Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon Forecast: मॉन्सून २७ मे रोजी केरळात धडकण्याची शक्यता

Indian Meteorological Department: मॉन्सून यंदा केरळमध्ये पाच दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने १०५% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला असून, राज्यात चांगल्या पावसाची चिन्हे दिसत आहेत.

Team Agrowon

Pune News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाचा प्रवास यंदा वेळेआधी होण्याचे संकेत आहेत. मंगळवारपर्यंत (ता. १३) मॉन्सून अंदमान-निकोबार बेटसमूहावर दाखल होण्यासाठी पोषक हवामान आहे. यातच देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये यंदा पाच दिवस अगोदर म्हणजेच २७ मे रोजी मॉन्सून दाखल होण्याची सुवार्ता हवामान विभागाने दिली आहे. मॉन्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये पोचतो. मॉन्सूनचे केरळमधील आगमन सात दिवस आधी किंवा उशिराने होण्याची शक्यता असते. गेल्या वर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन दोन दिवस आधीच म्हणजेच ३० मे रोजी झाले होते. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सात दिवसांत (६ जून) मॉन्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोहोचला होता. यंदा मॉन्सून पाच दिवस आधीच केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे.

वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण, वायव्य प्रशांत महासागरातील समुद्र सपाटीलगतचा हवेचा दाब, चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किरणोत्सर्ग, ईशान्य हिंद महासागरात तपांबराच्या खालच्या थरात वाहणारे वारे, इंडोनेशिया विभागात तपांबराच्या वरच्या थरात वाहणारे वारे हे सहा घटक विचारात घेऊन मॉन्सूनचे केरळातील आगमनाचा अंदाज वर्तविण्यात येतो.

यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येणार आहे.

मॉन्सूनचे केरळातील आगमन

वर्ष---आगमनाचा अंदाज---प्रत्यक्ष आगमन

२०२०---५ जून---१ जून

२०२१---३१ मे---३ जून

२०२२---२७ मे---२९ मे

२०२३---४ जून---८ जून

२०२४---३१ मे---३० मे

अंदमानात दोन दिवसांत मारणार धडक

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमान समुद्रात दाखल होण्यास पोषक स्थिती आहे. उद्यापर्यंत (ता. १३) अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची चाल वेगाने होण्याचे संकेत असल्याने चार ते पाच दिवसांतच मोसमी वारे संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत, तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन भागापर्यंत धडकण्याची शक्यता आहे. यातच दक्षिण अंदमान सागरात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४. ५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Fight: महाराष्ट्र विधानसभा लॉबीमध्ये हाणामारी; आमदारांचे कार्यकर्ते भिडले, अटक आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप

Tree Plantation : सदाहरित वृक्ष लागवडीसाठी ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चा पुढाकार

Vankranti : जाखोरीची विचारक्रांतीकडून ‘वनक्रांती’कडे वाटचाल

Warehouse Finance Receipt: गोदाम पावती वित्तपुरवठा विस्ताराची संधी

HTBT Cotton: धोरणफजिती आणि संकेताचा खेळ

SCROLL FOR NEXT