Ashwini Mukund Patil Agrowon
यशोगाथा

Success Story : बेसन, डाळ निर्मितीमध्ये तयार झाला ब्रॅण्ड

Article by Abhijit Dake : कुरळप (ता.वाळवा,जि.सांगली) येथील अश्विनी मुकुंद पाटील यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन बेसन निर्मिती व्यवसाय सुरु केला.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

अभिजित डाके

Production of Gram Flour and Dal : वाळवा तालुक्यातील कुरळप गावशिवारात ऊस हे प्रमुख पीक. त्याबरोबर हळद, खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची लागवड बहुतांश क्षेत्रावर असते. या गावातील अश्विनी मुकुंद पाटील यांच्या कुटुंबाची दीड एकर शेती आहे. यामध्ये उसाची लागवड आहे. परंतु केवळ शेतीवर अवलंबून राहणे कठीण असल्याने त्यांनी पूरक उद्योगाचा विचार केला.

पूरक व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल यादृष्टीने त्यांनी बेसन निर्मितीची तांत्रिक माहिती घेतली. २०१९ मध्ये यंत्राची खरेदी करून टप्याटप्याने बेसन उत्पादनास सुरवात केली. यासाठी घरच्यांची चांगली मदत मिळाली.

कोरोना काळामध्येच बेसन निर्मिती व्यवसायाला सुरवात झाली. या काळात विक्री करणे थोडे आव्हानात्मक होते. परंतु मोठी बाजारपेठ बंद असल्याने स्थानिक बाजारपेठेतील दुकानांसह घरी वापरण्यासाठी बेसनची मागणी लक्षात आली. त्यानुसार लहान-मोठ्या दुकानदारांकडून बेसन पिठाची मागणी होऊ लागली आहे.

त्यामुळे पंचक्रोशीत मार्केट उभारणे सहज शक्य झाले. बेसन विक्रीची जबाबदारी अश्विनीताईंचे पती मुकुंद यांनी घेतली आहे. सुरवातीला वडापाव निर्माते, लहान दुकानदार, बझार अशा ठिकाणी २०० ग्रॅम आणि ५०० ग्रॅम बेसनाचे नमुने देण्यास सुरवात केली. गुणवत्तेमुळे दुकानदारांच्याकडून मागणी वाढली. बाजारपेठेत बेसन उत्पादनास स्वतंत्र ओळख होण्यासाठी त्यांनी ‘राजवर्धन' ब्रॅण्ड तयार केला.

डाळ मिलची उभारणी

अश्विनीताईंना पहिल्या टप्यांत बाजारपेठेत बेसन निर्मितीसाठी डाळ खरेदी करताना अनेक अडचणी आल्या. कधी जादा दराने डाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे स्वतः डाळ मिल उभारून शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला तर या अडचणीवर मात करता येईल असा त्यांनी विचार केला. त्यानुसार नेवासा (जि.छत्रपती संभाजीनगर) आणि हेरवाड (जि.कोल्हापूर) येथे डाळ मिल प्रकल्पाची पाहणी केली.

या ठिकाणी तीन दिवस डाळ तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सहा लाख रुपयांचे डाळ मिल विकत घेतली. या उद्योगासाठी त्यांना वाळवा तालुका कृषी विभागातील अधिकारी विवेक ननावरे,नागेश जमदाडे, जयदीप पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. कृषी विभागातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजनेतून ३५ टक्के अनुदान मिळाले. २०२२ मध्ये अश्विनीताईंनी डाळ निर्मिती उद्योगाला सुरु केली.

प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी अश्विनीताईंनी ड्रायर, प्रतवारीचे यंत्र, पॉलिशर, हरभरा डाळ निर्मिती यंत्र, बेसन निर्मिती यंत्राची खरेदी केली आहे. गेल्या दोन वर्षात बाजारपेठेमध्ये बेसन निर्मितीबरोबरीने हरभरा डाळीची मागणी चांगली वाढू लागली आहे. याचबरोबरीने ग्राहकांच्याकडून मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळींची मागणी होत आहे.

विविध डाळींच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल सांगली, सातारा जिल्ह्यातील बाजारपेठेतून खरेदी करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. प्रक्रियेसाठी कोणत्या बाजारात मूग,तूर,उडदाची उपलब्धता आहे, दर किती आहे,याचा अभ्यास सुरु आहे. लवकरच मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ तयार करून विक्री करण्याचा आराखडा तयार केला आहे.

सध्या बाजारपेठेतील मागणीनुसार बेसन पीठ ७५ ते ८० रुपये किलो आणि हरभरा डाळ ७२ ते ७५ रुपये किलो दराने विक्री केली जाते. या प्रक्रिया उद्योगातून दर महिन्याचा व्यवस्थापन खर्च, मजुरी वजा करता उलाढालीतून पाच ते दहा टक्के नफा शिल्लक रहातो. या उद्योगामध्ये अश्विनीताईंनी दोन महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आश्विनीताई गावातील बचत गटाच्या सदस्या देखील आहेत. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायाबाबत गावातील महिलांना त्या मार्गदर्शन करत असतात.

उद्योगाचे व्यवस्थापन

स्थानिक शेतकरी, परिसरातील व्यापाऱ्यांकडून हरभरा डाळीची खरेदी.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसआय) परवाना.

गाव परिसर तसेच वडगाव (जि.कोल्हापूर),वाळवा (जि.सांगली),माळशिरस (जि.सोलापूर) येथे बेसन आणि डाळ विक्रीचे नियोजन.

दर महिन्याला चार टन बेसन आणि एक टन डाळ विक्री.

दहा,वीस,पन्नास किलो पिशवीमध्ये बेसन पॅकिंग. डाळीचे वीस,तीस किलोमध्ये पॅकिंग.

हरभरा डाळीची मागणीनुसार निर्मिती आणि विक्री. ‘राजवर्धन'' ब्रॅंडने बेसन आणि डाळीची विक्री.

अश्विनी पाटील ८६९८३७२५०९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT