रजत गुप्ता
डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशामध्ये मातीची धूप (Soil Erosion) ही मोठी समस्या आहे. अनेक वेळा अशा प्रदेशाध्ये पावसाचे प्रमाणही अधिक असते. पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत मातचा वरील पोषक असा थर वाहून जातो. त्यामुळे मातीतल पोषक घटकांचे (Soil Nutrients) प्रमाण कमी होते. सुपीकता (Soil Fertility) कमी झाल्यामुळे त्यात पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही. ही समस्या कमी करण्यासाठी तोडगा म्हणून कंटूर फार्मिग (Contour Farming) किंवा समतल शेती पद्धती अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
समतल शेती म्हणजे काय?
या शेतीमध्ये दर काही टप्प्यांवर एकाच उंचीवर बिंदू एकत्र करून समतल जमीन तयार केली जाते. तशा प्रकारे व्यवस्थित बांध घालून मशागत करून शेतीयोग्य जमीन तयार केली जाते. समतल जमिनीमुळे उपलब्ध होणारे पाणी समान पद्धतीने देता येते. त्याच प्रमाणे वाहणाऱ्या पाण्याचा वेग थोडा थोडा कमी होत जात असल्यामुळे मातीची धूपही कमी होते.
भारतात उतार असलेल्या जमिनीवर काही प्रमाणात जमिनी सपाट करून त्यात शेती करण्याची पारंपरिक पद्धती आहे. यालाच पायऱ्याची शेती असेही काही ठिकाणी म्हटले जाते. या शेतीमध्ये योग्य प्रकारे म्हणजेच उताराला आडवे सरी ओरंबा तयार केले जातात. तशाच ओळीमध्ये पिकांची लागवड केली जाते.
त्यामुळे अधिक पावसाच्या स्थितीमध्ये वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो. आणि कमी पावसाच्या स्थितीमध्ये उपलब्ध पाणी अडवून ठेवण्याचे काम केले जाते. त्यामुळे पिकांना पाण्याची उपलब्धता होते. मातीची धूप रोखली गेल्यामुळे पिकाला योग्य पोषण मिळते.
या शेतीमध्ये घेतली जाणारी काही पिके ः
भात, मका, गहू अशी गवतवर्गीय पिके, चाऱ्यासाठी गवते, सोयाबीन, शेंगा इ.
या शेती पद्धतीचे काही प्रकार ः
१) टेरेसिंग (उतारात कड आणि वाहिन्या तयार करण्याची प्रथा).
२) पाणी वळवणे (पृष्ठभागातील पाणी शेतात वळवण्याची प्रक्रिया).
३) स्ट्रिप क्रॉपिंग (मातीची धूप रोखण्यासाठी पर्यायी पट्ट्यांमध्ये विविध पिकांची पेरणी करण्याची प्रक्रिया).
समतल शेती कुठे करता येईल?
मातीची धूप रोखणे, पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी राखत सिंचनामध्ये मदत करणारी पद्धती म्हणून समतल शेती ओळखली जाते. मात्र ती सर्व उतार प्रकार आणि हवामानासाठी योग्य ठरेलच असे नाही. ही पद्धती मध्यम उतार असलेल्या जमिनीवर सिंचन करणाऱ्या पिकांसाठी सर्वोत्तम ठरू शकते. त्यासाठी उतार निर्देशांक किंवा तीव्रता (स्लोप ग्रेडियंट) काढला जातो. त्यासाठी शेताची उताराच्या दिशेने आडवी लांबी भागिले काटकोनातील उंची असे सूत्र वापरले जाते. हा उतार निर्देंशाक २% ते १०% दरम्यान असू शकतो.
जमीन कशी तयार करावी?
समतल शेतीसाठी जमीन किंवा भूपृष्ठ तयार करण्यासाठी सामान्यतः पुढील टप्पे लक्षात घ्यावेत.
· क्षेत्राचे उंचीच्या अनुषंगाने सर्वेक्षण करा. (टायपोग्राफिक सर्व्हे)
· शेताची व्यवस्थित सीमा आखून बांध घालून घ्यावेत. त्यात कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रे व अवजारांच्या हालचालीसाठी जागा तयार करा.
· पायाभूत समान उंचीवर असलेल्या बिंदूना जोडून शेतीचे विविध भाग पाडा किंवा शेतीची कामे करा.
फायदे ः
१) समतल शेतीमुळे मातीची धूप ५० टक्क्यांपर्यंत रोखण्यास मदत होते.
२) पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्यामुळे जमिनीमध्ये पाणी शोषले जाण्यासाठी अधिक काळ मिळतो. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पिकाला सिंचनासाठी फायदा होतो.
३) पारंपरिक सलग उतारावरील शेतीमधील सिंचनाच्या तुलनेमध्ये अधिक चांगले सिंचन शक्य होते. तसेच या कामासाठी कमी मजूर लागतात.
४) पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होते.
कंटूर फार्मिंग किफायतशीर आहे का?
उतारावर समतल (कंटूर) रांगा तयार करण्याचा खर्च पारंपारिक शेतीपेक्षा खूपच कमी आहे. मात्र समतल शेतीसाठी अन्य दोन कामे अधिक करावी लागतात. त्यासाठी काही खर्च होतो.
· उताराशीसंबधित सर्वेक्षण करून उताराचा नेमका अंदाज घ्यावा लागतो. त्यानंतर शेतीतील समतल बिंदू शोधून त्यानुसार शेतीची रचना करून घ्यावी लागते. हे काम एकदाच करावे लागते.
· असे क्षेत्र हे अनेक वेळा चिंचोळ्या पट्ट्याही असू शकतात. त्यामुळे येथे मोठे यंत्रे, अवजारे चालवण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र, पॉवर टिलर आणि छोट्या अवजारांच्या साह्याने कामे करता येतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.