Climate Change
Climate Change Agrowon
हवामान

Weather Update : ..तर हवामान अंदाज होतील व्यापक अन् अचूक

डॉ. रंजन केळकर

Climate Change : दरवर्षी २३ मार्च रोजी जागतिक हवामानशास्त्र दिन जगभर साजरा केला जातो. त्यासाठी एक विषय निवडला जातो ज्यावर लक्ष केंद्रित केले जाते. आतापर्यंतचे विषय हवामान आणि प्रामुख्याने हवामान बदल यांच्याशी संबंधित होते.

यंदाचा विषय मात्र हवामानशास्त्रातील बदलाशी संबंधित आहे. लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न हवामानशास्त्रज्ञ कसे करत आहेत, हवामानाचे अंदाज वर्तवण्याच्या पद्धती कशा विकसित होत आहेत, नवनवीन तंत्रज्ञान कसे वापरले जात आहे, याची माहिती जनतेला करून देणे हा यंदाच्या जागतिक हवामानशास्त्र दिनाचा उद्देश आहे.

भूतकाळ

हवामानशास्त्र जरी मागील काही शतकांत विकसित झाले असले तरी शेती आणि हवामान यांचा जवळचा संबंध शेतकऱ्यांनी पुरातन काळीच ओळखला होता. ढग, पाऊस, वारे यांच्यावर शेतकरी सतत लक्ष ठेवून असायचे, रात्री ते आकाशातील नक्षत्रांचे निरीक्षण करायचे आणि त्यावरून हवामान कसे राहील, याचा अंदाज ते स्वतःच बांधायचे.

पारंपरिक ज्ञानावर ते बरेच अवलंबून असायचे. शेतीला हवामानाशी जोडणारे कितीतरी वाक्प्रचार आणि म्हणी मराठी भाषेत अजूनही प्रचलित आहेत. पुरातन काळी मानवाची अशी समजूत होती की, पृथ्वी सपाट आहे आणि सर्व हवामान स्थानिक आहे.

१६व्या शतकात शास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून दाखवले की, पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते, संपूर्ण पृथ्वीवर हवेचे एक आवरण आहे आणि म्हणून एका ठिकाणचे हवामान अन्य ठिकाणांशी जोडलेले आहे.

त्याच सुमारास हवेचे तापमान आणि वायूचा दाब मोजणाऱ्या उपकरणांचा शोध लावला गेला आणि मग जागतिक हवामानाच्या नोंदी शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जाऊ लागल्या.

त्या नोंदींची देवाणघेवाण होऊ लागली, त्यांचे विश्लेषण केले जाऊ लागले आणि या सर्वातून आधुनिक हवामानशास्त्राचा उदय झाला. लोकांना हवामानाचा अंदाज शास्त्रज्ञांकडून मिळू लागला.

वर्तमानकाळ

या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विद्यमाने जागतिक हवामानशास्त्र संघटनेची (डब्ल्यूएमओ) स्थापना जिनेव्हा येथे २३ मार्च १९५० रोजी झाली. भारत या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे आणि जागतिक स्तरावर मोठी जबाबदारीची कामे करत आहे.

डब्ल्यूएमओ ने हवामानाच्या नोंदींची जागतिक देवाणघेवाण करण्यासाठी अनेक प्रणाली प्रस्थापित केल्या आणि विविध देशांच्या पद्धतीत सुसूत्रता आणली. मागील शतकात सुमारे १९८० पर्यंत असे व्हायचे की, हवामानाच्या नोंदी हवामान केंद्रात पोहोचवल्या जायच्या, त्या नकाशावर टिपल्या जायच्या आणि हवामानशास्त्रज्ञ त्यांचे विश्लेषण करून आपले पूर्वानुमान सांगायचे.

मात्र १९८० नंतर हे सगळे हळूहळू बदलू लागले. हवामानाचे निरीक्षण करणारे उपग्रह आणि रडार उपयोगात आले. ज्यांच्याद्वारे विस्तृत प्रदेशांवरील हवामानाची माहिती क्षणार्धात उपलब्ध होऊ लागली. इंटरनेटचे जाळे जगभर पसरल्याने माहितीची देवाणघेवाणही वेगाने होऊ लागली.

शक्तिशाली संगणकांवर हवामानाचे मॉडेल बनवता येऊ लागले. परिणामी, हवामानशास्त्रज्ञांचे बरेचसे काम मॉडेल करू लागले. पूर्वी हवामानशास्त्रज्ञ विज्ञानाला स्वतःच्या अनुभवाची आणि ज्ञानाची जोड देऊन १-२ दिवसांचे पूर्वानुमान देत असत, पण संगणक आणि मॉडेलच्या साहाय्याने ५-१० दिवसांचे पूर्वानुमान देणे शक्य झाले.

