नीलेशभाईंनी तयार केला ट्रॅक्टरचलित थ्रेशर
नीलेशभाईंनी तयार केला ट्रॅक्टरचलित थ्रेशर 
टेक्नोवन

नीलेशभाईंनी तयार केला ट्रॅक्टरचलित थ्रेशर

अनामिका डे, अलजुबैर सय्यद

पारंपरिक पद्धतीमध्ये भुईमुगाची काढणी आणि शेंगा तोडणीसाठीचा वेळ आणि मनुष्यबळ जास्त प्रमाणात लागते. सध्याच्या काळात मजूर टंचाईमुळे भुईमुगाच्या शेंगांची काढणी आणि तोडणी खर्चिक होत चालली आहे. भुईमूग उत्पादकांची ही अडचण लक्षात घेऊन गुजरातमधील बोरिया (ता. जमकंडोराना, जि. राजकोट) येथील नीलेशभाई डोबरिया यांनी ट्रॅक्टरवर चालणारा स्वयंचलित थ्रेशर तयार केला.

या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचण्यास मदत होणार आहे. बोरिया गावातील नीलेशभाई डोबरिया यांचा शेतीच्या बरोबरीने प्लॅस्टिक दोऱ्या बनविण्याचा लघू व्यवसाय होता. परंतु दोरी निर्मिती व्यवसायातील मंदीमुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय बंद करून स्वतःच्या शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरवात केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी दोन वर्षे भुईमूग लागवड केली. परंतु या पीक व्यवस्थापनाच्या बरोबरीने काढणी आणि वेलीपासून शेंगा वेगळ्या करण्यासाठी इतर पिकांपेक्षा जास्त प्रमाणात मजूर लागतात हे त्यांच्या लक्षात आले. भुईमुगाची काढणी करून शेतात शेंगांसह ढीग लावले जातात. पाल्यासह वाळलेल्या शेंगा एका ठिकाणी गोळा करून पारंपरिक थ्रेशरच्या साहाय्याने किंवा मजुरांकरवी शेंगा वेगळ्या केल्या जातात. या शेंगाच्या बरोबरीने माती, पालापाचोळा राहू नये यासाठी शेंगांची मजुरांच्या साहाय्याने पुन्हा एकदा उफणणी करावी लागते. गाव परिसरात अलीकडे मजुरांची टंचाई असल्याने जास्त मजुरी देऊन शेंगांची काढणी, वाळवणी त्यांना करावी लागली. तसेच वेळही जास्त लागला. उत्पादनाच्या मानाने फारच कमी आर्थिक नफा त्यांना भुईमूग लागवडीतून मिळाला. या समस्येवर यंत्राच्या माध्यमातून काही उपाय शोधता येईल का? याबाबत त्यांचे विचारचक्र सुरू झाले. दोन वर्षे विविध प्रयोग करीत स्वकल्पनेतून नीलेशभाईंनी ट्रॅक्टरवर चालणारा स्वयंचलित थ्रेशर तयार केला.

या यंत्राच्या वापरामुळे ७० टक्के श्रम कमी झाले, आर्थिक बचतही होते असा त्यांचा अनुभव आहे. स्वयंचलीत थ्रेशरनिर्मितीसाठी नीलेशभाई डोबरिया यांना नऊ लाखांचा खर्च आला आहे. ग्यान संस्थेने या यंत्र निर्मितीसाठी त्यांना आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य केले आहे. या यंत्रामध्ये शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार सुधारणा करून खर्च कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.   तयार केले ट्रॅक्टरवर चालणारे स्वयंचलित थ्रेशर ः

  • स्वयंचलित थ्रेशरचा वापर करण्यापूर्वी मजुरांच्या साहाय्याने भुईमूग झाडाची काढणी करून यंत्र चालण्याचे अंतर लक्षात घेऊन शेतामध्येच एका सरळ रेषेत मांडून ठेवावे लागते. त्यानंतर ट्रॅक्टरवर चालणारे स्वयंचलित थ्रेशर यंत्राच्या कन्व्हेअरला जोडलेल्या रोटरच्या साहाय्याने शेंगांसह झाड थ्रेशरमध्ये जात राहाते.
  • थ्रेशरमध्ये झाडापासून शेंगा वेगळ्या होऊन एका टाकीत जमा होतात. यंत्राच्या मागच्या बाजूला लावलेल्या टाकीत पाला जमा होतो.
  • एक एकर शेतातील भुईमुगाच्या झाडापासून शेंगा वेगळ्या केल्यानंतर शेताच्या बाजूला एका ढिकाणी पाल्याने भरलेली टाकी मोकळी केली जाते.
  • शेंगा भरलेली टाकी मोकळी करताना ब्लोअरमधून जोराने हवा सोडली जाते. त्यामुळे शेंगासोबत राहिलेला काडीकचरा वेगळा होतो.
  • भुईमूग झाडे शेतीतून उचलण्यापासून ते शेंगा तोडणीपर्यंतची सर्व कामे एका यंत्राने होतात. हे यंत्र चालविण्यासाठी एकाच व्यक्तीची गरज असते. या यंत्रामुळे श्रम आणि मजुरीमध्ये ७० टक्के बचत होते.
  • स्वयंचलित यंत्राने भुईमुगाच्या बरोबरीने हरभरा, मूग, तुरीची कापणी आणि मळणी करणे शक्य आहे. गोळा झालेला भुईमुगाच्या पाल्याची गुणवत्ता चांगली असल्याने हा पाला जनावरांना खाद्य म्हणून वापरता येतो.
  • हे थ्रेशर १५ एचपी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरला जोडता येते.
  • थ्रेशरला असलेल्या इंजिनला प्रतितास दोन लिटर डिझेल लागते.
  • एका तासामध्ये सरासरी एक एकर क्षेत्रावरील शेंगासह झाड उचलून थ्रेशरमध्ये शेंगा आणि पाला वेगळा केला जातो.
  • थ्रेशरला असलेल्या टाकीमध्ये ६०० किलो शेंगा आणि दुसऱ्या टाकीमध्ये ८०० किलो भुईमूग पाला मावतो.
  • संपर्क ः ०७९- २६७६९६८६ (ग्यान संस्था, अहमदाबाद, गुजरात)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT