परभणी ः खरीप हंगामात (Kharif Season 2022) आतापर्यंत १७ लाख २६ हजार २९९ शेतकरी खातेदारांनी २२ लाख ५८ हजार १७.५० हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी (E Peek Pahani By Farmer) केली आहे. औरंगाबाद विभागात ९ लाख २७ हजार ३६१ शेतकरी खातेदारांनी ११ लाख ८९ हजार १५१ हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी करत राज्यात आघाडी घेतली आहे.
यंदा खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी मोबाईल अॅपचे (E Peek Pahani App) सुधारित २.० व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आले आहे. खरीप हंगामातील ई-पीक पाहणीसाठी १५ ऑक्टोबर पर्यंतची मुदत आहे, अशी माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाचे सहायक राज्य समन्वयक बालाजी शेवाळे (Balaji Shewale) यांनी दिली. नवीन महसूल वर्षात १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे.
सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्य बिंदूचे अक्षांश आणि रेखांश समाविष्ट करण्यात आले आहेत. या सुविधेमुळे पीक नोंदणीमध्ये अचूकता असणार आहे. पीक पाहणी हंगाम सुरू असताना जमिनीच्या खरेदी विक्री होऊन खात्यात बदल झाल्यास या प्रणालीतून अद्ययावत खातेदारांच्या माहितीची सुविधा देण्यात आली आहे. ई-पीक पाहणी केलेल्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी या अॅपमध्ये सर्वांना दिसण्याची व्यवस्था आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाच्या थेट लाभाच्या योजना, पीकविमा, पीएम किसान सन्मान निधी योजना, ई- नाम, कृषी उत्पन्न बाजार समित्या, धोरण निश्चितीकरण, कृषी निविष्ठा, पणन योजना, साखर उद्योग, वायदे बाजार, आयात निर्यात धोरण या करिता आवश्यक असणारी पीक पेऱ्याची अचूक आकडेवारी ई-पीक पाहणी अॅपव्दारे मिळणार आहे. पिकाच्या आकडेवारीचे वर्गीकरण करून सूक्ष्म नियोजन करता येईल. ई-पीक पाहणीसाठी अडचणी आल्यास संबंधित तलाठी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.
विभाग निहाय ई-पीक
पाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
विभाग खातेदार संख्या पीक पाहणी क्षेत्र
औरंगाबाद ९२७३८१ ११८९१५१.३८
अमरावती ३२५१७९ ५१३२५२.१९
नागपूर ८९६१७१ ११३३४०.२०
नाशिक २०८२३१ २८४७३१.७५
पुणे १६४१३१ १४७६३८.१३
कोकण ११६८६ ९९०३.८९
ई-पीक पाहणी अॅपमुळे पेरणी केलेल्या विविध पिकांच्या क्षेत्राची अचूक आकडेवारी उपलब्ध होईल.त्यावरुन शासनास शेतीविषयक विविध धोरणांची निश्चिती शेतकरी हिताच्या विविध योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करता येईल. प्रत्येक शेतकरी खातेदाराने ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.बालाजी शेवाळे, सहायक राज्य समन्वयक ई-पीक पाहणी प्रकल्प
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.