Paddy
Paddy  Agrowon
टेक्नोवन

भाताची पेरणी पद्धतीने लागवड

टीम ॲग्रोवन

ज्ञानेश्वर ताथोड, योगेश महाले, संदीप कऱ्हाळे

पूर्व विदर्भात भातासाठी (Paddy Cultivation) आवत्या या पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यातही पारंपारिक आवत्या (भात बियाणे फेकून) व पेरीव आवत्या (Paddy Sowing) (पेरणी पद्धत) असे दोन प्रकार आहेत. पारंपारिक आवत्या पद्धतीत पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीची मशागत करून जमीन वापसा स्थितीत आल्यावर प्रति एकरी ३० ते३५ किलो बियाणे विखरून फेकले जाते. त्यानंतर वखरणीने बियाणे झाकले जाते. साधारणतः एका महिन्यानंतर उगवलेल्या भात रोपांमध्ये हलकी नांगरण करतात. त्यामुळे फुटवे फुटून, तण नियंत्रणासाठी मदत होते. वैनगंगेच्या खोऱ्यात प्रचलित या पद्धतीला स्थानिक भाषेत ‘बासी’ म्हणतात. मात्र, कमी उगवण क्षमता, रोपातील असमान अंतर, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापनाचा (Fertilizer Management In Paddy Farming) अभाव यामुळे उत्पादकता कमी राहते.

रोवणी पद्धतीत चिखलणी, भात रोपवाटिका करून, त्यांची पुनर्लागवड (रोवणी) केली जाते. यात सर्व कामे मजुरांवर अवलंबून असल्यामुळे खर्चात वाढ होते. एकूण उत्पादनाच्या २२ ते २८ % खर्च मजुरांसाठी होतो. मजुरांची वेळेवर उपलब्धता न झाल्यास रोवणीला उशीर होऊन पिकावर कीड व रोगाचे प्रमाण वाढते. उत्पादनात २० ते ३०% घट येऊ शकते.

पेरीव भात पद्धतीचे महत्त्व ः

-बदलत्या हवामानानुसार जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन.

-निविष्ठांचा कार्यक्षम वापर (वेळेवर व योग्य मात्रेत खते-बियाणे पेरणी).

-वेळेवर शेती कामाची पूर्तता.

-उत्पादन खर्चात घट.

-शेतीतील कष्ट कमी होतात.

-पेरणीसोबतच खत देण्याचीही व्यवस्था.

-पेरणी यंत्राने भातासह गहू, तीळ, जवस, लाखोरी व हरभरा अशा पिकांचीही पेरणी करता येते.

तिफण किंवा पेरणी यंत्र :

भाताची पेरणी शक्यतो तिफण किंवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने करावी. दोन ओळीतील अंतर २० सें.मी. व दोन रोपातील अंतर हे १० ते १५ सें. मी. ठेवावे. बियाणे २ ते ४ सें.मी. खोल पडेल, असे पाहावे. जातीनुसार जाड भातासाठी ७५ किलो, तर बारीक भात ५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.

ड्रम सीडर: आपत्कालीन पेरणीसाठी भात संशोधन संचालनालय, हैदराबाद यांनी ड्रम सीडर विकसित केले आहे. त्याद्वारे चिखलणी केलेल्या सपाट शेतात मोड आलेले बियाणे पेरता येते. दोन ओळीतील अंतर २० x २० सें.मी.तर दोन रोपातील अंतर ५ ते ७ सें.मी. पर्यंत ठेवता येते.हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे लागते. मजुरीवरील खर्च कमी होतो.

या पद्धतीच्या मर्यादा -

१) जमीन चिखलणीसाठी आवश्यक पावसाची गरज असते.

२) सपाट चिखलणीवर पेरणी करावी लागते.

३) पेरणी करतेवेळी बांधीमध्ये चिखलणीवर पाणी भरलेले असू नये.

४) पेरणीनंतर एक आठवडा २ ते ३ सें.मी. पाणी भात बांधीत असणे गरजेचे असते.

५) भात बांधीतील तण नियंत्रण वेळोवेळी करत राहावे लागते.

६) काही वेळेस मोड आलेले भात पक्षी पळवतात.

भातची पेरणी पद्धत (डीएसआर) :

लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठामध्ये विकसित करण्यात आलेल्या या यंत्राला ११ दाते आहे. दोन ओळीतील अंतर २५ x ३० सें.मी.तर दोन रोपातील अंतर ५ ते ७ सें.मी. पर्यंत ठेवता येते. भात बियाण्याची पेरणी २ ते ४ सें.मी. खोल पडेल या बेताने करावी. यात पेरणीसोबतच खत देण्याचीही व्यवस्था आहे. रोपवाटिका आणि पुनर्लागवड पद्धतीतील अनेक कामे करावी लागत नाहीत. खर्च व वेळेत बचत होते. एका तासात एक ते दीड या प्रमाणे दिवसभरात ८ ते १० एकर पेरणी शक्य होते. बियाण्यांची जवळपास २० ते २५ किलो प्रति हेक्टरी बचत होते. हवा खेळती राहून पिकाची वाढ चांगली होते. तसेच आंतरमशागत व कापणीकरिता विविध अवजारे वापरता येतात.

डीएसआर पद्धतीवेळी घ्यावयाची काळजी ः

-जून महिन्यात पूर्व मशागतीनंतर एकूण ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यावर या पद्धतीने पेरणी करावी.

-पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करून घ्यावी.

-जात व आकारानुसार पेरणीसाठी बियांचे प्रमाण घ्यावे.

-लागवडीचा खर्च कमी राहतो. तसेच भात १० ते १५ दिवस आधी कापणीला येते. रब्बी पिकाची लागवड वेळेत होते. त्यासाठीही ओलाव्याचा फायदा घेता येतो.

-रोवणी पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीमध्ये नफा व लागवड खर्चाचे गुणोत्तर जास्त आढळून येते.

डीएसआर चे फायदे

१. रोपवाटिका तयार करून चिखलणी व पुनर्लागवडीची गरज नाही. बियाणे थेट ट्रॅक्टरद्वारे यंत्राने शेतात पेरले जाते.

२. पेरणीपूर्वीचा पाऊस वगळता पेरणीनंतर २१ दिवसांने किंवा त्यापुढे पाणी देण्याची गरज भासते. त्यामुळे पाण्याची बचत साधते.

३. मजुरांची आवश्यकता कमी होते.

४. चिखलणी करावी लागत नसल्यामुळे रब्बीमध्ये जमीन कडक होत नाही.

५. पेरणी वेळेत होते. खर्चात बचत होते.

भात पेरणी यंत्र (डीएसआर) वैशिष्ट्ये ः या यंत्राला जमिनीवर चालणाऱ्या चाकाद्वारे गती दिली जाते.

१. यामध्ये ९ दाती आणि ११ दाती असे प्रकार उपलब्ध. यामुळे गरजेनुसार पेरणीचे अंतर कमी अधिक करू शकतो. दोन ओळीतील अंतर समान राहते. तसेच हे यंत्र रब्बी पीक पेरणीसाठी शून्य मशागत यंत्र म्हणूनही वापरता येते. कारण याचे फाळ तीक्ष्ण असून, जमीन सहजपणे फोडतात.

२. या बियाणे पेटी व खत पेटी वेगवेगळी आहे. या प्लेटमध्ये एक वेळी दोन किंवा तीन दाणे जमिनीत पेरणे शक्य आहे. दोन बिया मधील अंतर समान राहते. भात, सोयाबीन, हरभरा, मका, तूर, कापूस अशा पिकांसाठी वेगवेगळ्या प्लेट दिल्या आहे.

३. शिफारशीप्रमाणे बियाण्याचे प्रमाण कमी अधिक करण्याकरिता यंत्राच्या डावीकडे लोखंडी पट्टी दिली आहे.

३. खतपेटी ही वेगळी असून, शिफारशीप्रमाणे एका हॅण्डलच्या साह्याने खत प्रमाण कमी जास्त करता येते.

४. बियाणे योग्य खोलीवर पेरण्यासाठी खोली चक्र (Depth Wheel) ही दिले आहे. तेही आपल्या गरजेनुसार कमी अधिक करता येते.

-------------

ज्ञानेश्वर ताथोड, ९६०४८१८२२० (कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली.)

योगेश महाले, ९३२६२७९७९८ (कृषी अभियांत्रिकी - विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, भंडारा.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT