Fishery Agrowon
टेक्नोवन

Fishery : छोट्या मच्छिमारांना मिळाला फायबर बोटींचा आधार

Fish Farming : गेल्या दोन दशकांमध्ये मासेमारी पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. मागील काही वर्षांपासून मासेमारीसाठी लाकडी बोटींना पर्याय म्हणून फायबरच्या बोटींकडे मच्छिमारांचा विशेष कल दिसून येत आहे.

Team Agrowon

Fiber Boats : गेल्या दोन दशकांमध्ये मासेमारी पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. मागील काही वर्षांपासून मासेमारीसाठी लाकडी बोटींना पर्याय म्हणून फायबरच्या बोटींकडे मच्छिमारांचा विशेष कल दिसून येत आहे. रत्नागिरीतील श्रीदत्त भुते यांनी फायबर बोटीचा वापर करत मच्छीमारी व्यवसायात प्रगती साधली आहे.

कोकणाला ७६० किलोमीटर अंतराची विस्तृत समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. प्रामुख्याने गिलनेट, ट्रॉलनेट, पर्ससिननेट आणि रापण या पद्धतीने मासेमारी केली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये मासेमारीमध्ये नवनवीन तंत्र आली आहेत. पूर्वीच्या लाकडाच्या बोटीची जागा आता फायबर बोटीने घेतली, तर समुद्रात टाकलेली जाळी ओढण्यासाठी हातांऐवजी मशिनचा वापर होऊ लागला आहे. वेळेची बचत, बोटींचा दर्जा अशा विविध कारणांमुळे बहुसंख्य छोटे मच्छीमारही लाकडी बोटींऐवजी फायबर बोटींचा वापर करू लागले आहेत.

नारळीपौर्णिमेचे महत्त्व ः
‘‘सण आयलाय गो आयलाय गो, नारळी पुनवेचा...’’
या गाण्यांवर मच्छीमार कुटुंब नारळीपौर्णिमेला थिरकताना पाहायला मिळतात. परंपरेप्रमाणे दरवर्षी मच्छीमार व कोळीबांधव हा दिवस उत्साहात साजरा करतात.
समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरवात केली जाते. यामागे शास्त्रीय कारणही दिले जाते. जून, जुलै आणि ऑगस्टचा अर्धा महिना उलटल्यानंतर पावसाचा जोर ओसरतो. नारळीपौर्णिमेनंतर समुद्राचे उधाणही कमी होते आणि मासेमारीला जाण्याचा मार्ग मोकळा होतो. या दिवसानंतर पुढे साधारण साडेआठ महिने मासेमारी सुरु राहते. तसेच पावसाळ्यात माशांचा प्रजनन कालावधी असल्यामुळे या काळात मासेमारीवर बंदी असते. मागील पाच वर्षांमध्ये बंदी कालावधी हा १ जून ते ३१ जुलै या दरम्यान करण्यात आला असला तरी बहुतांश मच्छीमार हे नारळीपौर्णिमेचा मुहूर्त साधतात.

लाकडी बोटींना फायबर बोटींचा पर्याय ः
काळानुरुप मासेमारी व्यवसायामध्ये अनेक बदल झाले आहेत. गिलनेटने मासेमारी करण्यासाठी आधी लाकडी पद्धतीने बोटी बांधल्या जात. मागील काही वर्षांत त्यात बदल होऊन फायबरचा वापर वाढू लागला आहे. बदलते वातावरण, लाकडी बोटींचे पाण्यामध्ये होणारे नुकसान, शंख-प्रवाळ चिकटल्यामुळे लाकडी बोटींचा समुद्रात कमी होणारा वेग या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी फायबरच्या बोटींचा पर्याय मच्छिमारांसाठी फायदेशीर ठरला आहे.
लाकडी बोट नियमितपणे स्वच्छ ठेवावी लागते. तिची स्वच्छता केल्यानंतर तिला रंगकाम करावे लागते. या उलट फायबर बोटींची स्वच्छता करण्यासाठी खर्च येत नाही. कपड्याने स्वच्छ पुसली की ती पुन्हा आधीसारखी होते. देखभाल दुरुस्तीसह व्यवस्थापनावर होणारा खर्च तुलनेने कमी आहे. या बोटींचा वेगही अधिक असल्याने मासेमारीसाठी उपयुक्त ठरते आहे.

