Indian Agriculture : मॉन्सूनने हरियाना, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशपर्यंत मजल मारत बराचसा भाग व्यापला आहे. तसेच निर्धारित वेळेपूर्वी मॉन्सून या सर्व प्रदेशात दाखल झाला आहे. हा आठवडाभर महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. आठवडा अखेरीस शुक्रवारी व शनिवारी (ता. ५ आणि ६ जुलै) १००० हेप्टापास्कल इतका कमी दाब राहण्याची शक्यता आहे. या काळात पावसाचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
१ जून ते २६ जून या कालावधीत सरासरीच्या १०० टक्केहून अधिक पाऊस धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यांत झाला आहे. तसेच सांगली, नगर, परभणी, बीड, जालना व जळगाव जिल्ह्यांत तेथील सरासरीपेक्षा २२ ते ४२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नांदेड, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांत सरासरी एवढा पाऊस झाला आहे. मात्र अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, ठाणे व कोल्हापूर जिल्ह्यात २२ ते ४२ टक्के इतका कमी पाऊस झालेला आहे. हिंगोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत तेथील सरासरीपेक्षा ६० ते ८० टक्के कमी पाऊस झाला आहे.
कमाल व किमान तापमानात घसरण झालेली आहे. कमाल तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमानही २२ अंश ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वाऱ्याचा ताशी वेग कोकणात १४ ते २३ कि.मी., उत्तर महाराष्ट्रात २४ ते २८ कि.मी., तर धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी ३२ कि.मी. आणि सोलापूर, नगर, सांगली जिल्ह्यांत ताशी ३१ कि.मी. इतका राहण्याची शक्यता आहे. बहुतांशी जिल्ह्यात आज आणि उद्या (ता.३० जून आणि १ जुलै) पावसाचे प्रमाण प्रतिदिन १० मिमी, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २६ ते ४२ मि.मी. राहील. धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर, नाशिक, पुणे, नगर, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता राहील.
कोकण
आज आणि उद्या (ता. ३० जून आणि १ जुलै) ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३६ ते ४० मि.मी. पावसाची शक्यता आहे. अशीच शक्यता रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांतही आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ कि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ताशी १६ कि.मी. तसेच रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ताशी २० ते २३ कि.मी. इतका राहील. कमाल तापमान ठाणे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज आणि उद्या (ता.३० जून आणि १ जुलै) नाशिक जिल्ह्यात ४ ते ५ मि.मी., धुळे जिल्ह्यात १० मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात ८ ते ११ मि.मी., तर जळगाव जिल्ह्यात ९ ते १४ मि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन ते ताशी २४ ते २८ कि.मी. इतक्या वेगाने वाहतील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व जळगाव जिल्ह्यांत ७७ ते ७८ टक्के, तर नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांत ८३ ते ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २७ ते २८ टक्के राहील.
मराठवाडा
आज आणि उद्या (ता.३० जून आणि १ जुलै) धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत १ ते ५ मि.मी., तर नांदेड व परभणी जिल्ह्यांत ८ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. हिंगोली, जालना व छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यांत आज आणि उद्या (ता.३० जून आणि १ जुलै) १३ ते १७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २३ ते २५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी ३१ ते ३२ कि.मी. इतका अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा ताशी वेग जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २८ कि.मी. राहील. एकूणच मराठवाड्यात वाऱ्याचा ताशी वेगात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होईल. कमाल तापमान हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर परभणी व जालना जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. तसेच धाराशिव, लातूर, नांदेड व बीड या जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णपणे ढगाळ राहील. सर्व जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत ५७ ते ५८ टक्के, तर धाराशिव, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ६२ ते ७० टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज आणि उद्या (ता.३० जून आणि १ जुलै) बुलडाणा जिल्ह्यात १५ ते २० मि.मी., अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ५ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत २५ ते २८ कि.मी. राहील. कमाल तापमान अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६८ टक्के राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत आज आणि उद्या (ता.३० जून आणि १ जुलै) ३ ते ८ मि.मी., तर नागपूर जिल्ह्यात ८ ते १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २४ ते २६ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७० टक्के राहील.
पूर्व विदर्भ
आज आणि उद्या (ता. ३० जून आणि १ जुलै) चंद्रपूर जिल्ह्यात ४ ते ५ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात १५ ते २६ मि.मी., भंडारा जिल्ह्यात २८ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात २६ ते ४२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ताशी १८ ते २० कि.मी. राहील. कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८० टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज आणि उद्या (ता.३० जून आणि १ जुलै) सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत ३ ते ६ मि.मी., तर कोल्हापूर जिल्ह्यात ७ ते ९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ताशी २० ते २८ कि. मी., तर सोलापूर, सांगली जिल्ह्यांत ताशी ३१ ते ३२ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ८० टक्के राहील.
कृषी सल्ला
पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी उगवण झाली नसेल तेथे बियाणे टोकावे.
या पुढील काळात पेरणी करताना जमिनीत २ ते ३ फूट खोलीपर्यंत ओल असेल तेथेच बियाण्यांची पेरणी करावी.
कमी कालावधीच्या घेवडा, उडीद, हुलगा, मटकी, मूग पिकांच्या पेरण्या जमिनीत चांगली ओल असताना करावी.
पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
जनावरांना व कुक्कुटपक्ष्यांना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.