२०व्या शतकाच्या शेवटी हे सर्व होत असताना हवामान बदलाचे संकेत मिळू लागले. जागतिक हवामान बदलावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी १९८८ साली इंटर-गव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ही संस्था स्थापन केली गेली.

दर पाच वर्षांनी ती त्याविषयी एक विस्तृत अहवाल बनवते. त्याखेरीज डब्ल्यूएमओ दरवर्षी एक संक्षिप्त अहवाल सादर करते. या सर्व माहितीवर सखोल चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाखाली एक वार्षिक सम्मेलन भरवले जाते. त्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (कॉप) म्हणतात.

त्यात विविध देशांचे प्रतिनिधी, राज्यकर्ते, प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, समाजसेवक, स्वयंसेवी संस्था, अशा सर्वांचा समावेश असतो. पुढील काळात हवामान कसे बदलण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत, कोणते उपाय योजले पाहिजेत, कोणत्या तंत्रज्ञानाचा विकास व्हायला हवा, शेतीच्या पद्धतीत काही बदल करायची गरज आहे का, अशा प्रकारचे दूरगामी परिणाम असलेले धोरणात्मक निर्णय कॉप सम्मेलनात घेतले जातात.

भविष्यकाळ

२१व्या शतकातील पहिल्या दोन दशकांत हवामानशास्त्राने केलेली प्रगती लक्षणीय आहे. आज भारतासह अनेक देशांचे ३० हवामान उपग्रह अंतरिक्षात भ्रमण करत असून पृथ्वीवर सतत नजर ठेवून आहेत. त्याखेरीज २०० उपग्रह हवामानशास्त्रात संशोधनासाठी लागणारी मोहिती गोळा करत आहेत.

समुद्रावर वेधशाळा उभारता येत नाहीत, पण समुद्रावरील परिस्थितीची माहिती गोळा करणारी १,००० फ्लोट्स सागरी प्रवाहांवर तरंगत फिरत आहेत. मानवचलित वेधशाळा आणि स्वयंचलित केंद्रे यांची एकूण संख्या १० हजारहून जास्त आहे आणि ती झपाट्याने वाढत आहेत.

आपले काही शेतकरीसुद्धा खाजगी स्वयंचलित उपकरणे बसवून घेत आहेत. शेतीसाठी विशेष माहिती शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवर पोहोचवली जात आहे.

हवामानशास्त्राने केलेल्या मोठ्या प्रगतीचे सुपरिणाम आपण बघू लागलो आहोत. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या चक्री वादळांत हजारो लोकांचे प्राण आधी जात असत.

आता चक्री वादळांच्या निर्मितीचे, संभाव्य मार्गाचे आणि तीव्रतेचे पूर्वानुमान अचूकपणे अनेक दिवस आधी दिले जात असल्याने सावधगिरीचे व बचावाचे उपाय वेळीच करता येतात आणि प्राणहानी मुळीच होत नाही.

विसाव्या शतकातील आगामी दशकांत जागतिक तापमान वाढ सातत्याने होत राहिली तर तिचे काय दुष्परिणाम होतील याची काहीशी पूर्वकल्पना आपल्याला आताच मिळत आहे. त्याबरोबरच भविष्यातील तापमान रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय केले जात असल्याचेही आपण पाहत आहोत.

हवामान बदलाचे परिणाम पिकांच्या वाढीवर, अन्नधान्यांच्या उत्पादनावर, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर, जनतेच्या स्वास्थ्यावर, आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होऊ शकतील.

भविष्यात शेती, ऊर्जा, स्वास्थ्य, जलसंसाधन, वायूप्रदूषण, अशा विविध क्षेत्रांत हवामानशास्त्राचा मोठा सहभाग राहणार आहे. या संभाव्य आव्हानांना सामोरे जायला हवामानशास्त्र सज्ज आहे.

उपग्रह, रडार, संगणक, मॉडेल यांच्या जोडीला भविष्यात लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी अत्याधुनिक साधने वापरात येतील आणि हवामान अंदाज अधिक व्यापक व अचूक ठरल्याचे आपण नक्की बघू.

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

Nashik Rain Update : शेतकरी दुहेरी संकटात; दुष्काळाने पिके वाळली, आता वळवाने अनेक हेक्टर पीकं जमिनदोस्त

Animal Identification : जनावरांच्या ओळखीसाठी मायक्रो चिप

Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिके फायदेशीर

Nagpur Ratnagiri Highway : महाविकास आघाडीने केलेला कायदा शेतकऱ्यांच्या तोट्याचा, महामार्गाचे काम रखडलं

SCROLL FOR NEXT