-शेतीमधील पाणी व्यवस्थापन व निचरा प्रणालीचा विषय निघाला की तुमचे नाव आदराने घेतले जाते.
-मी मुलतः कृषी अभियंता (Agriculture Engineering) आहे. आयआयटी खरगपूरमधून जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी (एमटेक) (M.Tech) मी प्राप्त केली. त्यानंतर कृषी विद्यापीठात मला सहायक प्राध्यापकाची संधी मिळाली.
विद्यापीठात काम करीत असतानाच पीएचडीसाठी इंग्लंडमधील लाऊबरो विद्यापीठातील कॉमनवेल्थ स्कॉलरशीप (Commonwealth Scholarship) मिळाली. त्यानंतर तीन वर्षात याच विषयात पदव्युत्तर शिक्षणासाठी याच विद्यापीठाची कॉमनवेल्थ फेलोशिप देखील मिळाली.
इंग्लंडमधील शिक्षण पुर्ण केल्यानंतर राहुरी विद्यापीठात मला जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी या विषयाचा प्राध्यापक म्हणून दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली. सध्या मी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख म्हणून मी कार्यरत आहे.
अर्थात यापेक्षाही माझ्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे विद्यापीठाने विकसित केलेल्या पाणी व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्र, नियंत्रित वातावरणातील शेती, निचरा प्रणाली गेल्या 35 वर्षात मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आहे.
शेतीसाठीच्या पाणी व्यवस्थापनात सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग) माहिती प्रणाली व भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), भूपृष्टीय व भूमिगत पाणी निचरा प्रणाली अशा किचकट बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी मला विद्यापीठाने दिली ही देखील मला समाधानाची बाब वाटते.
-सिंचन व्यवस्थापनात आता मोबाईल तसेच इंटरनेटची गरज का भासते आहे?
-त्याशिवाय आता पुढे शेती करताच येणार नाही. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी जमीन व हवामानातील बदल विचारात घेत तंतोतत मोजून पाणी द्यावे लागेल. हवामानाची स्थिती तर रोज बदलते.
त्यामुळे अशा स्थितीत शेतकऱ्याला मोबाईल किंवा इंटरनेट मायाजालाचा वापर करावाच लागेल. विद्यापीठाने त्यासाठीच सिंचन पाणी गरज सल्ला सेवा प्रकल्प सुरू केला आहे. त्यातूनच पुढे मोबाईल एप्लिकेशन व संकेतस्थळ आधारित संगणकीय प्रणाली विकसित केल्या गेल्या आहेत.
-आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थींगचा वापर शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवित आहात?
-राहुरी विद्यापीठाने या क्षेत्रात दिशादर्शक ठरणारे काम यापूर्वीच सुरू केले आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास कोणत्याही शेतकऱ्याने आमच्या www.rkvyiwas.ac.in संकेतस्थळाला भेट दिल्यास फुले इरिगेशन शेडयूलर (पीआयएस) दिसेल. शेड्युलरबाबत मोबाईल https://play.google.com/store/apps/details?id=net.parthinfotech.modified_pis&hl=en अॅप्लिकेशन देखील उपलब्ध आहे.
शेतकऱ्याने आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी. एकदा नोंदणी होताच शेतकऱ्याला त्यांच्या सिंचन प्रणालीसाठी किती पाणी द्यावे व पंप किती तास चालवावा याची माहिती दिली जाते. कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी उत्पादक संघ, उपसा सिंचन संस्था देखील ही प्रणाली वापरू शकतात. हवामान,पिकाची अवस्था, जमिनीचा प्रकार, सिंचन व्यवस्था याचे शास्त्रीयदृष्ट्या पृथ्थकरण करून शेतकऱ्यांना ही प्रणाली माहिती देते.
