतात राहण्याची व्यवस्थाही केली आहे.

पपई, कलिंगडातून विविधता

केळी पिकाप्रमाणे सचिन यांनी पपई व कलिंगड पिकातही कुशलता मिळवली आहे. सुमारे सात- आठ एकरात ते पपई तर २० एकरांत कलिंगड घेतात. फेब्रुवारीत पपई लागवड केल्यानंतर त्याच शेतात कलिंगडाची लागवड मार्चमध्ये केली जाते. हे पीक कमी कालावधीचे असल्याने त्याच्या काढणीनंतर पुढे पपईचे व्यवस्थापन सुरू राहते.

पपईचे एकरी ३० टनांपर्यंत, तर कलिंगडाचे २० ते २५ टनांपर्यंत उत्पादन साध्य केले जाते. पपईला किलोला सात रुपयांपासून २० रुपये, तर सरासरी १० ते १२ रुपये प्रति किलो तर कलिंगडाला किलोला आठ ते नऊ रुपये दर मिळतो.

शेतीने दिले वैभव

फलोत्पादन शेतीच कास धरल्यानंतर कोरडे कुटुंबाचे अर्थकारण बदलण्यास सुरुवात झाली. त्याच जोरावर चांगले घर त्यांनी बांधले. वीस एकरांपर्यंत शेती वाढवली. काही जागा घेतल्या. चार ट्रॅक्टर्स व चारचाकी वाहन घेतले आहे. शासनाच्या विविध योजनांच्या आधारे पॅकहाऊस, अवजारे बँक, विविध प्रकारची यंत्रे घेतली आहेत.

ज्ञानामुळेच कौशल्य वाढले

शेतीतील विविध ज्ञान मिळवण्यासाठी सचिन कायम प्रयत्नशील असतात. त्यांनी हैदराबाद, राहुरी, नाशिक, जळगाव खानदेश, मध्य प्रदेश, बारामती आदी ठिकाणी अभ्यास दौरा केला आहे. गावचे उपसरपंच पद सांभाळले आहे. आज परिसरातील शेतकऱ्यांचे ते मार्गदर्शक झाले आहेत.

राज्यातील केळी उत्पादकांनी एकत्र येत तयार केलेल्या केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचे समन्वयक म्हणून ते सध्या जबाबदारी पाहात आहेत. आपली मोठी शेती सांभाळण्यासाठी १० आदिवासी व्यक्तींना त्यांनी कायमस्वरूपी रोजगार देत त्यांच्या निवासाची सोयही केली आहे.

संपर्क - सचिन कोरडे, ९९२२५७८१६७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT