Galmukt Dharan Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Galmukt Dharan Scheme : गाळमुक्त धरणाकडून गाळयुक्त शेतीकडे जाताना...

Galyukt Shiwar Yojana : मानवनिर्मित गाळ आणि त्या समस्येचा पाणी व्यवस्थापनावर होत असलेल्या थेट परिणामाबाबत या पूर्वीच्या लेखामध्ये आपण सविस्तर चर्चा केली होती. सध्याची शासनाची ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना चांगली असली, तरी गाळयुक्त शिवार करताना आपण उचलून नेत असलेल्या गाळाची प्रत पाहणे गरजेचे ठरते.

डॉ. नागेश टेकाळे

Government Scheme : साठवलेल्या पाण्यामध्ये मुळात सुपीक मातीचा एक थर येऊनच त्याचे गाळामध्ये रूपांतर होते. मात्र सतत पाण्यात राहिल्यामुळे त्यात अजिबात प्राणवायू राहिलेला नसतो. अनेक वर्षांपासून साचलेला असल्याने कुजून त्यात मिथेन वायू मोठ्या प्रमाणात असतो. तसेच मिथेन वायूची निर्मिती करणारे जिवाणूही भरपूर असतात.

ज्या वेळी आपण हा गाळ तसाच शेतात टाकतो, त्या वेळी हे मिथेन निर्माते जिवाणू शेत जमिनीमधील पिकास उपयुक्त अशा जिवाणूंवर नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडून शेतात पाणी साचल्यास हे मिथेन जिवाणू डोके वर काढून कुजण्याच्या क्रियेला वेग देतात. परिणामी, शेतामधील उभ्या पिकांची मुळेसुद्धा त्यांच्या भक्ष्यस्थानी पडू शकतात.

गाळाचा अजून एक महत्त्वाचा भौतिक गुणधर्म म्हणजे त्यांच्या अतिसूक्ष्म कणांचे आपापसांमधील आकर्षण आणि त्यामुळेच निर्माण होणारा घट्टपणा. या गुणधर्मामुळेच तलाव, धरण किंवा छोटे चेकडॅम यामध्ये गाळ साचल्यानंतर पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होत जाते. तसेच पाणी वेगाने साठून आजूबाजूस पसरू लागते. आता आपण गाळमुक्त धरण याकडे वळू.

तलाव, नाले, बंधारे आणि धरणांमध्ये गाळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे? तर माणूस, त्यातही शेतकरी आणि आपण करत असलेली रासायनिक शेती. म्हणून धरणे गाळमुक्त करण्यामध्ये शासनाइतकाच वाटा शेतकऱ्यांनी उचलणे गरजेचे आहे.

खरेतर शासनानेही धरणातील काढलेला गाळ शेतात तसाच टाकण्यापेक्षा त्यावर थोडी साधी सोपी प्रक्रिया करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. काढलेला गाळ सर्वप्रथम झाडांच्या सावलीमध्ये मोठ्या ढिगाऱ्यासारखा रचावा. दर दोन- तीन दिवसांनी यंत्राच्या साह्याने वर खाली केला पाहिजे.

याचे फायदे पुढील प्रमाणे होतील

- सावलीमध्ये ठेवल्याने प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यातील उपयुक्त मूलद्रव्यांचा ऱ्हास होणार नाही.

- गाळ वर-खाली केल्यामुळे त्यातील सुप्त मिथेन वायू कमी होत जातो.

- गाळाचे सूक्ष्म कण वेगळे होऊन त्यांचा घट्टपणा आपोआपच कमी होतो.

- त्यातील अतिरिक्त ओलावा कमी होऊन योग्य ती आर्द्रता शिल्लक राहते.

- अशा प्रकारे थोडी प्रक्रिया केलेल्या गाळामध्ये शेतकऱ्याने कमीत कमी २० टक्के सुकलेले शेणखत मिसळावे. म्हणजे त्या गाळामध्ये उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

- शेतामध्ये असा गाळ टाकताना एकाच जागी मोठा ढीग करण्यापेक्षा सर्वत्र सारखा फेकावा. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे ढीग करून त्यावर उन्हाळी नांगरट करावी.

- शेतात गाळ टाकण्याची प्रक्रिया नेहमी रब्बी पिकांच्या काढणीनंतरच करावी.

- गाळ टाकलेल्या जमिनीत पहिल्या वर्षी भाजीपाला, कंदमुळे, वेलवर्गीय पिके घ्यावीत. त्यामुळे उत्पादन तर भरपूर मिळतेच. त्याच बरोबर ती जमीन पुढील पिकास जास्त पोषक ठरते.

- गाळयुक्त शेतजमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे ठरते. येथे आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी पिकास घातक ठरू शकते. गाळयुक्त जमीन पाणी धरून ठेवते. त्यामुळे प्राणवायू विरहित वातावरण निर्माण होण्याची जास्त शक्यता असते.

- जमिनीमध्ये टाकलेल्या गाळाचे सकारात्मक परिणाम मिळण्यास पहिली दोन तीन वर्षे सहज लागतात. या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर मर्यादित असावा.

- गाळाच्या जमिनीत पहिल्या वर्षी पावसाचे पाणी आपणास हवे तेवढे मुरत नाही. मात्र पुढील काळात पडणारे सर्व पाणी जमिनीत मुरते आणि शेतकऱ्यांना रब्बीचे शाश्‍वत उत्पादन मिळू लागते.

कोकणातील खाड्या वाचवणेही गरजेचे...

आज आपण फक्त धरणामधील साठलेल्या गाळावरच भाष्य करत आहोत. मात्र समुद्रालगत असलेल्या खाड्यांबद्दल कोणीही काही बोलत नाही. ठाण्यामधील खाडी तिच्यामध्ये साठलेल्या गाळामुळे वाहण्याचीच थांबली आहे. ४० वर्षांपूर्वी हीच खाडी एखाद्या नदीप्रमाणे वाहताना मी पाहिलेली आहे. तिला अशी स्थिर पाहून मनास वेदना होतात.

थांबलेल्या या खाडीमुळे त्यात मासेमारी करून जगणारी हजारो कोळी कुटुंबे पारंपरिक मासेमारीच्या व्यवसायापासून वंचित झाली आहेत. ठाणेच काय पण आपल्या कोकणामधील जवळपास सर्वच खाड्या गाळाने भरलेल्या आहेत. दोन दशकांपूर्वीपर्यंत या सर्व खाड्यांमधून लहान मोठ्या बोटींनी प्रवास करता येत असे.

समुद्रास येणाऱ्या भरतीमुळे या सर्व प्रवासी बोटी अगदी सहजपणे किनाऱ्यास लागत. आज या खाड्यामध्ये साधी नाव वल्हवत नेणेसुद्धा कुशलतेचे काम झाले आहे. चार वर्षांपूर्वी जाहीर झालेली ‘सागरमाला’ योजना आज कुठे आहे समजत नाही. जलवाहतूक ही जीवाश्म इंधन वाचवून वातावरण बदलावर मात करणारी एकमेव योजना समजली जाते. पण अजूनही आम्हास त्याचे महत्त्व समजत नाही. रस्ते वाहतुकीचा खर्च १० रु. प्रति किमी असेल, तर रेल्वेचा हाच दर ६ रु. येतो. मात्र जल वाहतुकीचा खर्च जेमतेम १ रु. अथवा त्यापेक्षाही कमी येतो.