या लिंकवर शेतकऱ्यांना अजून एक मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करता येईल. पिकाची अवस्था, जमिनीचा प्रकार आणि हवामानाच्या विविध घटकांनुसार पिकाला पाण्याची किती गरज आहे हे अॅप्लिकेशन आहे. विविध पिकांच्या पाण्याची गरज आणि संच चालू ठेवण्याचा कालावधी यात मिळते.
-शेतीला पाणी देतांना बाष्पपर्णोत्सर्जन विचारात घेतले जात नाही.
-तोच किचकट मुद्दा आम्ही आमच्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाष्पपर्णोत्सर्जन काढून देण्याची सुविधा यात आहे. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन माहिती भरता येते. कोणत्याही पिकाला पाणी दिल्यानंतर जमिनीला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते तसेच पिकाद्वारे घेतल्या जाणाऱ्या पाण्याचे पर्णोत्सर्जन होते.
या दोन्ही घडामोडींना एकत्रित बाष्पपर्णोत्सर्जन म्हणतात. त्यासाठी आम्ही फुले जल हे मोबाईल अॅप्लिकेशन काढले आहे. https://play.google.com/store/apps/details?id=net.parthinfotech.phulejal&hl=en या लिंकवर अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे. आम्ही संदर्भिय बाष्पपर्णोत्सर्जन (ईटीआर) तालुकानिहाय काढण्याची सुविधा दिलेली आहे.
-ड्रोनकडून नेमके काय करता येईल?
-कृषी क्षेत्रातील ड्रोन वापराबाबत सध्या जगभर चर्चा सुरू आहे. भविष्यात पीक सर्वेक्षण, सिंचन व्यवस्थापन, जमिनीची मोजणी, पेरणी, फवारणी या सर्व कामांमध्ये ड्रोन वापरले जातील. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप इतकेच नव्हे तर थायलंड, मलेशिया सारख्या देशांनी शेतीत ड्रोन आणले आहेत.
ड्रोन हे मुख्यत्वे छोटे विमान आहे. ते दोन ते 125 मीटर उंचीपर्यंत उडविता येते. शेतीत ड्रोनचा वापर करताना ते किती उंचीवर उडवावे हे त्याच्या वापर करण्याच्या हेतूवर निश्चित केले जाते. जमिनीवरील मल्चिंग, पिके, पिकांच्या विविध अवस्था, जमिनीचा चढउतार ही माहिती ड्रोन गोळा करतील. या माहितीचे मॅपिंग आणि मॉनिटरिंगसाठी लागणारे सेंसर्स व कॅमेरे ड्रोनला जोडून त्याव्दारे ही माहिती गोळा केली जाते.
भविष्यात ड्रोन हे ट्रॅक्टरला जोडले जातील. कारण, ट्रॅक्टरदेखील चालकविरहित होतील. ड्रोनला जोडलेले कॅमेरे आणि सेन्सर्स प्रत्येक वेळी जमीन, तिचे प्रकार, पीक व त्याची अवस्था, पिकावर ताण याचा डाटा थेट ट्रॅक्टरला देतील. त्यामुळे ट्रॅक्टरला निर्णय घेणे सोपे जाईल. देशाच्या काटेकोर शेतीत अर्थात प्रिसिजन फार्मिंगमध्ये ड्रोन सर्वात महत्वाची भूमिका बजावतील, असे मला वाटते.
-शेतीमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता येवू घातली आहे
-मी म्हणेन की आर्टिफिशियल इंटेलिजिन्ट अर्थात कृत्रिम बुध्दिमत्ता आलेली आहे. एआय, ड्रोन्स, रोबोट्स आणि मशीन लर्निंगवर आधारित शेतीचे चकीत करणारे विविध प्रयोग जगभर चालू आहेत. आपल्या महाराष्ट्राचा विद्यार्थी या विषयात पिछाडीवर राहू नये यासाठी एक नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय राहुरी कृषी विद्यापीठाने घेतला आहे.
त्यातून आम्हाला हवामान अद्ययावत शेती आणि पाणी व्यवस्थापनात कृत्रिम बुध्दिमत्तेचा होणारा वापर कसा वाढेल, हे विद्यार्थ्यांना सांगायचे आहे. एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पुढील वर्षी सुरू होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना रोबोटिक्स् शेती शिक्षणाची संधी मिळेल. या अभ्यासक्रमाचा मसुदा निश्चित झालेला आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थांमधील शास्त्रज्ञांची एक संयुक्त बैठक देखील आम्ही अलिकडेच घेतली.
भविष्यात सारे जग प्रिसिजन फार्मिंग अर्थात काटेकोर शेतीकडे जाईल. विज्ञान तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय एक इंचही काटेकोरपणा शेतीत आणता येत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाची कास धरण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेलाच नाही.
कारण, काटेकोर शेती करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला पीक ताण व्यवस्थापनाचाही अभ्यास करावा लागेल. त्या अभ्यासासाठी आधुनिक ऑप्टिकल सेन्सरचा अभ्यास आणि वापर अत्यावश्यक ठरणार आहे. जमिनीच्या पातळीलगत फिरणाऱ्या ड्रोन्स् पासून ते अंतराळातील उपग्रहांचा वापर शेतीकरीता होईल, असे मला वाटते.
या गोंधळात आपला शेतकरी किंवा विद्यार्थी मागे राहणार नाही याची काळजी विद्यापीठ घेते आहे. त्यासाठी आम्ही आयओटी (इंटरनेट ऑफ थींग्ज), सेन्सरबेस टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुध्दिमत्ता या मुद्द्यांचा आतापासूनच मागोवा घेत आहोत.
आनंदाची बाब म्हणजे या प्रकल्पात आमचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा किंवा अधिष्ठाता डॉ.अशोक फरांदे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभते आहे.
-हवामान बदलाची समस्या हाताळण्यासाठी देखील आधुनिक तंत्रांचा वापर करावा लागेल
- होय. हवामान बदल ही सर्वात मोठी समस्या कृषी क्षेत्रावर चाल करून आलेली आहे. त्याचा निश्चित कोणता परिणाम होतो याविषयी जगभर विविध प्रकल्पांमध्ये संशोधन केले जात आहे. महाराष्ट्र यात मागे नाही. बारामतीला तर जागतिक पातळीवरील संशोधन राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेकडून होते आहे.
सध्या मोठा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ, कधी उष्णतेच्या लाटा तर कधी गारपीट असे निसर्गचक्र चालू आहे. चक्रीवादळे, उष्णतेची लाट किंवा थंडीची लाट ही सर्व स्थिती ग्लोबल वॉर्मिंगमुळेच उद्भवत आहे. पर्यावरणातील बदलामुळे अन्नधान्ये,फळपिके, पशुधन अशी सर्वच शेती संस्कृती अडचणीत येत आहे.
आता या समस्यांना हाताळण्यासाठी जे संशोधन होते आहे त्यासाठी व्हॅल्युएबल डेटा कॅप्चरिंग ( मौल्यवान माहिती पकडणे) , अॅनेलिसिसला (विश्लेषण) आणि सुपरफाईन अॅप्लिकेशन्स ( प्रभावी वापर) अशा तीन मुद्द्यांना अफाट महत्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी डाटा मायनिंग, मशीन लर्निंग, कृत्रिम बुध्दिमत्ता याचा प्रभावी वापर करावाच लागेल.
म्हणजेच हवामान बदलासाठीसारखी शेतीवरील संकटे नैसर्गिक स्वरूपाची असली तरी त्याची उत्तरे विज्ञान, तंत्रज्ञानात शोधावी लागतील. त्याशिवाय संकटांवर उत्तरे सापडणार नाहीत. आम्ही त्याच कामाला सुरूवात केली आहे.
संपर्कः डॉ.सुनील गोरंटीवार – 98815 95081
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.