माणसे जोडणारी ई-पीक पाहणी

सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप २.० (E Peek Pahani App) आता खरीप २०२२ च्या हंगामातील (Kharif Season) पीक नोंदणीकरिता सज्ज झाले आहे. आधीच्या ॲपमधील अनेक त्रुटी सुधारित ॲपमध्ये दूर करण्यात आल्या आहेत. या ॲपद्वारे पिकांच्या अचूक नोंदीतून शेतकऱ्यांसाठीचे पुढील सर्व नियोजन आता सोयीचे होईल.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon

आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट आणि फेसबुकसारख्या असंख्य समाज माध्यमामुळे आज जगातील मानसं जवळ आलेली आहेत. हे कशामुळे...? तर काळानुसार आधुनिकतेची कास धरून शासनस्तरावर लोकाभिमुख क्रांतिकारक निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या दक्ष अशा प्रशासनामुळे...!

ग्रामीण भागातील विकास (Rural Development) कार्यक्रमाचे नियोजन प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षपणे शेती व्यवसायाशी संबंधित आहे. कृषी विकास (agriculture Development) कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करताना वेगवेगळ्या पिकाखालील क्षेत्रांची अद्ययावत आणि बिनचूक माहिती व आकडेवारी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. दरवर्षी शेती उत्पन्नाचा वेळोवेळी अंदाज घेऊन शेतकऱ्यांना द्यावयाच्या वेगवेगळ्या सवलती आणि मदत कार्याचे नियोजन करण्याकरीता सुद्धा पिकाखालील क्षेत्राची अद्ययावत व बिनचूक माहिती असणे आवश्यक आहे.

E Peek Pahani
‘ई-पीक पाहणी’ ॲपवर ९० लाख शेतकऱ्यांची नोंदणी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ चे नियम ३० मध्ये नमूद केल्यानुसार पीक पाहणीचे काम १ ऑगस्टला सुरू करून १५ ऑक्टोबरपर्यंत करणे अभिप्रेत आहे. अलीकडे भुईमूग, मूग, उडीद, संकरित ज्वारी, सोयाबीन, मका इत्यादी अल्प मुदतीच्या पिकांची कापणी लवकर होते म्हणून हे पीक पाहणीचे काम १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे उचीत ठरेल.

सातबारा संगणकीकरणाचे अनेक टप्पे आहेत. गाव नमुना नंबर सातमधील अधिकार अभिलेख अचूकरित्या संगणकीकृत झाल्यानंतर व त्याचे अद्यावतीकरण देखील ई-फेरफार प्रणालीतून ऑनलाइन पद्धतीने होऊ लागले. त्यानंतरच शेतातील पिकांची नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर बारा यामध्ये पिकांच्या नोंदी घेतल्या जाऊन या पद्धतीमध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गतिमानता आणली आहे. या गतिमानतेच्या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यासाठी महसूल विभागाने आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने ई-पिक पाहणी हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले.

E Peek Pahani
Crop Insurance: विम्यासाठी ई-पीक पाहणी नोंदीची अट रद्द

पारंपरिक पीक पाहणीला छेद

महसूल यंत्रणेत पिकांच्या नोंदी सातबारा वर घेण्यासाठी परंपरागत पद्धतीने गाव नमुना बारामध्ये नोंदविण्यात येत असलेली पिकांची माहिती शेतकरी किंवा खातेदारनिहाय नोंदविली जात नसे, पीक पाहणी प्रत्येक वर्षी प्रत्येक हंगामात जे पीक उभे असेल त्या वेळी तलाठी शिवारफेरी करून पीक नोंदविणे अपेक्षित होते. परंतु खातेदारांची प्रचंड संख्या, पीक पद्धतीमध्ये झालेला मोठा बदल, तलाठ्याकडील वाढलेला कामाचा व्याप यामुळे पीक नोंदणीचे काम योग्य पद्धतीने होत नसे. त्यात अनेक क्लिष्टता निर्माण होत होत्या. त्यावर उपाय म्हणून ई - पीक पाहणी मोबाईल अॅपमधून खाते क्रमांकनिहाय पीक पाहणीच्या नोंदी करण्यास सुरुवात झाली. अशाप्रकारे सुमारे १४० वर्षांच्या पीक पाहणीच्या परंपरेत या क्रांतिकारक घटनेमुळे आमूलाग्र बदल झाला.

ई-पीक पाहणी मोबाईल अॅप विकसित करण्याची जबाबदारी शासनाने जमाबंदी आयुक्त पुणे, यांच्यावर सोपविली असून, सन २०२१ च्या सर्व हंगामात सुमारे एक कोटी पंचवीस लाख शेतकऱ्यांनी मोबाइल अॅपचा वापर करून केलेल्या नोंदी व त्यातून प्राप्त पिकांची माहिती आणि दरम्यानच्या काळात अनेक शेतकऱ्यांकडून प्राप्त अडचणीच्या आधारावर आणखी सुधारणा करून ई-पीक पाहणी मोबाईल अॅप २.० आता खरीप २०२२ च्या हंगामातील पिक नोंदणीकरीता सज्ज झाले आहे.

सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल

अॅप २.० मधील मुख्य वैशिष्ट्ये

१. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे भरलेल्या पिकाबाबत या प्रणालीमध्ये स्वयंघोषणापत्र घेतले असून, अशाप्रकारे शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी स्वयंप्रमाणित असेल व त्याची नोंद गाव नमुना बारामध्ये होईल.

२. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदविलेले पीक चुकीचे आहे असे त्यांच्या लक्ष्यात आल्यास पीक पाहणी नोंदविल्यापासून ४८ तासामध्ये स्वतः शेतकऱ्यास दुरुस्ती करता येईल.

३. शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांची नोंद ई - पीक पाहणी मधून शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची नोंदणी या योजनेकरिता होणार आहे. त्यामुळे यांना खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.

४. मुख्य पिके व दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा यापूर्वीच्या मोबाईल अॅपमध्ये होती. मात्र शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

५. वापरकर्त्या शेतकऱ्याला ई-पीक पाहणी मोबाईल अॅप हाताळतांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी मदत हे बटण देण्यात आले आहे. या बटणावर क्लिक केल्यास संभाव्य प्रश्नांची उत्तरे मिळतील.

६. सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अँपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्य बिंदूचे अक्षांश आणि रेखांश समाविष्ट केले आहेत. जेव्हा शेतकरी पीक नोंदविताना पिकाचा फोटो घेईल त्या वेळी फोटो घेण्याच्या ठिकाणापासून गटाच्या मध्य बिंदूपर्यंतचे अंतर या प्रणालीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर असल्यास त्याबाबतचा संदेश त्याचवेळी मोबाईल अॅपमध्ये दाखविला जाणार आहे. या सुविधेमुळे पीक नोंदणीमध्ये अचूकता असणार आहे.

७. पीक पाहणी हंगाम सुरू असताना जमिनीची खरेदी / विक्री होऊन खात्यामध्ये काही बदल झाल्यास या प्रणालीतून अद्ययावत खातेदाराची माहितीची सुविधा देण्यात आली आहे.

८. ज्या गावातील खातेदारांनी ई - पीक पाहणी केली आहे. अशा शेतकऱ्यांची यादी या अॅपमध्येच सर्वाना दिसेल, अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ई - पीक पाहणी हे मोबाईल अॅप शेतकऱ्यांच्या जीवनात वरदान ठरले असून राज्य व केंद्र शासनाच्या थेट लाभाच्या योजना, पीकविमा, प्रधानमंत्री किसान योजना, ई-नाम, कृषी उत्पन्न बाजार समित्या, धोरणाचे निश्‍चितीकरण, कृषी निविष्ठा, पणन योजना, साखर उद्योग, वायदा बाजार आयोग, आयात-निर्यात धोरण, या बाबींकरीता आवश्यक असणारा REAL TIME CROP DETA हा ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमधून प्राप्त होणार असल्याने या पिकांच्या आकडेवारीचे वर्गीकरण व सूक्ष्म नियोजन केल्यास शेतकऱ्यांच्या मालास विश्‍वसनीय अशी बाजारपेठ व दर मिळणार आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी हे ई-पीक पाहणी अॅप प्रगतीचे दिशादर्शक असणार आहे.

(लेखक तहसीलदार तथा ई-पीक पाहणी प्रकल्पाचे सहायक राज्य समन्वयक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com