Fertigation Agrowon
टेक्नोवन

Fertigation System : अल्पभूधारकांसाठी किफायतशीर फर्टिगेशन प्रणाली

Fertigation Technique : जास्तीत जास्त उत्पादकता मिळविण्याची गुरुकिल्ली म्हणजे अचूक फर्टिगेशन. सध्या बाजारात अनेक फर्टिगेशन उपकरणे उपलब्ध आहेत. मात्र आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वस्त आणि तरिही अधिक कार्यक्षम पद्धती तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Team Agrowon

तेजस लिंगावळे, डॉ. एच. टी. जाधव, दत्तात्रय पवार

Agriculture Technology: जास्तीत जास्त उत्पादकता मिळविण्याची गुरुकिल्ली म्हणजे अचूक फर्टिगेशन. सध्या बाजारात अनेक फर्टिगेशन उपकरणे उपलब्ध आहेत. मात्र आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वस्त आणि तरिही अधिक कार्यक्षम पद्धती तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीसेम, दापोली प्रकल्पाने विकसित केलेल्या तीन-टप्प्यांतील फर्टिगेशन प्रणालीचे अनेक फायदे आहेत.

दापोली येथे पीसेम प्रकल्पामध्ये जीआय पॉलिहाउस (६४४ चौ.मी. क्षेत्रफळ) आणि बांबू पॉलिहाउस (७४० चौ.मी. क्षेत्रफळ) अशी दोन हरितगृहे उभारलेली आहेत. प्रयोगाखातर त्यातील जीआय पॉलिहाउसमध्ये सिमला मिरचीची लागवड करून वेगवेगळ्या सिंचन पद्धतीद्वारे फर्टिगेशन केले गेले. या प्रक्रियेमध्ये उद्‍भवलेल्या समस्यांच्या नोंदी घेतल्या.
प्रथम आमच्या प्रकल्पामध्ये स्वतः विकसित केलेल्या अन्नद्रव्य व्यवस्थापन गणनयंत्राच्या (न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कॅल्क्युलेटर) साह्याने पिकानुसार खताची योग्य मात्र काढून घेतली. त्याचे तीन स्टॉक सोल्यूशन्स तयार केले. उदा. द्रावण A, द्रावण B आणि द्रावण C. द्रावण A मध्ये कॅल्शिअमयुक्त खते, द्रावण B मध्ये फॉस्फेट आणि सल्फेट असलेली खते आणि द्रावण C मध्ये सूक्ष्म पोषक घटक असलेली खते घेतली. कॅल्शिअमयुक्त खते ही अन्य फॉस्फेट्स आणि सल्फेटयुक्त खतांमध्ये मिसळल्यास त्यातून क्षारांची निर्मिती होऊन संपूर्ण प्रणाली ठप्प होऊ शकते. हे टाळण्यासाठी वरील प्रमाणे योग्य ती काळजी घेतली.

फर्टिगेशन करण्यासाठी आधीपासून अस्तित्वात असलेल्या फर्टिगेशन उपकरणांच्या सर्व त्रुटींचा अनुभव घेतला. त्यानंतर अर्ध्या एचपीच्या छोट्या पंपाद्वारे खतांचा सिंचन प्रणालीमध्ये इंजेक्शन करण्याची तुलनेने कमी खर्चिक पद्धतही वापरून पाहण्यात आली. या पद्धतीमध्ये प्रथम तीन स्टॉक सोल्यूशनपैकी एक खताचे द्रावण एका प्लॅस्टिकच्या बादलीत घेतले. छोट्या (गट्टू) पंपाच्या साह्याने सिंचन पाइपलाइनमध्ये इंजेक्ट करून ठिबकद्वारे पिकांना दिले. (चित्र ५)