कोकणामधील खाड्या गाळाने भरण्याकरिता तेथील डोंगरावरील प्रचंड वृक्षतोड जबाबदार आहे. पूर्वी कोकणात डोंगर माथ्यास ‘सडा’ म्हणत तर पायथ्याला ‘मळा’. पूर्वी सड्यावर पाणी साठले, की पायथ्याला शेतकऱ्यांचे मळे वर्षभर फुललेले आढळत. याचमुळे खाड्या आपोआप गाळमुक्त राहत असल्याने किनाऱ्यापर्यंत बोट वाहतूक व्यवस्थित होत असे.

आज कोकणामधील ‘सडा’ आणि ‘मळा’ ही पारंपरिक पाणी व्यवस्थापनाची परंपरा इतिहास जमा झाली आहे. डोंगरावरील मातीला आधार नसल्याने ती मोकळी होऊन पायथ्याला असलेल्या खाडीत अथवा नदीत सहज मिसळली जात आहे. ही बहुमोल माती वाचविण्यासाठी आपणास डोंगर माथ्यावर असलेल्या कातळावर म्हणजेच सड्यावर पावसाचे पाणी अडवून ते साठवणे हे गरजेचे आहे.

हे साठलेले पर्जन्य जल जमिनीत झिरपून संपूर्ण डोंगरास हरित करू शकते. असे झाल्यास डोंगर उतारावरून खाली नदीपात्रात येणारे दगड धोंडे नियंत्रणात राहतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नद्या शांत होतील. प्रतिवर्षी महाड, राजापूर, चिपळूणसारख्या शहरांचे रस्ते नद्यांच्या पुरामुळे आणि त्यामधील गाळाने भरून जातात, हे निश्‍चित थांबू शकते.

गाळ आणि कृषी उत्पादन यांतील संबंध

तलाव आणि धरणांमधील गाळ काढताना त्या नैसर्गिक पाणीसाठ्याच्या मूळ भूपृष्ठास हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घ्यावयास हवी. कारण गाळ काढणे आणि तळाची माती उकरून खोलीकरण करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. गाळ काढणे म्हणजे मानव निर्मित पापक्षालन आहे, तर खोलीकरण करणे म्हणजे मूळच्या नैसर्गिक परिसंस्थेस धक्का पोहोचविण्यासारखे आहे.

तलाव अथवा धरणाची निर्मिती करतेवेळी भूजलतज्ज्ञ, शास्त्रज्ञ सर्व वैज्ञानिक बाबींचा अभ्यास करतात. त्यावरून त्या धरणाची लांबी, रुंदी, पाणी साठण्याची क्षमता, त्याचे दरवाजे, पाण्याचे वितरण आणि धरणामुळे भूगर्भात किती जलसाठा वाढू शकतो याचे नियोजन केले जाते. त्यावरून त्या धरणाचे आयुष्य ठरवितात.

राष्ट्र विकासामध्ये लहान मोठ्या धरणांचे आयुष्य किमान ५० ते १०० वर्षे असावे, असे मानले जाते. मात्र सध्याची गाळाने भरलेली धरणे पाहिल्यावर त्यांचे आयुष्यमान किती झपाट्याने कमी झाले आहे, याचा सहज अंदाज बांधता येतो.

आपल्या देशामधील लहानमोठी धरणे गाळाने भरत आहेत ही चिंतेची बाब आहे. सेन्ट्रल वॉटर कमिशनच्या (CWC) काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार देशामधील १४६ मुख्य धरणामध्ये आज मागील वर्षाच्या तुलनेत ६ टक्के पाणी कमी झाले आहे.

मागील दहा वर्षांत या सर्व धरणांमधील जिवंत पाणीसाठा सरासरी १२१ टक्के होता, तो या वर्षी ९४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आपल्या देशामधील अर्ध्यापेक्षा जास्त कषिक्षेत्र हे या सर्व धरणांच्या सिंचनावर अवलंबून आहे. यावरून धरणामधील गाळ, कृषी उत्पादन आणि जनतेची अन्नसुरक्षा हे तीनही विषय एकमेकांवर कसे अवलंबून आहेत ते समजते.

ई-मेल - nstekale@gmail.com (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT