Crop Management in Greenhouse and Shednet
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशा काळात हरितगृह, शेडनेटमधील पिकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.
सध्या तापमान वाढीच्या परिस्थितीमध्ये हरितगृहाचे कर्टन दिवसभर उघडे ठेवावेत. शेडनेट सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पसरून ठेवावे,त्यानंतर उघडावे.वाढत्या तापमानाच्या काळात सकाळी आणि सायंकाळी वाफसा स्थिती राहील या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.गादीवाफ्याच्या कडा सकाळी ओल्या करून घ्याव्यात. शक्य असेल तर दोन्ही गादीवाफ्याच्यामधील भागामध्ये पाणी भरून ठेवावे.हरितगृह, शेडनेटचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि रात्री २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे. तसेच आद्रता ६० टक्के ठेवण्याचा प्रयत्न करावा.वाढत्या तापमानाच्या परिस्थितीमध्ये पिकांची अन्नद्रव्यांची गरज कमी आणि पाण्याची गरज जास्त प्रमाणात असते. यासाठी खतमात्रा निम्मी करून जिवाणू स्लरीचा वापर वाढवावा. म्हणजे स्थिर झालेली अन्नद्रव्ये पिकाला मिळतील.नवीन भाजीपाला लागवडीसाठी जमीन तापू द्यावी. मातीमध्ये कुजलेले शेणखत मिसळावे. यामध्ये तागाची लागवड करून फुलोऱ्यात असताना गाडावा.जुने प्लॉट संपले असतील तर या ठिकाणी नेट उघडी ठेवून नांगरट करून माती तापवून घ्यावी. म्हणजे नैसर्गिकरित्या मातीचे निर्जंतुकीकरण होते.लागवड असलेल्या पिकाच्या क्षेत्राच्या मातीमध्ये क्षार वाढले असतील तर बेड रेकिंग /कुदळणी करून जिवाणू खतांचा वापर वाढवावा.नवीन पीक लागवडी अगोदर पाणी आणि मातीचे परीक्षण करून घ्यावे.त्यानंतर शिफारशीनुसार खत मात्रा देण्याचे नियोजन करावे.भाजीपाला पिकामध्ये विशेषतः रंगीत ढोबळी मिरचीची लहान फळे वेडीवाकडी आलेली असतील किंवा कीड, रोगाच्या प्रादुर्भावामुळे खराब झाली असतील तर काढून घ्यावीत.रंगीत ढोबळी मिरची हिरवी असताना तोडून मागणीनुसार विक्री करावी.झाडावर फळांचा जास्त भार ठेवू नये, टप्याटप्याने काढणी करावी.सध्या फूल बाजार बंद आहे. त्यामुळे फूल कळी काढून मागणी नुसार पुढील काळामध्ये कळी ठेवून विक्री नियोजन करावे.पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा. शक्यतो जैविक खते आणि कीडनाशकांचा वापर करावा.बाजार भाव आणि शेतमाल पुरवठ्यासाठी ई-नाम संकेत स्थळाचा वापर करावा.बाजारपेठेतील परिस्थितीचा अंदाज घेऊन परदेशी भाजीपाला लागवडीचे नियोजन करावे.हरितगृह,शेडनेटचे वादळी वारे, अवकाळी पावसापासून नुकसान होते, हे लक्षात घेऊन विमा उतरवून घ्यावा.सध्याच्या लॉकडाउन कालावधीमध्ये बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्रातर्फे भाजीपाला पिकांची संरक्षित शेती या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येते. अधिक माहितीसाठी ०२११२-२५५५२७ किंवा ७०२०४६४६३२ या क्रमांकावर नोंदणी करावी. संपर्क - यशवंत जगदाळे,९६२३३८४२८७ (उद्यानविद्या विशेष तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे) - ०२११२-२५५५२७ (प्रमुख,भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र,बारामती,जि.पुणे)