या पद्धतीमध्येही पुढील खालील समस्या आढळल्या.
१) सिंचनाच्या पाण्यात खते समान प्रमाणात मिसळली गेली नाहीत. चित्र ६ मध्ये दर्शविल्याप्रमाणे पहिल्या रांगेच्या पहिल्या रोपावर आढळलेली विद्युत वाहकता (EC) ही शेवटच्या रांगेतील शेवटच्या रोपाच्या बरोबरीची नव्हती. परिणामी, पिकांची असमान वाढ झाली.
२) या प्रयोगामध्ये वापरलेल्या १.५ अश्‍वशक्ती चा मोनोब्लॉक पंपमुळे सिंचनाच्या पाण्याचा दाब हा अर्ध्या अश्‍वशक्तीच्या (गट्टू) पंपापेक्षा पुरेसा जास्त राहत होता. त्यामुळे सिंचनाच्या पाण्यासोबत खतांच्या तीव्र द्रावणाचे इंजेक्शन करतानाही समस्या उद्‍भवल्या. मुख्यतः खतांच्या इंजेक्शनच्या वेळी सिंचन पंपाचा दाब कमी करावा लागत होता अथवा सिंचन पंप बंद करावा लागत होता. नंतर खतांचे इंजेक्शन पूर्ण झाल्यानंतर तो चालू करावा लागत होता. हे कामही माणसांच्या साह्याने करावे लागेत. ते वेळखाऊ आणि गुंतागुंतीचे तर होतेच, पण खतांचे एकसमान वितरणही शक्य झाले नाही.

ब. अचूक फर्टिगेशनसाठी कमी खर्चिक पर्याय :
सध्याच्या फर्टिगेशन प्रणालीच्या सर्व मर्यादा आणि त्रुटी लक्षात घेऊन त्या कमी करण्यासाठी दापोली येथील प्रकल्पामध्ये संशोधन सुरू केले. त्यातून तीन टप्प्यांतील वापरकर्ता-अनुकूल आणि किफायतशीर सिंचनसाठी फर्टिगेशन प्रणाली विकसित केली. तेव्हा सिंचनाच्या पाण्याबरोबरच थेट आणि एकसमान मिश्रित खते हवे तेव्हा वारंवार देण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले.
प्रकल्पाच्या ६४४ चौ.मी. क्षेत्रफळाच्या जीआय पॉलीहाऊस आणि ७४० चौ.मी. क्षेत्रफळाच्या बांबू पॉलिहाउससाठी विकसित केलेल्या या फर्टिगेशन प्रणालीमध्ये प्रामुख्याने १५०० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, प्रेशर गेज, स्क्रीन फिल्टर, सिंचन पंप, तीन लहान स्टॉक सोल्यूशन्स टाक्या आणि इतर फिटिंग उपकरणे (चित्र ७ आणि चित्र ८), द्रावणाची साठवण करण्यासाठी टाक्या इ. चा समावेश आहे.

फर्टिगेशन प्रणालीचे तीन टप्पे पुढीलप्रमाणे...
अ) खास विकसित ‘न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कॅल्क्युलेटर’ वापरून खताची मात्रा ठरवणे,
ब) तीन स्टॉक सोल्यूशन A, B, C तयार करणे आणि
क) पिकाच्या दैनंदिन गरजेनुसार पुरवठा टाकीतील पाण्यात खत साठा द्रावण (खतांचे स्टॉक सोल्यूशन) मिसळणे.

फर्टिगेशन करण्याची प्रक्रिया :
१) प्रकल्पात विकसित केलेल्या ‘न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कॅल्क्युलेटर’चा वापर करून पिकाची खताची गरज काढणे.
२) तीन वेगवेगळ्या लहान आकारांच्या प्लॅस्टिक टाक्‍यांमध्ये पिकाच्या आवश्यकतेनुसार स्टॉक सोल्यूशन तयार करणे करा.
३) पिकाची अवस्था आणि हंगाम लक्षात घेता मोठ्या आकाराच्या पुरवठा टाकीत कमीत कमी एक दिवस सिंचन करता येईल इतकी पुरेसे पाणी भरून ठेवणे.
४) पुरवठा टाकीमध्ये पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन स्टॉक सोल्यूशन्स सोडणे. ते ढवळणीच्या मदतीने चांगले मिसळून घेणे.
५) सिंचन पंप सुरू करणे. (प्रस्तुत पंप हा १.५ अश्वशक्ती असलेला मोनोब्लॉक प्रकारचा वापरला आहे.)
६) सिंचन पंप पुरवठा टाकीमधून आणि सिंचन पाइपलाइनद्वारे पिकांना खताचे द्रावण पुरवणे.
७) या प्रणालीमुळे खते प्रत्येक ओळीतील प्रत्येक रोपाला समान प्रमाणात वितरित केली जातील.

तीन टप्प्यांतील फर्टिगेशन प्रणालीचे फायदे :
१) फर्टिगेशनपूर्वी पाण्यात विरघळणाऱ्या खतांचे एकसमान मिश्रण करणे शक्य आहे.
२) सर्व झाडांना खतांची मात्रा एकसमान मिळते. परिणामी, संपूर्ण शेतातील पिकाची एकसमान वाढ दिसून आली.
३) वेगळी खते देण्याची गरज नाही.
४) इतर प्रणालींमध्ये प्रेशर डिफरेंशियल, निगेटिव्ह सक्शन, डोझिंग, इंजेक्शन इ. या गोष्टी ठरविताना येणाऱ्या त्रुटी या प्रणालीमध्ये येत नाहीत. त्यामुळे संपूर्ण शेतात खतांचे समान वितरण होते.
५) या प्रणालीमध्ये पुरवठा टाकी सोडून अन्य कोणत्याही महागड्या वस्तूचा वापर केलेला नसल्यामुळे प्रणाली बऱ्यापैकी किफायतशीर ठरते.
६) ही प्रणाली चालविण्यासाठी विशेष कौशल्याची आवश्यकता नाही. अल्पशिक्षित व कमी कुशल व्यक्तीदेखील ती चालवू शकते.
७) सामग्रीची उपलब्धता, देखभाल आणि कार्यक्षमता ही उत्तम आहे.
८) सिंचनाच्या पाण्याची आणि खतांची बचत होते.

फर्टिगेशन करताना पाळावयाची सामान्य मार्गदर्शक तत्त्वे :
१) स्टॉक सोल्यूशन्स तीन वेगवेगळ्या टाक्यांमध्ये तयार करावीत. विशेषतः कॅल्शिअम आणि फॉस्फेट्स किंवा सल्फेट एकत्र मिसळू देऊ नयेत.
२) फर्टिगेशन दररोज नियमितपणे द्यावे. गरजेनुसार एक किंवा दोन दिवसांचे अंतर ठेवता ये. मात्र त्या काळात साधे पाणी नक्की द्यावे.
३) फर्टिगेशन करण्यापूर्वी खतांचे एकसमान मिश्रण करून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
४) फर्टिगेशन प्रणालीचा दाब फार जास्त किंवा कमी नसावा. तो योग्य म्हणजेच सर्वांत दूरच्या ड्रीपरवर १ किग्रॅ/चौ. सेंमी असावा.
५) पाण्याच्या टाकीचे आउटलेट पंप सक्शन इनलेटच्या किमान १” (इंच) वर असावे.
६) पिकाच्या मुळांशी जमा होणारे क्षार टाळण्यासाठी स्टॉक सोलुशन A आणि स्टॉक सोल्यूशन B हे एक दिवसाआड द्या. त्यापैकी कोणत्याही एकासोबत सूक्ष्म अन्नघटक म्हणजेच स्टॉक सोलुशन C सुद्धा द्यावे.
७) खते वितरणातील एकसमानता, अचूकता आणि खतांचा पुरेपूर वापर मिळविण्यासाठी, पिकांच्या पिशवीतून पाझरून बाहेर पडलेले निचराद्रवाची (लिचेट) विद्युत वाहकता (EC) आणि सामू (pH) दररोज तपासावा.
८) पाइपलाइनमध्ये अडलेली खतांची मात्रा काढून टाकण्यासाठी सिंचन पाइपलाइन ठरावीक दिवसांनी फ्लश करावी.
९) सिंचन पाण्याचा सामू ७ च्या जवळपास व विद्युत वाहकता <१ मिलिसायमेन/सेंटिमीटर इतकी ठेवा. ती नियमितपणे तपासावी. कारण, साठा केलेल्या पाण्यात शेवाळाची वाढ झाल्यानेही सामू (pH) आणि विद्युत वाहकता (EC) बदलू शकते.

तेजस लिंगावळे, ९१७५९३३९७८
दत्तात्रय पवार, ९९८६४७६६६९

(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - कृषी संरचना व पर्यावरण व्यवस्थापनासाठी प्लॅस्टिक अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT