World Water Day
World Water Day Agrowon
टेक्नोवन

World Water Day : लोक सहभागातून नदी प्रदूषणावर मात करणारा गोदावरी नदी संसंद उपक्रम

Team Agrowon

दीपक मोरताळे

गाव शिवारातून वाहणारी नदी (River) ही आपली जीवनदायिनी, परंतु ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे विविध भागातील नदीची जैवविविधता धोक्यात आली आहे. गोदावरी नदीकिनारी नांदेड शहर वसले आहे.

या शहराची लोकसंख्या सुमारे सात लाख आहे. प्रत्येक व्यक्ती साधारण ४० ग्रॅम रासायनिक क्लिनर्स वापरते. यामध्ये प्रामुख्याने टूथ पेस्ट, साबण, हँड वॉश, डिटर्जंट, टॉयलेट क्लिनर्स,वॉशिंग पावडरचा रोज वापर होतो.

साधारणपणे दर वर्षाला नांदेड शहरातून १०,००० टनांपेक्षा अधिक रसायने गोदावरी नदीमध्ये सोडली जातात. यात आपण व्यावसायिक उद्योगांकडून होणारे प्रदूषण विचारात घेतलेले नाही.

दररोज विविध रसायने नदी पात्रात जात असल्यामुळे जलचर जिवंत राहू शकत नाहीत. त्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे.

पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन ः

१) जलचरांना जिवंत राहण्यासाठी पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन लागतो.पावसातील पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे साधारण १० ते ११ पीपीएम असते.

नदीच्या पाण्यातील सर्वोत्तम गुणवत्ता असलेल्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण साधारण ८ ते १० पीपीएम असते.या पाण्यात जलचर उत्तम प्रकारे जगू शकतात.

२) जेव्हा आपण रसायन आणि सेंद्रिय घटक पाण्यात मिसळतो त्याची नैसर्गिकरित्या विघटन प्रक्रिया सुरू होते. या विघटन प्रक्रियेत पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. जेव्हा विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण चार पीपीएम पेक्षा कमी होते, तेव्हा जलचर पाण्यातील ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडतात.

मृत्युमुखी पडलेल्या जलचरांच्या विघटन प्रक्रियेत ही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो. या विघटन प्रक्रियेत पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शून्य होते. पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते.यात मोठ्या प्रमाणात जिवाणू, विषाणू वाढून रोगराई पसरत असते.

नांदेडमधील जलप्रदूषण आणि त्यावरील उपाययोजना ः

१) नांदेड शहरातून १०,००० टन रसायने जेव्हा नदीत जातात, तेव्हा ती १,००० अब्ज लिटर पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन शोषून घेतात. पाणी पूर्णतः खराब होते.

पाण्याचा वापर प्रति व्यक्ती प्रति दिवस १०० लिटर जरी गृहीत धरला तरी वर्षभरात २५ अब्ज लिटर पाणी वापरतो, हे वापरलेले पाणी रसायनाने प्रदूषित होऊन नदीतील अत्यंत शुद्ध असलेले १००० अब्ज लिटर पाणी पूर्णतः खराब होते.

रसायनांमुळे होणारे प्रदूषण यासोबत काही लोक नदीमध्ये प्लॅस्टिक,निर्माल्य, जुने कपडे टाकतात. त्यामुळे प्रदूषण वाढते. हे थांबविण्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आज बाजारात सेंद्रिय क्लिनर्स उपलब्ध आहेत त्याचा वापर केल्यास आपण नदीतील प्रदूषण कमी करू शकतो.

२) पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन ४ पीपीएमपेक्षा कमी होतो, तेव्हा जलचर मृत्युमुखी पडतात, याचे उदाहरण १३ जून २०२० रोजी नांदेडकरांनी पाहिले आहे. गोदावरी नदीतील १०० टक्के जलचर मृत्युमुखी पडले होते.

त्यावेळेस नांदेडमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्यावर उपाय योजना राबविण्यासाठी चर्चा सुरू झाली. यशवंत महाविद्यालयाच्या पर्यावरण सूक्ष्मजीव शास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. सुनंदा मोरे- मोरताळे यांनी इट्रोफिकेशन,अलगल ब्लूम विषयी माहिती दिली.

तसेच उपयुक्त सूक्ष्मजीव वापरून नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी बायो सोल्यूशन तयार केले. जून २०२० मध्ये शहरातील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन ‘गोदावरी नदी संसद ग्रुप' तयार केला. यामध्ये एक हजार पर्यावरण प्रेमी या मोहिमेमध्ये जोडले गेले.

लोकसहभागाच्या माध्यमातून बायोसोल्यूशन नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करण्यात आले. यातून काही प्रमाणात नदीच्या पाण्यातील प्रदूषण कमी करण्यात यश मिळाले. पर्यावरण प्रेमी या बायोसोल्यूशनचा वापर टॉयलेट क्लीनर, फ्लोअर/टाइल्स क्लीनर, बागेत जैविक खत म्हणून करीत आहेत.

३) १५ ऑगस्ट २०२० पासून गोदावरी नदी जैविक शुद्धीकरण मोहीम सातत्यपूर्णपणे नांदेड शहरात सुरू आहे. गेले ३१ महिने सातत्यपूर्ण मोहीम सुरू असून, भारतातील नदी पर्यावरण प्रेमी अशा प्रकारे अभियान राबविण्यात पुढाकार घेत आहेत.

बायोरेमेडिअशनमुळे प्रदूषित पाण्यातील विघटन प्रक्रिया जलद गतीने होते. तसेच सूक्ष्मजीव पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढवत आहेत.बायोरेमेडिअशनमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण ५ ते ७ पीपीएम पर्यंत ठेवण्यास मदत झाली आहे.

पाण्याचा सामू उदासीन झाला. तसेच पाण्यातील दुर्गंधी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.पाण्यातील प्रदूषण कमी झाल्यामुळे जलपर्णीचे निर्मूलन होत आहे असे आढळून आले आहे. जमिनीत वापरल्याने सेंद्रिय कर्ब देखील वाढला आहे.

४) पर्यावरणप्रेमी सतत पाण्यातील ऑक्सिजन तसेच हवेतील प्रदूषणाच्या नोंदी घेत आहेत. नांदेडमधील गोदावरी नदीच्या जैविक शुद्धीकरण चळवळीची दखल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने घेऊन दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संपर्क: दीपक मोरताळे,९४२२१७४६४७, (लेखक पर्यावरण क्षेत्रातील अभियंता असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT