डॉ. सुजीत यमगर
Agriculture Innovation: स्मार्ट सेंसर यंत्र शेतातील तण ओळखून केवळ गरजेपुरती फवारणी करते, यामुळे खर्च कमी होतो, उत्पादनवाढ होते, पर्यावरणाचे रक्षण होते. स्वयंचलित सेंसर यंत्र ऊस, मका, भाजीपाला आणि मोठ्या अंतराच्या पिकांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवणे आणि खर्च कमी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या कृषी उपकरणे आणि ऊर्जा विभागातर्फे सेन्सर आधारित स्मार्ट तणनियंत्रण यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र अत्याधुनिक व्हिजन आणि मायक्रोकंट्रोलर तंत्रज्ञानाचा वापरून तणाचे अचूक निरीक्षण करते तसेच नियंत्रित प्रमाणात तणनाशकाची फवारणी करते.
शेतकऱ्यांना तण नियंत्रण हा मोठा खर्चीक आणि वेळखाऊ भाग असतो. पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना जास्त प्रमाणात रसायनांचा वापर होतो, त्यामुळे माती व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. मात्र स्मार्ट सेंसर यंत्र तण ओळखून केवळ गरजेपुरती फवारणी करते, यामुळे खर्च कमी होतो, उत्पादनवाढ होते, पर्यावरणाचे रक्षण होते. स्वयंचलित सेंसर यंत्र ऊस, मका, भाजीपाला आणि मोठ्या अंतराच्या पिकांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. याबाबत अधिक संशोधन सुरू आहे.
यंत्राची वैशिष्ट्ये
तणनियंत्रण स्वयंचलित स्मार्ट सेंसर यंत्राचे आकार १६०० मिमी × ५००मिमी × ११०० मिमी.
मशिन व्हिजन आणि सेन्सरच्या मदतीने तण ओळखून त्यावर नियंत्रित प्रमाणात तणनाशक फवारणी.
वेब-कॅम आधारित इमेज सेन्सर आणि मॅट-लॅब इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअरचा वापर.
यंत्र वेगवेगळ्या प्रकाशमानतेमध्ये कार्यक्षम आहे. त्यामुळे दिवस आणि रात्री दोन्ही वेळेस त्याचा उपयोग करता येतो.
मायक्रो कंट्रोलर आणि सिंगल बोर्ड कॉम्प्युटरचा वापर करून तणनाशकाची मात्रा नियंत्रित केली जाते.
संशोधन दिशा
यंत्राच्या संशोधनाचा पुढील टप्पा अधिक प्रगत कृत्रीम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षण वापरून तण ओळखण्याच्या क्षमतेत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच आर्म-बेस्ड सिंगल बोर्ड कॉम्प्युटर वापरून प्रक्रिया अधिक वेगवान करण्यावर भर देण्यात आलेला आहे.
यंत्राची कार्यक्षमता
तणनाशक वापरात ४० टक्क्यांपर्यंत बचत : यंत्राच्या स्मार्ट फवारणी प्रणालीमुळे आवश्यकतेनुसारच तणनाशक फवारले जाते.
तण नियंत्रण कार्यक्षमता : पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ९१.२६ टक्के अधिक परिणामकारक.
फवारणी क्षेत्र : कमी वेळेत अधिक क्षेत्रावर प्रभावी फवारणी. ६३.४ टक्के क्षेत्र कार्यक्षमता
पर्यावरणपूरक उपाय : गरजेपेक्षा जास्त तणनाशक न वापरल्याने माती, पाण्याचे प्रदूषण टाळले जाते.
घटक तपशील
यंत्राचा आकार १६०० मिमी × ५०० मिमी × ११०० मिमी
सेंसर प्रकार वेबकॅम आधारित इमेज सेन्सर
सॉफ्टवेअर मॅटलॅब इमेज प्रोसेसिंग
नियंत्रण प्रणाली मायक्रोकंट्रोलर आणि सिंगल बोर्ड कॉम्पुटर
कार्यक्षमता ९१.२६ टक्के तण नियंत्रण, ६३.४ टक्के क्षेत्र कार्यक्षमता
तणनाशक बचत ४० टक्यांपर्यंत
- डॉ. सुजीत यमगर, ९७३०७६४४७७
(कृषी उपकरणे आणि ऊर्जा विभाग, भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.