Agriculture Weather : महाराष्ट्रावर आज (ता.१२) पासून शनिवार (ता. १८) पर्यंत १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील; तसेच उत्तर भारतावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. हिंदी महासागरावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून उत्तरेस वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच वाऱ्याचा वेगही नैर्ऋत्य दिशेने वाढण्यास सुरुवात झाली आहे.
कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील. अनुकूल तापमान लाभताच राज्यातील बहुतांशी भागात ढग जमा होऊन पूर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता राहील. गुरुवार (ता.१६)पासून पुढे दिल्लीकडील उत्तर भागावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे मोसमी वाऱ्यांना उत्तर दिशेने वाहण्यास गती प्राप्त होईल. मोठ्या प्रमाणात वारे ढग वाहून आणतील आणि शनिवारच्या (ता.१८) दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रावर प्रवेश करतील. दक्षिण अंदमान समुद्रावर मॉन्सून निर्धारित वेळेपूर्वी दाखल होणे शक्य होईल.
अरबी समुद्र, हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमानही ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवलेले आहे; तर प्रशांत महासागराचे पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालेले असल्याने हिंदी महासागरावरील वारे त्या दिशेने न वाहता सरळ भारताच्या दिशेने ढग वाहून आणतील. मॉन्सून वारे निर्धारित वेळेपूर्वी मोठ्या प्रमाणावर ढग वाहून आणतील. त्यामुळे मॉन्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता आहे.
कोकण :
कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. मात्र ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील; मात्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः कोरडे राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ७७ टक्के, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ८५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५६ टक्के, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ४१ ते ४५ टक्के राहील. मात्र ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ०.३ ते ०.९ मिमी पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदूरबार जिल्ह्यात ६५ टक्के, नाशिक जिल्ह्यात ५६ टक्के, धुळे जिल्ह्यात ४७ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ३५ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १८ ते २१ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १७ किमी, तर उर्वरित जिल्ह्यात १० किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व नैऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत २.८ मिमी पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा :
कमाल तापमान धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर जालना जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. या आठवड्यात कमाल तापमानात घट होईल. किमान तापमान धाराशिव, नांदेड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील.
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३२ ते ३७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २४ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे सकाळी व दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा नांदेड जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात ४.५ ते २.५ मिमी पावसाची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भ :
कमाल तापमान बुलढाणा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमराती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३० टक्के इतकी कमी राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १६ ते १७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान सकाळी व दुपारी अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता २.४ मिमी राहील.
मध्य विदर्भ :
कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३८ ते ३९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १८ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात १.६ मिमी पावसाची शक्यता आहे.
पूर्व विदर्भ :
चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४१ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २१ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पावसाचे प्रमाण सर्वच जिल्ह्यात प्रतिदिन १.५ ते ६ मिमी राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८२ टक्के, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ६१ ते ६८ टक्के राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सांगली जिल्ह्यात ५७ टक्के, तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत ४० ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० किमी आणि वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात प्रतिदिन २.५ मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला :
पावसाची शक्यता लक्षात घेऊन उन्हाळी बाजरी, सूर्यफूल, भुईमूग, तीळ पिकांची परिपक्व होताच काढणी व मळणी करावी.
फळबाग रोपांच्या लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे काढून ते शेणखत व मातीने भरून घ्यावेत.
उन्हाळी भाजीपाला व फळपिकांना गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
उन्हाळी नांगरट करून जमिनीची पूर्वमशागत करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.