फायबर बोटीला गडद रंगांना प्राधान्य ः
जुन्या जाणत्या मच्छीमारांना लाकडी बोटींबद्दल विशेष ममत्व. या बोटीची सर कुणालाच येणार नाही, हे त्यांचे मत आता फायबरच्या बोटींमुळे बदलत आहे. फायबर बोटींचा वरचा थोडा हिस्सा लाकडाचा ठेवण्यात येतो. त्यांच्या रंगात लाल, पिवळे अशा गडद रंगाचे वैविध्य असते. अनेक बोटींवर वेगवेगळ्या रंगाची दर्याची चित्रेही रेखाटण्यात येतात.

रापणीतून भुते कुटुंबाची तिसरी पिढी फायबर बोटीकडे ः
रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथील श्रीदत्त भुते यांची तिसरी पिढी मासेमारी व्यवसायात आहे. पूर्वी भुते कुटुंबीय पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करत होते. या रापणीसाठी लाकडी होड्यांचा वापर केला जायचा. भुते यांनी दहा वर्षांपूर्वी आधुनिक पद्धतीचा अवलंब करत गिलनेटद्वारे मासेमारी करण्याचा निर्णय घेतला. एका मच्छीमाराकडून जुनी फायबर बोट ६० हजार रुपयांना विकत घेतली. बोट चालविण्यासाठी एक एचपीचे इंजिन ६० हजार रुपयांना तर जाळ्यासाठी २५ हजार रुपये खर्च आला. लाकडी होड्यांच्या तुलनेत
आधुनिक फायबर बोट ही वजनाने हलकी आणि हाताळणीस सोपी असते. गिलनेटद्धारे साधारणपणे ८ ते १० वावपर्यंत (साधारण दोन किलोमीटर अंतरात) समुद्रात मासेमारीला जाता येते. मोठ्या यांत्रिकी नौका म्हणजे ट्रॉलर्स्, पर्ससिननेट या २२ किलोमीटरच्या पुढे मासेमारीला जातात, असे श्रीदत्त भुते सांगतात.

मच्छीमारांचा दिनक्रम ः
गिलनेटद्वारे मासेमारीसाठी जाणारे मच्छीमार हे सायंकाळी संधीप्रकाशात समुद्रात जातात. भरतीचे पाणी असले की नौका खाडीमधून समुद्रात नेणे सोपे जाते. बोटीवर साधारण पाच मच्छीमार असतात. श्रीदत्त भुते हे गावातील काही लोकांसोबत मासेमारीला जातात. भुते यांच्यासह अन्य मच्छीमारांकडे मिळून सुमारे वीसहून अधिक फायबर बोटी आहेत. रत्नागिरीतील मिऱ्या येथून भुते यांची बोट मासेमारीसाठी गणपतीपुळे, काळबादेवी, जयगड या परिसरात जाते. मासे मिळण्याचे ठिकाण पाण्यातील स्थितीवरून मच्छीमार सहज ओळखतात. तिथे गेल्यानंतर जाळे फेकून अर्धा ते पाऊणतास पाण्यातच ठेवले जाते. पाण्यातील जाळ्यामध्ये विशिष्ट हालचाली दिसून लागल्या की मासे जाळ्यात अडकल्याचे लक्षात येते. त्यानंतर ते जाळे ओढले जाते (ट्रॉलिंग किंवा पर्ससिननेटद्धारे मासेमारी करणाऱ्या मोठ्या नौकांवर जाळे ओढण्यासाठी अत्याधुनिक मशिनचा वापर केला जातो). जाळ्यात अडकलेले मासे काढून ते बोटीमधील एका टपामध्ये साठविले जातात. फायबरच्या बोटींमध्ये एक टन एवढी मासळी पकडून आणण्याची क्षमता असते.

अशी होते विक्री ः
समुद्रामधून आणलेली मासळी रात्री बर्फात ठेवली जाते. सकाळी लवकर ती मिरकरवाडा जेटी येथील मासळी बाजारामध्ये विक्रीसाठी पाठविली जाते. ग्राहक शोधून देण्यासाठी जेटीवर असलेल्या मध्यस्थांना ५० ते ६० रुपये मेहनताना द्यावा लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे, नाटे, जयगड या ठिकाणीही मासळी बाजारातून मोठी उलाढाल होते. हंगामामध्ये बांगडा, म्हाकुळ, चिंगळं, मांदेली, ढोमा यासारखी मासळी मिळते. गेल्या दोन वर्षांत बांगडा मासा बऱ्यापैकी मिळत आहे. बांगडा मासा प्रति किलो ८० ते ११० रुपयांपर्यंत दराने विकला जातो.

व्यवसायातील अर्थकारण ः
महिन्यातील १५ दिवस मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जातात. एका फेरीला साधारणपणे ५०० रुपयांचे इंधन लागते. खलाशांचा खर्च सुमारे दोन हजार रुपयांवर होतो. जाळी दुरुस्ती, नौकेच्या इंजिनची दुरुस्ती यासाठीही परिस्थितीनुसार खर्च होतो. साडेआठ महिन्यांच्या कालावधीत वादळ-वारे, अवकाळी पाऊस आणि मासे न मिळणे यामुळे एक ते दीड महिन्याचा काळ वाया जातो. उर्वरित काळात मिळालेल्या मासळीतून हंगामात एक लाखापर्यंत उत्पन्न मिळते.

बोटीसाठी शासनाकडून मिळते अनुदान ः
जुन्या बोटी मोडीत काढून नवीन बोट घेताना फायबरच्या बोटीकडे विशेष कल दिसून येतो. छोटी बोट घेण्यासाठी साधारण १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. फायबर बोट बांधताना गरजेनुसार त्यात बदलही करून घेता येतो. बोट बांधून झाली की तिची मत्स्य विभागाकडे नोंदणी करून घेतली जाते. या बोटी बांधण्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळते, असे श्री. भुते यांनी सांगितले.

फायबर बोटींची मागणी वाढण्याची कारणे ः
- फायबर बोटींचे व्यवस्थापन आणि दुरुस्तीवरील खर्च कमी.
- ऑइल लावणे, वाकासाठी खिळ्यावर लांबी लावणे हे फायबर बोटीला करावे लागत नाही.
- बोट स्वच्छ करणे सोपे.
- बोटींची दुरुस्ती होते वेगाने.
- लाकडी बोटींपेक्षा फायबर बोट बांधण्याचा वेळ २५ टक्क्यांनी कमी.
- लाकडी बोटीपेक्षा फायबर बोट मजबूत.

मासेमारी व्यवसाय दृष्टीक्षेपात ः
- मासेमारी करणारी गावे ः ११०
- मच्छिमारांची लोकसंख्या ७१ हजार ६२०
- बंदरे ः ४६
- यांत्रिकी नौका ः २ हजार २६७

प्रतिक्रिया ः

मासेमारी व्यवसाय हा आमच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारी आमची तिसरी पिढी आहे. पूर्वी आमचे आजोबा आणि वडील लाकडी बोटींमधून मासेमारी करायचे. मी मासेमारीसाठी फायबर बोटींचा वापर करण्यास सुरवात केली. या बोटी वजनाने हलक्या असल्याने त्यांची हाताळणी सहज करता येते.
- श्रीदत्त भुते, मच्छीमार
९८२३३२४१४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT