Vermicompost
Vermicompost  Agrowon
टेक्नोवन

Vermicompost : तंत्रशुध्द पद्धतीने युवक करतोय दर्जेदार गांडूळखत निर्मिती

श्‍यामराव गावडे 

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर शहराच्या पूर्वेला तीन किलोमीटरवर साखराळे गावचे शिवार लागते. याच परिसरात सुमारे २८ वर्षे वयाच्या तरुण शेतकरी प्रतीक पवार यांच्या कुटुंबाची शेती आहे. बीएस्सी हॉर्टिकल्चर (Horticulture) असे शिक्षण त्याने घेतले. परदेशात जाऊन ‘एमएस्सी’ चे शिक्षण घ्यायचे अशी कुटुंबाची इच्छा होती. त्या दृष्टीने तयारी सुरू होती परंतु काही तांत्रिक कारणांमुळे निर्णय थांबवावा लागला. मात्र त्याचवेळी बदलत्या शेतीची गरज व मागणी ओळखून इथेच काहीतरी उद्योग सुरू करायचे प्रतीकने ठरवले.

शेतीतील करिअर

घरची सुमारे १४ एकर शेती व त्यातील लागवडीयोग्य ११ एकर शेती आहे. प्रतीकने शेतीची पूर्ण जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. आपल्या विचाराच्या काही तरुणांना एकत्र करून त्यांनी गावात शिवार फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. ‘व्हीएसआय’ संस्थेचे माजी कीटकशास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांचे मार्गदर्शन या तरुणांना मिळाले. त्यातून उत्पादनवाढीचे नवे प्रयोग सुरु केले. शेतकरी परिसंवाद, शेतकऱ्यांच्या प्लॉटला भेटी, निरीक्षणे नोंदवणे असे उपक्रम सुरू केले. उसाचा उत्पादन खर्च कमी करणे यावर भर देण्यात आला. एकात्मिक खत व्यवस्थापन हा त्यातील महत्त्वाचा विषय होता. रासायनिक खते वाया जाऊ नयेत, ती पिकांना पुरेपूर लागू व्हावीत त्यासाठी गांडूळ खतात ती ‘मिक्स’ करून देणे हा पर्याय पुढे आला. त्यातून उत्पादन वाढेल व जमिनीचा पोतही सुधारेल असे नियोजन होते.

गांडूळ खत निर्मिती

काही शेतकऱ्यांच्या मागणीवरून व गरजेनुसार गांडूळखत निर्मिती करायचे असे प्रतीकने ठरवले,. सोबत शिक्षणाची जोड होतीच. प्रतीक यांची पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग लगत कासेगाव येथे एक एकर शेती आहे. त्या ठिकाणी २०१८ पासून प्रकल्प सुरू झाला. एकात्मिक खत व एकूण व्यवस्थापनाद्वारे प्रतीक यांनी घरच्या गांडूळखताचा आपल्या शेतीतही वापर सुरू केला व विक्रीही सुरू केली.

गांडूळ खत निर्मिती तंत्र

-शेतकऱ्यांकडून दर्जेदार शेण खरेदी केले जाते.

-प्लॅस्टिक ताडपत्रीच्या पेपरचा अर्थात टेट्राबेडचा उपयोग केला जातो. त्याचे क्षेत्रफळ १० बाय ४ बाय दोन फूट असे ठेवले आहे.

- सुरवातीला ७५ टक्के बेड शेणाने भरला जातो. २५ टक्के रिकामा ठेवला जातो.

-सलग तीन दिवस बेडवर २० ते २५ लिटर पाणी वापरून त्यातील उष्णता बाहेर काढली जाते.

-एक फुटाला एक किलो म्हणजे बेडची लांबी जितकी आहे त्यानुसार गांडूळ कल्चर त्यात सोडण्यात येते. त्यानंतर बेड गोणपाटाने झाकून घेतला जातो.

-त्यानंतर दर पंधरा दिवसांनी गूळ, बेसन, लाभदायक जिवाणू यांची

स्लरी तयार केली जाते. प्रत्येक बेडवर दहा लिटर या पद्धतीने दर पंधरा दिवसांनी स्लरी सोडली जाते.

-सुमारे साठ दिवसांची एक बॅच अशा वर्षाला सुमारे चार बॅचेस घेण्यात येतात. एकसारखे दर्जेदार गांडूळ खत वर्षाला सुमारे तीनशे टनांच्या आसपास तयार होते.

-गांडूळखत चाळल्यानंतर उर्वरित घटकाचा पुन्हा वाफे पद्धतीने ढीग लावण्यात येतो.

वाफा १० बाय अडीच फूट बाय दीड फुटाचा असतो. टेट्राबेड पद्धतीप्रमाणेच त्यातही पुन्हा

सर्व तंत्राचा वापर केला जातो.

-प्रतीक सांगतात की मुख्य भरणीच्या आधी हे गांडूळखत रासायनिक खतात ‘मिक्स’ करून दिले तरी चालते. मुख्य भरणीवेळी एका सरीत रासायनिक व एका सरीत गांडूळ खत या पद्धतीने देता येते.

अर्थात माती परिक्षणानुसार वापर योग्य राहील.

विक्री व्यवस्था

सांगली, कोल्हापूर व लगतच्या कर्नाटक भागातील द्राक्ष, ऊस, भाजीपाला व अन्य पिकांसाठी शेतकऱ्यांकडून या खताला चांगली मागणी आहे. जागेवर प्रतिटन नऊ हजार रुपये तर १०० किलोमीटर परिसरापर्यंत दहा हजार रुपये टन अशी विक्री होते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी साखरेच्या वापरलेल्या ४० किलोच्या पोत्यामधून विक्री होते. खताव्यतिरिक्त गांडूळ कल्चर ३०० रुपये प्रति किलो तर व्हर्मीवॉश प्रति लिटर ५० रुपये यांचीही विक्री होते.

घरच्या उसाला झाला फायदा

एकात्मिक व्यवस्थापनातून प्रतीक यांना घरच्या उसाचे एकरी ९० ते ९२ टन (आडसाली लागवड) तर खोडव्याचे ६० ते ६५ टन उत्पादन मिळत आहे. फेरपालट म्हणून सोयाबीन तर बेवडासाठी हरभरा पिके घेण्यात येतो. बाजारपेठेचा अंदाज घेऊन मिरची व अन्य नगदी पिके २० गुंठ्यात घेतली जातात.

प्रतीक सांगतात की पूर्वी रासायनिक खतांचा खर्च प्रति एकर ४० ते ४५ हजारांच्या घरात व्हायचा. आता

गांडूळ खताच्या वापरामुळे त्यात ३० ते ४० टक्के बचत झाली आहे. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढली असून खते वाया जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. प्रतीक यांचे मित्र धैर्यशील पाटील देखील

तीन वर्षांपासून या खताचा वापर करीत असून त्याचा फायदा होत असल्याचे ते सांगतात.

शुध्द रोपांचे संवर्धन

बेणे चांगले व शुध्द असेल तर उत्पादन चांगले मिळते. त्या दृष्टीने प्रतीक व सहकाऱ्यांनी यंदा कोइमतूर येथून उसाची उतीसंवर्धित रोपे आणली आहेत. त्यांची शुद्धता जपण्याचा प्रयत्न आहे. त्यातून दर्जेदार बेणे परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

प्रतीक पवार-

८८८८४६५९९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT