हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चारा 
टेक्नोवन

हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चारा

हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ पाण्यावरील शेती. या पद्धतीत झाडांच्या वाढीसाठी पाणी, सूर्यप्रकाश आणि आवश्यक ती पोषणतत्त्वे संतुलित प्रमाणात कृत्रिमरीत्या दिली जातात. हे तंत्र भविष्यामध्ये हिरव्या चाऱ्याच्या व ताजा भाजीपाला उपलब्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

सौ. मोनाली लवराळे, आर. ए. शेळके

हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ पाण्यावरील शेती. या पद्धतीत झाडांच्या वाढीसाठी पाणी, सूर्यप्रकाश आणि आवश्यक ती पोषणतत्त्वे संतुलित प्रमाणात कृत्रिमरीत्या दिली जातात. हे तंत्र भविष्यामध्ये हिरव्या चाऱ्याच्या व ताजा भाजीपाला उपलब्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. वाढत्या शहरीकरण व औद्योगिकरणामुळे सुपीक व लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे. पारंपरिक पद्धतीच्या शेतीला अनेक मर्यादा येत जाणार आहेत. अशा वेळी कमीत कमी जागेमध्ये पिकांची वाढ करण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धती उपयुक्त ठरू शकते. या पद्धतीमध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारे अत्यावश्यक घटक हे कृत्रिमरीत्या दिले जातात. परिणामी पिकांची वाढ चांगल्या रीतीने होते. या वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करता येत असल्याने कमी पाण्यामध्ये उत्पादन घेता येते. या पद्धतीत कीटकनाशकांचा वापर हा अत्यंत अल्प असतो. यामध्ये माती वापरली जात नसल्याने मातीतून येणाऱ्या रोगाचे प्रमाण अत्यल्प असतात. या पद्धतींमध्ये प्रत्येक हंगामाप्रमाणे योग्य ते वातावरण तयार करता येत असल्यामुळे वर्षभर उत्पादन घेता येते. - शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या कमी जागेत, गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या फुले, भाज्यांचे उत्पादन घेऊ शकतो. उदा. फुले, टोमॅटो, मिरची, कोबी, पालक, मेथी, लेट्युस, स्ट्रॉबेरी व विदेशी भाज्या इ. -दूध उत्पादनासाठी जनावरांना लागणारा हिरवा चाराही कमी पाण्यात व कमी जागेत घेऊ शकतो. अलीकडे शेतकऱ्यांकडील क्षेत्र कमी होत चालले असून, अशा वेळी जनावरांसाठी हिरवा चारा लागवड करणे अत्यंत जिकिरीचे होत आहे. विशेषतः उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा तुटवडा असतो. हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा निर्मिती ः हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांचे अंकुरण करून हिरवा चारा निर्माण करणे होय. यासाठी योग्य आर्द्रता व तापमान नियंत्रित करण्यासाठी छोटी बंदिस्त जागा किंवा हरितगृह, चारा पिकाचे बियाणे, प्लॅस्टिक ट्रे (साधारण ३ x २ फूट), पाणी देण्याची यंत्रणा (मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर प्रणाली), पाणी स्वयंचलित देण्यासाठी सेन्सर आणि टायमर) इ. बाबींची आवश्यकता असते. -या पद्धतीत फक्त ७ ते ८ दिवसात २० ते २५ सेंमी उंचीचा चारा तयार होतो. साधारण ५० चौ. फूट जागेत एक वर्षात ३६ हजार ५०० किलो चारा तयार करता येतो. यासाठी प्रति वर्ष ३६ हजार ५०० लिटर पाणी लागते. जनावरांच्या गोठ्याजवळ युनिट केल्यास खर्च कमी होऊ शकतो.

  • या तंत्रज्ञानामध्ये मशागतीची आवश्यकता भासत नाही. कमीत कमी मजूर लागतात.
  • ट्रेची रचना एकावर एक अशा पद्धतीने केल्याने कमी जागेत अधिक चारा मिळवता येतो.
  • हिरव्या चाऱ्यासाठी लागणारी शेतीतील जागा अन्य पिकांसाठी वापरता येऊ शकते.
  • हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीची यंत्रणा : सध्या हायड्रोपोनिक्स चारायंत्र काही कंपन्यांकडून उपलब्ध केले असले तरी सामान्य शेतकऱ्यांसाठी परवडणारे असेलच असे नाही. ग्रामीण भागामध्ये उपलब्ध साधनाद्वारे उदा. बांबू, तट्ट्या, प्लॅस्टिक ट्रे, शेडनेट (५० टक्के) यांचा वापर केल्यास सुमारे ७२ चौ. फूट आकाराचे (२५ x १० x १० फूट) हायड्रोपोनिक्स यंत्रणा अवघ्या १५ हजार रुपयांमध्ये उभी करता येते. यातून दररोज १०० ते १२५ किलो पौष्टिक हिरवा चारा तयार होऊ शकतो. असा तयार करा हिरवा चारा : १. ज्या धान्याचा हिरवा चारा तयार करायचा आहे, त्याचे बियाणे वापरावा. उदा. मका, गहू, बाजरी, बार्ली इ. या बियाण्याला शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया करून घ्यावी. हे बियाणे १२ तास भिजवून घ्यावे. नंतर ते २४ तास तरटाच्या पोत्यात किंवा गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे. २. हे बियाणे प्लॅस्टिक ट्रेमध्ये ( ३ फूट लांब x २ फूट रुंद x ३ इंच उंची) पसरून ठेवावे. प्रती दुभत्या जनावरामागे १० ट्रे या प्रमाणे ट्रे ची संख्या ठरवावी. ३. बियाणे पसरलेले प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्रणेमध्ये पुढील ७ ते ८ दिवस ठेवावेत. १ एचपी विद्युत मोटारीला लॅटरलचे कनेक्शन देऊन फॉगर प्रणाली बसवून घ्यावी. त्यात प्रत्येक दोन तासाला ५ मिनिटे या प्रमाणे दिवसातून ६ ते ७ वेळा पाणी दिले जाते. बाह्य तापमान आणि वातावरण यातून या वेळेमध्ये योग्य ते बदल करावेत. याला सेन्सर व टायमर बसवल्यास ही यंत्रणा आपोआप काही वेळा चालू बंद होत राहते. सामान्यपणे २०० लिटर पाणी दिवसभर वापरले जाते. ४. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न करताही पाणी देता येते. केवळ पाण्यावरच या चाऱ्याची ७ ते ८ दिवसात २० ते २५ सें. मी. पर्यंत वाढ होते. हा हिरवा चारा व योग्य प्रमाणात कोरडा चारा यांचा दुभत्या जनावरांसाठी वापर केल्यास दूध उत्पादनामध्ये वाढ होते. भाजीपाला उत्पादनासाठीही हे तंत्र महत्त्वाचे... हेच तंत्र हिरव्या भाज्यांची उत्पादनासाठीही वापरता येते. परदेशामध्ये बंदिस्त व संपूर्ण स्वयंचलित हायड्रोपोनिक्स पद्धतीचा वापर होत आहे. त्यामध्ये पिकांसाठी अत्यावश्यक बहुतांश सर्व घटक उदा. प्रकाश, तापमान, अन्नद्रव्ये आणि पाणी कृत्रिमरीत्या पुरवले जातात. लहान आकाराचे हायड्रोपोनिक्स यंत्रणा उभारण्यासाठी पीव्हीसी पाइपचा वापर करता येईल. पीव्हीसी पाइप घेऊन त्यावर दोन ते तीन इंचाचे मोठे छिद्र समान अंतरावर तयार करते. ते पाइपद्वारे एकमेकांना जोडावे. पाण्याच्या स्रोताला हे सर्व पाइप अशा प्रकारे जोडत सांगाडा तयार करावा. दोन ते तीन इंचाच्या छिद्रांमध्ये छोटे बास्केट ठेवावे, व त्यात कोकोपीट भरून घेऊन रोपांची लागवड करावी किंवा बिया लावाव्यात. या पाइपमध्ये अन्नद्रव्ययुक्त पाणी वाहते राहील, अशी व्यवस्था करावी. त्यातून आवश्यकतेनुसार झाडांची मुळे पोषणतत्त्वे शोषून घेतात. त्यांची उत्तम वाढ होते. वातावरणानुसार योग्य तापमान, प्रकाश यांची व्यवस्था कृत्रिमरीत्या करावी. एकापेक्षा अधिक थरामध्ये उभ्या पद्धतीने ही शेती केली जात असल्याने याला ‘व्हर्टीकल फार्मिंग’ असेही म्हणतात. भविष्यामध्ये वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी हे शेती तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. सौ. मोनाली लवराळे, ८८८८८९१३७० (साहाय्यक प्राध्यापक एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली,औरंगाबाद.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

    Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

    Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

    Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

    SCROLL FOR NEXT