पाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा प्रक्रिया Agrowon
चारा पिके

Fodder Processing : चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी?

युरियामध्ये नत्र म्हणजेच नायट्रोजनचे प्रमाण ४६ टक्के असत म्हणून युरिया हा नत्राचा अतिशय सहज व नियमितपणे उपलब्ध होणारा स्रोत आहे.

Team Agrowon

बरेच पशुपालक चाराटंचाईमुळे (Fodder Defect) जनावरांच्या आहारात गव्हाचा पेंढा, भात पेंढा, सोयाबीन भुसकट यासारख्या दुय्यम घटकांचा जास्त वापर करतात.

निकृष्ट चाऱ्यामध्ये कर्बोदकांच प्रमाण कमी आणि तंतुमय पदार्थ (Fiber) जास्त असतात. तसच प्रथिने अत्यल्प असतात.त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात.

त्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया (Urea Processing) महत्त्वाची ठरते.

युरियामध्ये नत्र (Nitrogen) म्हणजेच नायट्रोजनचे प्रमाण ४६ टक्के असत म्हणून युरिया हा नत्राचा अतिशय सहज व नियमितपणे उपलब्ध होणारा स्रोत आहे. 

युरीया प्रक्रियेमुळे चाऱ्याची पचनक्षमता वाढते. युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्याची चव बदलते, नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात.

मात्र जनावराच्या आहारात युरियाचा प्रमाणाबाहेर वापर झाला तर युरियाची विषबाधा होण्याची शक्यता असते. यामुळे जनावर दगावण्याची देखील शक्यता असते.

जर जनावरांमध्ये अमोनियाचे प्रमाण १ मिलीग्रॅम प्रति १०० मिली रक्तापेक्षा जास्त झाले तर विषबाधा होते.

तसच गायी-म्हशीमध्ये ११६ ग्रॅम आणि मेंढीमध्ये १० ग्रॅमपेक्षा जास्त युरिया खाण्यात आला तर वेगाने जास्तीचा अमोनिया तयार होतो जो विषबाधेसाठी कारणीभूत ठरतो.  

म्हणून निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करताना ती अतीशय काळजीपुर्वक करावी लागते. 

युरिया प्रक्रियेची योग्य पद्धत 

गव्हाचा पेंढा, भाताचा पेंढा, उसाचे पाचट इ. चा आपण युरिया प्रक्रियेसाठी वापर करू शकतो.

प्रति १०० किलो चाऱ्याच्या प्रक्रियेसाठी ४ किलो युरिया ४० लिटर पाण्यामध्ये चांगला मिसळून घ्यावा. त्यानंतर तयार झालेल्या द्रावणात एक किलो मिठ मिसळून एकजीव करावे.

सावलीत कोरड्या जमिनीवर पोते आंथरुन कुट्टी केलेला चारा एकसारखा पसरून घ्यावा. साधारणतः ६ इंच इतका चाऱ्याचा थर करावा.

पसरलेल्या चाऱ्यावर झारीच्या साह्याने तयार केलेले मिश्रण शिंपडावे आणि चारा हलवून एकजीव करून घ्यावा. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन त्यात युरिया मिश्रण मिसळून घ्यावे.

चाऱ्यावर दाब देऊन चाऱ्यातील जास्तीची हवा काढून घ्यावी.

ताडपत्री किंवा प्लॅस्टिक कागदाने चारा हवाबंद करून झाकून टाकावा.

२१ दिवस हा चारा हवाबंद ठेवावा, कारण यावर व्यवस्थित युरिया प्रक्रिया होते. २१ दिवसानंतरच हा चारा उघडावा.

जनावरांना चारा खायला देण्यापूर्वी २-३ तास अगोदर चारा मोकळ्या हवेत ठेवावा. जेणेकरून त्यामधील अमोनिया गॅस हवेमध्ये उडून जाईल. राहिलेला चारा त्यानंतर पहिल्यासारखा हवाबंद करून ठेवावा.

सुरवातीला जनावरांच्या आहारात चारा थोड्या थोड्या प्रमाणात समाविष्ट करून हळूहळू मात्रा वाढवत न्यावी. 

६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये आणि रवंथ न करणाऱ्या जनावरांना हा चारा देऊ नये.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT